युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आज 11 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम येथील संजू सॅमसनने भलेही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी केली नसेल, परंतु त्याची बॅट आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त बोलते. संजूने आयपीएलमध्ये 3 तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली आहेत.
संजू सॅमसनला इथपर्यंत नेण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. संजूने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पाऊल ठेवले आणि राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 121 सामने खेळले असून 117 डावात त्याने 3068 धावा केल्या आहेत. या प्रतिष्ठित T20 लीगमध्ये त्याने 3 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.
वडिलांनी सोडली दिल्ली पोलिसांची नोकरी
संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत होते परंतु आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याच्या आवडीमुळे त्यांनी लवकर निवृत्ती (स्वैच्छिक) घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, संजू वडिलांसोबत दिल्लीत राहत होता, पण दिल्लीच्या 13 वर्षांखालील संघात त्याची निवड होऊ शकली नाही. यानंतर विश्वनाथ आपल्या कुटुंबासह तिरुअनंतपुरमला परतले. संजूचे वडील अनेकदा त्याच्यासोबत क्रिकेटच्या मैदानावर दिसत होते. इतकंच नाही तर यावरून त्यांना एकदा इशाराही मिळाला होता.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला आयपीएल
संजू सॅमसनने पुन्हा केरळ संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आणि आपल्या बॅटने सर्वाना आश्चर्यचकित केले. २०१३ मध्ये संजू पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. त्या मोसमात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने 11 सामन्यांत एकूण 206 धावा केल्या. त्याने सलग 9 हंगामात आयपीएल खेळले आणि आज त्याच्या नावावर 3 शतके, 15 अर्धशतके आणि एकूण 3068 धावा आहेत.