आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ICC ने स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम 82.93 कोटी रुपये (US$10 दशलक्ष) ठेवली आहे. भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. उद्घाटन आणि अंतिम दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.
आयसीसी ने शुक्रवारी सांगितले की जिंकणाऱ्या संघाला 33.17 कोटी रुपये (चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) उपलब्ध होतील. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला 16.59 कोटी रुपयांवर (दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) समाधान मानावे लागेल. ग्रुप स्टेजमध्ये सर्व 10 संघ एकमेकांशी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळतील. गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 2019 मध्येही स्पर्धा त्याच फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.
जे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकले नाहीत त्यांनाही पैसे मिळतील.
गट फेरीतील सामने जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही दिली जाते. संघांना प्रत्येक विजयासाठी 33.17 लाख रुपये (US$40,000) मिळतील. गट टप्प्याच्या शेवटी बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघांना प्रत्येकी 82.92 लाख रुपये (US$100,000) मिळतील.
स्पर्धेच्या 13व्या आवृत्तीत 10 संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. यजमान भारताशिवाय न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्सचे संघ खेळणार आहेत. 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ 46 दिवसांच्या स्पर्धेच्या तयारीसाठी दोन सराव सामने खेळणार आहे.