भारतीय संघाचा मायदेशी परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बार्बाडोसमधील बेरील चक्रीवादळामुळे, भारतीय संघ तसेच कर्मचारी आणि अनेक मीडिया कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडले होते. आता त्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान AIC24WC (Air India Champions 24 World Cup) उद्या सकाळी भारतात पोहोचेल. रोहित शर्माच्या संघाने शनिवारी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले.
टीम इंडिया रविवारी भारतासाठी रवाना होणार होती, मात्र बेरील वादळामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले. बार्बाडोसमधील चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सरकारला विमानतळ बंद करण्यास भाग पाडले आणि सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. याआधी टीम इंडिया बुधवारी मायदेशी परतणार असल्याचे समोर आले होते. मात्र, आता अखेर भारतीय खेळाडू विमानात बसले असून त्यांचा त्यांच्या देशात परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता खेळाडू दिल्लीत पोहोचतील
भारतीय अष्टपैलू शिवम दुबेनेही फ्लाइटच्या आतून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ट्रॉफीसोबत दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये दुबेने लिहिले - मी काहीतरी खास घेऊन देशात परतत आहे. भारतीय संघाचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला. तसेच 17 वर्षांनी टी-20 विश्वचषक जिंकला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने शनिवारी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. चार्टर फ्लाइट 2 जुलै रोजी न्यू जर्सी, यूएसए येथून निघाली आणि स्थानिक वेळेनुसार (बार्बडोस) रात्री उशिरा बार्बाडोस येथे पोहोचली. वेळापत्रकानुसार, फ्लाइटने बार्बाडोसहून 3 जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.30 वाजता म्हणजेच आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता उड्डाण केले. दिल्लीला पोहोचण्यासाठी 16 तास लागतील. म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया गुरुवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता दिल्लीत उतरेल.