आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित अध्याय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये होऊ शकतो. दिल्ली व अहदाबादच्या आयपीएलमधील टप्प्यात बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही स्पर्धा स्थगित करणत आली होती. अद्यापही स्पर्धेचे 31 सामने होणे बाकी आहेत. असे कळते की, बीसीसीआय आता उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईत करण्यास इच्छुक आहे.
2020 मध्येही आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईत यशस्वीपणे पार पडला होता. भारतीय संघ 2 जूनला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी व इंग्लंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. कसोटी अजिंक्यपदाचा सामना खेळल्यानंतर भारत कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूध्द होणार्या दुसर्या व तिसर्या कसोटी सामन्यादरम्यान 9 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. बीसीसीआय हा कालावधी चार किंवा पाच दिवसांचा करण्यास इच्छुक आहे. जेणेकरून त्यांना आयपीएलचे आयोजन करण्यासाठी चार किंवा पाच दिवसांचा आणखी वेळ मिळेल. जर असे नाही घडले तरी बीसीसीआयकडे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान एक महिन्यांची विंडो असेल व या कालावधीत आयपीएलचे आयोजन सहजपणे करता येऊ शकते. त्यासाठी चार आठवड्यांमध्ये डबल हेडर सामन्यांचे आयोजन केले जाईल.
अशा पध्दतीने 8 दिवसांमध्ये 16 सामने होऊ शकतील आणि आयोजकांना स्पर्धा संपविण्यासाठी बराच वेळही मिळेल. आयपीएलच्या या उर्वरित अध्यायासंबंधी बीसीसीआय 29 मे रोजी घोषणा करू शकते. यादिवशी बीसीसीआयची विशेष बैठक होणार आहे.