Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कपिल देव यांच्या टीम इंडियाने असा जिंकला होता वर्ल्ड कप

kapil dev 1983
, रविवार, 25 जून 2023 (10:17 IST)
25 जून 1983 रोजी लॉर्ड्स मैदानावर कपिलदेव निखंज आणि मदनलाल यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरच परिणाम झाला नाही तर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला.
 
व्हिव रिचर्डसनी फटाफट चौकार मारुन 33 धावा केल्या होत्या. त्यांनी मदनलाल यांच्या गोलंदाजीचा सामना करत 3 चौकार मारले होते.
 
त्यामुळे आता दुसऱ्या कोणाला तरी गोलंदाजी द्यावी असा विचार कपिल देव करत होते. परंतु आणखी एक षटक टाकण्यास द्यावा अशी विनंती मदनलाल यांनी केली.
 
मदनलाल सांगतात, मी कपिल देवकडून चेंडू घेतला हे खरं पण लोक सांगतात त्याप्रमाणे मी हिसकावून घेतला नव्हता. माझ्या तीन षटकांमध्ये 20-21 धावा त्यांनी काढल्या होत्या.
 
मला आणखी एक षटक टाकण्यास द्यावं असं मी कपिलला संगितलं. रिचर्ड्सला एक शॉर्ट चेंडू टाकून पाहावा असं मला वाटलं होतं. व्हिव चेंडुला हूक करताना चुकला. कपिल देव 20-25 यार्ड मागे पळत गेला आणि बोटांच्या अगदी शेंड्यावर त्याने कॅच पकडला.
 
ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शॉपिंग करण्याची इच्छा
25 जून 1983 हा शनिवार होता. लॉर्ड्सवर ढग दाटलेले होते. क्लाइव लॉइड आणि कपिल देव जेव्हा नाणेफेक करायला गेले, त्याचक्षणी सूर्यने ढगांना बाजूला करत दर्शन दिलं. ते पाहून लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या होत्या.
 
मिहिर बोस यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासावर 'द नाईन व्हेव्ज- द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ इंडियन क्रिकेट' हे पुस्तक लिहिलं आहे. ते लिहितात, "जेव्हा आम्ही लॉर्ड्सच्या आत जात होतो तेव्हा बुकीज भारताला 50 टू1 आणि 100 टू1 चा 'ऑड' देत होते."
 
लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजचे समर्थक जास्त होते.
 
ते पहिल्यापासूनच आपण तिसरा विश्वचषक जिंकणार असं ओरडत होते. प्रेस बॉक्समध्ये एकदोनच भारतीय पत्रकार होते. मी संडे टाइम्ससाठी काम करत होतो.
 
इंग्रजी आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारांच्यामते हा काही खास अंतिम सामना नव्हता. वेस्ट इंडिजसमोर ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड असता तर कुठे जरा सामना तरी झाला असता.
 
"भारतीय खेळाडू खेळायला उतरले तेव्हा त्यांनी फार चांगली फलंदाजी केली नाही. जेव्हा वेस्ट इंडिजनं फलंदाजी सुरू केली तेव्हा संदीप पाटील यांनी गावस्कर यांना बरं झालं आता सामना लवकर संपेल आणि आम्हाला ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शॉपिंग करायला वेळ मिळेल असं मराठीत सांगितलं. पण वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू झाल्यावर इंग्रजी आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारांचं बोलणं ऐकून मला फारच वाईट वाटू लागलं होतं. थोडं बरं वाटावं म्हणून मी फेऱ्या मारायला लागलो."
 
श्रीकांत यांचा खेळ
त्या दिवशी नाणेफेकीत लॉइड जिंकले. त्यांनी भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. अँडी रॉबर्टसनी 'बिग बर्ड' जोएल गार्नर यांच्याबरोबर गोलंदाजीला सुरुवात केली.
 
रॉबर्टसनी भारताला पहिला धक्का दिला. गावस्कर लगेच बाद झाले. त्यांच्यानंतर मोहिंदर अमरनाथ यांनी एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूला असणारे श्रीकांत तडाखेबंद फलंदाजी करण्याच्या विचारात होते. त्यांनी चौकार वगैरे मारत धावा काढल्या.
 
श्रीकांत काय विचार करुन फलंदाजी करत होते असं मी त्यांना विचारलं तेव्हा श्रीकांत म्हणाले, "माझ्या नेहमीच्या पद्धतीमुळे खेळ करावा असा माझा विचार होता. मारू शकता तर मारा किंवा बाहेर जा"
 
वेस्ट इंडिजची भेदक गोलंदाजी
श्रीकांत फलंदाजी करताना भरपूर रिस्क घेत होते. तिकडे बाल्कनीत बसलेल्या भारतीय खेळाडूंचे प्राण कंठाशी आले होते. लॉईडनी मार्शलकडे गोलंदाजी दिली आणि श्रीकांत बाद झाले. त्यांची 38 ही दोन्ही संघातील सर्वांत जास्त धावसंख्या होती.
 
मोहिंदर आणि यशपाल शर्मा यांनी हळूहळू 31 धावा केल्या. मात्र वेस्ट इंडिजचे गोलंदाज रॉकेटसारखा मारा करत राहिले. रॉबर्टसनंतर मार्शल मग होल्डिंग अशी त्यांची गोलंदाजी सुरूच होती.
 
यशपाल आणि मोहिंदर लगेचच बाद झाले.
 
मार्शलचा बाऊन्सर
भारताचे 11 धावांमध्ये 6 खेळाडू बाद झाले. लॉर्डसवर सामना पाहाणाऱ्या भारतीयांमध्ये शांतता पसरली होती. तिकडे भारतात क्रिकेटप्रेमी रेडिओ आणि टीव्ही बंद करत होते. पण शेवटच्या चार खेळाडूंनी आणखी 72 धावा केल्या. बलविंदर सिंह यांना मार्शल यांनी बाऊन्सर टाकला. तो बलविंदर यांच्या हेल्मेटवर लागला.
 
सय्यद किरमाणी सांगतात, "जेव्हा माझी आणि बलविंदरची भागीदारी सुरू झाली तेव्हा पहिलाच चेंडू बाऊन्सर होता आणि तो सरळ त्याच्या हेल्मेटवर लागला. मार्शल त्यावेळचे सर्वांत वेगवान गोलंदाज होते. त्यांचा चेंडू हेल्मेटला लागताच बल्लू (बलविंदर)ला दिवसाच तारे दिसले. तू बरा आहेस का हे विचारायला मी त्याच्याजवळ गेलो. बल्लू हेल्मेटला हाताने चोळत असल्याचं दिसलं म्हणून तुला जखम झालीय का असं मी त्याला विचारलं."
 
सय्यद पुढे सांगतात, त्याचवेळेस पंच डिकी बर्ड यांनी मार्शलना टेल एंजरवर बाऊन्सर टाकल्याबद्दल भरपूर झापलं आणि बल्लूची माफी मागायला सांगतिलं.
 
तेव्हा मार्शल यांनी बलविंदर यांच्याजवळ येऊन दुखापत व्हावी अशी माझी इच्छा नव्हती असं सांगितलं. तेव्हा बलविंदर मार्शलना म्हणाले, माझा मेंदू डोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं का? माझा मेंदू तर गुडघ्यात आहे. यावर मार्शल हसू लागले.
 
183वर भारताचा खेळ आटोपला
भारताचा संघ 183 धावा करू शकला. त्यावेळेस वेस्ट इंडिजचा संघ पॅव्हेलियनकडे असा काही पळाला की जणू आता विश्वचषक त्यांचाच झाला.
 
क्षेत्ररक्षणाला जेव्हा तुम्ही उतरलात तेव्हा सामना कोण जिंकेल असं तुम्हाला वाटत होतं असं मी किरमाणी यांना विचारलं.
 
तेव्हा किरमाणी म्हणाले, "ते सुरुवातीलाच सामनाच संपवून टाकतील. व्हिव्हियन रिचर्डसला खेळायलाही मिळणार नाही असं वाटत होतं. पण धीर सुटणार नाही आणि सकारात्मक भावना ठेवून खेळायचं आम्ही ठरवलेलं"
 
ग्रीनिजचा उडाला त्रिफळा
वेस्ट इंडिजकडून हॅन्स आणि ग्रीनिज खेळायला उतरले. चौथ्या षटकात बलविंदर सिंधूच्या चेंडूवर ग्रीनिज त्रिफळाचित झाला. आता भारतीय खेळाडूंच्या खेळाला वेग आला. लॉईडना कपिल देव यांनी झेल घेऊन बाद केलं.
 
गोम्स आणि बॅकस बाद झाल्यावर दूजो आणि मार्शल यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा केल्या. मोहिंदरनी दूजोला बाद केलं. वेस्ट इंडिजची शेवटची जोडी गार्नर आणि होल्डिंग यांनी धावसंख्या 140 पर्यंत नेली. मोहिंदर यांनी होल्डिंगना बाद केलं.
 
कीर्ती आजाद सांगतात, "ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोर आहे. अजूनही थरार वाटतो."
 
जेव्हा तुम्ही एखादा खेळ खेळत असता तेव्हा यशोशिखर गाठण्याची तुमची इच्छा असते. हा कधीच विसरता येणार नाही असा अनुभव असल्याचं कीर्ती सांगतात.
 
शशी कपूर लॉर्ड्सवर
जेव्हा भारताच्या विजयाचा सोहळा साजरा होत होता तेव्हा अभिनेते शशी कपूर तिथं पोहोचले होते.
 
कपिल देव त्यांचं आत्मचरित्र स्ट्रेट फ्रॉम द हार्टमध्ये लिहितात,
 
'जेव्हा आम्ही ड्रेसिंगरुममधून बाहेर पडत होते तेव्हा शशी कपूर तिथे आल्याचं समजलं. त्यावेळेस आम्ही लॉर्ड्सचे सर्व नियम तोडले. मुख्य स्वागत कक्षात टाय लावल्याशिवाय कोणीही येऊ शकत नाही. आम्ही शशी कपूर यांच्यासाठी टायची सोय केली. पण ते इतके जाड झालेले की आमच्यापैकी कोणाचाच कोट त्यांना बसत नव्हता. पण शशी कपूर स्मार्ट होते त्यांनी एका स्टारप्रमाणे खांद्यावर कोट टाकला आणि टाय बांधून आले, मग त्यांच्याबरोबर आम्ही आनंद साजरा केला.'
 
कपिल देव आणि मदनलाल यांच्या पत्नी लॉर्डसवर नव्हत्या. कपिल देव लिहितात,
 
'भारतीय खेळाडू बाद व्हायला लागल्यावर माझी पत्नी रोमीने मदनलाल यांची पत्नी अनु यांना मला इथं बसवत नाहीये मी हॉटेलला जातेय असं सांगितलं. थोड्यावेळानं अनुही हॉटेलवर गेल्या. पण मैदानावरुन आवाज येऊ लागल्यावर त्यांनी टीव्ही लावला.'
'टीव्ही लावताच मी रिचर्डसचा झेल घेतल्याचं पाहिलं. त्या दोघींनी इतका दंगा केली की हॉटेलचे कर्मचारी जमा झाले. जेव्हा जिंकल्यावर मी शँपेन उडवायला सुरुवात केली तेव्हा त्या दोघी तिथं असतील असं वाटलं होतं.
 
पण मदन माझ्या कानात खुसफुसले. मला अनू आणि रोमी दिसत नाहीयेत. मनात असूनही त्या दोघी मैदानात येऊ शकल्या नाहीत.'
 
वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममधून आणली शँपेन
लॉर्डसच्या बाल्कनीमध्ये कपिल देव यांनी उडवलेली शँपेन वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममधून आणलेली होती. भारताला आपल्याला विजय मिळेल असं वाटलं नव्हतं म्हणून शँपेनही आणलेली नव्हती.
मिहिर सांगतात, "कपिल देव वेस्ट इंडिजच्या कप्तानाशी बोलायला त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. तिथं सर्व खेळाडू दुःखात होते. तिथल्या शँपेन बाटल्या घेऊ का असं विचारलं. लॉईडनी त्यांना परवानगी दिली. अशाप्रकारे भारतीय खेळाडूंनी वेस्ट इंडिजला फक्त हरवलं असं नाही तर त्यांची शँपेनही प्यायले."
 
इंदिरा गांधींचा संवाद
जेव्हा भारतीय संघ मुंबईत पोहोचला तेव्हा भर पावसात 50 हजार लोक वानखेडे स्टेडियममध्ये स्वागतासाठी हजर होते. पंतप्रधान इंदिरा गांधींनी संपूर्ण संघाचं दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत केलं.
 
कपिल देव लिहितात, 'इंदिरा गांधी यांना भेटण्यापूर्वी गावस्कर यांनी श्रीकांत यांना सांगितलं की तुला डोळा मारण्याची आणि नाक हलवण्याची वाईट सवय आहे. इंदिरा गांधींसमोर नीट वाग. श्रीकांत म्हणाले ठीक आहे.'
 
श्रीकांत यांनी आपल्या सवयीला प्रयत्नपूर्वक रोखलं.
 
श्रीकांत म्हणाले, "जेव्हा इंदिरा गांधी गावस्करांशी बोलत होत्या त्यांनाही डोळा मिटण्याची सवय आहे असं मला दिसलं."
 
जेव्हा त्या श्रीकांत समोर आल्या तेव्हाही त्यांनी पापण्यांची उघडझाप केली. आता मात्र श्रीकांत आपल्या सवयीला रोखू शकले नाहीत. त्यांनी पापण्यांची उघडझाप केली आणि नाक हलवलं. ते पंतप्रधानांची नक्कल करत आहेत असं वाटून सर्व जण अस्वस्थ झाले.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ