सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन असलेला सुधीर कुमार चौधरी याने भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना घोरावडेश्वर डोंगरावरुन पाहिला. मंगळवारी (दि.23) गहुंजे मैदानावर हा सामना खेळविण्यात आला होता. भारताचा प्रत्येक सामना बघायला सुधीर कुमार चौधरी हजेरी लावतात.
कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच एकदिवसीय सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत. त्यातला पहिला सामना मंगळवारी (दि.23) गहुंजे मैदानावर खेळविण्यात आला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हे सामने विनाप्रेक्षक खेळवले जाणार आहेत. पण, भारतीय संघ आणि विशेषतः सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन असलेला सुधीर कुमार चौधरी यांनी भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना पाहण्यासाठी चक्क घोरावडेश्वर डोंगरावर उपस्थिती लावली होती.
तिरंगा रंगाने संपूर्ण शरीर रंगवलेला, हातात शंख आणि भला मोठा भारतीय ध्वज घेऊन सुधीर कुमार चौधरी घोराडेश्वर डोंगरावर उपस्थित होते. सुधीर कुमार यांनी क्वचितच भारतीय संघाचा एखादा सामना चुकवला असेल. भारतीय संघाचे सामने पाहण्यासाठी त्यांनी अनेक देश विदेशात उपस्थिती लावली आहे. एवढेच, नव्हे तर भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी त्यांनी भारतातून पाकिस्तानात सायकलवरून प्रवास देखील केला होता. सुधीर कुमार मुजफ्फरपुरचे रहिवासी असून, क्रिकेट आणि सचिनचा खेळ बघण्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले आहे.
दरम्यान, घोराडेश्वर डोंगरावर अनेक क्रीडा रसिकांनी उपस्थिती लावली होती. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून, मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.