Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PakvsZim : पाकिस्तानी वंशाच्या सिकंदरनेच दिला पाकिस्तानला धक्का; झिम्बाब्वेचा सनसनाटी विजय

zimbave
, गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (22:01 IST)
पाकिस्तानात जन्मलेल्या मात्र चांगल्या संधीच्या शोधात झिम्बाब्वेत खेळायला गेलेल्या सिकंदर रझानेच ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवाचा पाया रचला. सिकंदर रझा आणि झिम्बाब्वे संघाच्या विजिगीषु वृत्तीच्या बळावर त्यांनी पाकिस्तानला एका धावेने नमवण्याची किमया केली.
 
झिम्बाब्वेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर त्यांना 130 रन्सचीच मजल मारता आली. शॉन विल्यम्सने सर्वाधिक 31 रन्सची खेळी केली. पाकिस्तानतर्फे मोहम्मद वासिम 24 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. शदाब खानने 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना भरवशाचे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान झटपट तंबूत परतले. बाबर 4 तर रिझवानने 14 धावा केल्या. पर्थच्या खेळपट्टीशी जुळवून घेता न आलेल्या पाकिस्तानच्या एकाही बॅट्समनला झिम्बाब्वेच्या बॉलर्सनी स्थिरावू दिले नाही. शान मसूदने 38 बॉलमध्ये 44 रन्सची खेळी करत पाकिस्तानच्या आशा पल्लवित केल्या. मसूद आऊट झाल्यानंतर मोहम्मद नवाझने 22 रन्सची खेळी करत झिम्बाब्वेच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची तयारी केली.
 
शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 11 रन्सचं आव्हान पाकिस्तानला पेलवलं नाही. दुसऱ्या बॉलवर सिक्स खेचत नवाझने बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला पण नवाझ आऊट झाला आणि पाकिस्तानचं नशीब रुसलं. शेवटच्या बॉलवर विजयासाठी पाकिस्तानला 4 रन्स हव्या होत्या पण तो केवळ एक रन काढू शकला. पाकिस्ताननने 129 धावाच केल्या आणि झिमाब्वेच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
 
ट्वेन्टी20 प्रकारात झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला सिकंदर रझा, ज्याने 25 रन्समध्ये 3 विकेट्स घेतल्या. सिकंदरलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
 
झिम्बाब्वेच्या नशिबाचा 'सिकंदर'
सिकंदर रझाचा जन्म पाकिस्तानातल्या सियालकोटचा. 2013मध्ये सिकंदर झिम्बाब्वेतर्फे खेळणारा नॉन रेसिडेन्शियल खेळाडू ठरला.
 
तासादक हुसेन रझा म्हणजे सिकंदरच्या बाबांचा मोटार पार्ट्सचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी पाकिस्तानातून झिमाब्बेला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सिकंदर स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथे सॉफ्टवेअरचं शिक्षण घेत होता.
 
लढाऊ विमान पायलट होण्याचं सिकंदरचं स्वप्न होतं. मात्र डोळ्यांमध्ये असणाऱ्या एका विकारामुळे सिकंदरची निवड होऊ शकणार नाही हे स्पष्ट झालं. दुसरं वेड असलेल्या क्रिकेटचा ध्यास जपण्यासाठी सिकंदरने झिम्बाब्वेला जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून सिकंदर क्रिकेट खेळायचा. त्याचे बाबा आणि काकाही क्रिकेट खेळायचे पण ते व्यावसायिक क्रिकेटपटू झाले नाहीत.
 
स्कॉटलंडमध्ये शिकत असतानाच सिकंदर तिथेही क्रिकेट खेळायचा. त्याचवेळी झिम्बाब्वेची राजधानी हरारेमधल्या एका लीगमध्येही त्याने आपल्या कौशल्याची झलक सादर केली होती. झिम्बाब्वेला स्थायिक झाल्यानंतरही राष्ट्रीय संघासाठी खेळण्याकरता पात्र ठरण्यासाठी बरीच कागदोपत्री करावी लागली. या काळात झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अलिस्टर कॅम्पबेलचा पाठिंबा त्याच्यासाठी मोलाचा ठरला.
 
हरारेत बेलव्हेडरे या भागात दक्षिण आशियाई मंडळी राहतात. सिकंदरही तिथेच राहतो. जेव्हा जेव्हा झिम्बाब्वेत सामना असतो, सिकंदरला साथ देण्यासाठी तिथे शेकडो माणसं उपस्थित असतात.
 
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर कमाल दाखवणारा सिकंदर अल्पावधीतच झिम्बाब्वे संघाचा तारणहार ठरला. फास्ट आणि स्पिन बॉलिंग दोन्ही उत्तम खेळू शकणं सिकंदरच्या पथ्यावर पडलं. सिकंदरची स्पिन बॉलिंग भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकते. झिम्बाब्वे संघाच्या परंपरेप्रमाणे सिकंदरही अफलातून फिल्डर आहे.
 
सिकंदर यंदाच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सिकंदरने बांगलादेशविरुद्ध दोन तर भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये शतकी खेळी साकारली होती.
 
सिकंदरने 17 टेस्टमध्ये 35.96च्या सरासरीने 1187 रन्स केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
123 वनडेत सिकंदरच्या नावावर 3656 रन्स असून यामध्ये 6 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
ट्वेन्टी20 प्रकारात सिकंदरने 62 सामन्यात 1176 रन्स केल्या असून त्याचा स्ट्राईकरेट 129.23 एवढा आहे.
 
सिकंदरने टेस्टमध्ये 34, वनडेत 70 आणि ट्वेन्टी20 प्रकारात 33 विकेट्स पटकावल्या आहेत.

Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हॉटेलचे बिल भरण्याच्या रागातुन झालेल्या मारहाणीत वेटरचा मृत्यु