रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया निर्णायक अंतिम लढतीत एकीकडे, मुंबईचा संघ ऐतिहासिक 42 व्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे, मध्यप्रदेशचा संघ आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल, अशी अपेक्षा आहे. कागदावर मुंबईचा संघ भारी आहे. मात्र, मध्य प्रदेशला येथे चमत्कार अपेक्षित आहे.
मागील काही हंगामात सातत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवत आलेल्या मुंबईच्या सर्फराज खानच्या खेळात यंदा बरीच सुधारणा दिसून आली असून त्याने केवळ 5 सामन्यातच 800 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली आहे. यशस्वी जैस्वाल क्वॉर्टरफायनल व सेमीफायनलमध्ये उत्तम धावा झळकावण्यात यशस्वी ठरला असून फायनलमध्येही त्याच्याकडून संघाला यात सातत्य अपेक्षित असेल.