केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये अनेक समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे बलात्कार. निर्भया असो किंवा असिफा असो... माणसाची विकृती इकत्या उच्च बिंदूला गेलीय की लहान मुलांवरील लैंगिक शोषण वाढतच आहेत. मानसोपचारज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे तर हा एक मानसिक विकार आहे. या मानसिक विकाराला पीडोफीलिया (बाल लैंगिक शोषण) असे म्हणतात. बीबीसी न्यूजच्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार प्रत्येक १५ मिनिटाला एका लहान मुलाचे लैंगिक शोषण होते. २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह गुन्हेगारी अहवालानुसार १०६,९५८ प्रकरणे मुलांविरोधात घडलेले गुन्हे आहेत. यापैकी ३६,०२२ प्रकरणे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ़्रॉम सेक्सश्युअल ऑफेन्स ऍक्ट अंतर्गत नोंद केलेले आहेत. ही मानसिक विकृती आज अधिक बळावत आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण यावर आपल्याकडे सध्या तरी उपाय नाही. पालकांचे संस्कार हाच एकमेव उपाय त्यावर आहे. एखाद्याला सासन होणे हा उपाय ठरु शकत नाही. कारण शासन तेव्हा केलं जातं जेव्हा बलात्कार झालेला असतो. पण बलात्कार होऊ नये यासाठी काही उपाययोजना आहेत का? पॉर्न साइट्स बंद करणे हा उपायांचा एक प्रकार असू शकतो. पण पॉर्न साइट बघणारे सगळेच बलात्कार करतात का? तर नाही. बलात्कार तेच करतात जे बलात्कार करणार आहेत. हा एक विशिष्ट प्रकारचा आजार आहे. सेक्स मॅनियाक म्हणा किंवा अजून कोणतेही तांत्रिक नाव द्या. पण आजच्या युगात बलात्कार करण्यास लोक प्रवृत्त होत आहेत. लोक इतके का असंतुष्ट असतील? त्यांना शरीरसुख मिळत नाही हे कारण तसं न पचण्यासारखं आहे. विवाहित पुरुष सुद्धा बलात्कार करतातच... त्यांना तर लैंगिक सुख मिळतच असणार... मग अशा थराला लोक जातातच का? आपल्या विवाहित जोडीदारा ऐवजी सेक्स करणं चांगलं किंवा वाईट वा नैतिक किंवा अनैतिक या गोष्टीत आपण पडण्यापेक्षा मला वाटतं कुणाच्या इच्छे विरोधात सेक्स करणं ज्याला आपण बलात्कार वा शोषण म्हणतो ते वाईटच नव्हे अनैतिकच नव्हे गुन्हाच नव्हे तर पाप सुद्धा आहे. आपल्याकडे आणि पाश्चात्य देशांत सुद्धा पाप ही संकल्पना गुन्ह्यापेक्षाही मोठी आणि भयंकर मानली जाते. म्हणून हा शब्द वापरला...
असं म्हटलं जातं की महिला तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतो. तर असं मुळीच नाही. असंही म्हटलं जातं की महिला काही करतील पुरुषांनी स्वतःवर ताबा ठेवलाच पाहिजे. हे बोलणं योग्य आहे. पण हे बोलणं अशा पुरुषांना लागू होतं जे मुळात सामाजिक भान पाळतात. पण ज्यांना सामाजिक भान नसतं त्यांचं काय? म्हणजे मुळात जे बलात्कार करणारच आहेत त्यांचं काय? ज्यांच्यात ही विकृती आहे, जे या सेक्सच्या अती तीव्रतेला बळी पडलेत त्याचं काय करायचं हा मूळ प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे. आपण संस्कारावर जोर देतो हे खरंय. पण आई वडील आपल्या मुलांना बलात्कार कर असं तर शिकवत नसतात. नालासोपार्यामध्ये तर सख्ख्या मुलाने आईवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मग हे संस्कार त्याच्या आईने त्याला दिले होते का? तर नाही. ही विकृती बळावतेय हे सत्य आपण स्वीकारुन त्यावर आधुनिक उपाय शोधून काढले पाहिजेत. त्या आधुनिक उपायांमध्ये सेक्स डॉल हा पर्याय असू शकतो का? सेक्स डॉल्स किंवा रोबोट्स अनेक देशांमध्ये कायदेशीररित्या वापरले जातात पण भारतात मात्र त्यावर बंदी आहे. कदाचित आपले संस्कार हे कारण असू शकतं. अनैर्सिक सेक्स हे त्यामागचं कारण असू शकतं. मग बलात्कार कोणत्या अर्थाने नैसर्गिक आहे. एखाद्याच्या इच्छे विरोधात लैंगिक सुख काय तर कोणतीही गोष्ट बळजबरीने करुन घेणे हे किती भयानक आहे. ही जी भयानकता आहे ती भयानकता आपल्या समाजात आज आहे. त्या भयानकतेवर आपण काही उपाय शोधणार आहोत की नाही? ने जे विकृत मानसिकतेचे वा मानसिक आजार असलेले लोक आहेत त्यांना आपण हेरुन त्यांच्यावर उपचार करु शकत नाही. भारतासारख्या देशात ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मग त्यांची विकृती, त्याच्यातली भयानकता किंवा सेक्सची अती तीव्र इच्छा शांत करण्यासाठी काही मार्ग आहेत का हे शोधून काढायला नको का? कारण दुसरा कोणताही उपाय सध्या तरी आपल्याकडे नाही.
मग सेक्स डॉल हा पर्याय ठरु शकतो का? सेक्स डॉलमुळे त्यांच्यातली इच्छा त्या क्षणापुरती शांत होऊ शकते का? त्यांच्यातली जी बलात्कार करण्याची किंवा बळजबरी करण्याची फॅंटसी आहे ती शांत होऊ शकते का? याचा विचार आपण एकदा करायलाच हवा. एकाद्या विकृती असलेल्या माणसाला तीव्र इच्छा झाली आणि त्याच्याकडे सेक्स डॉल सहज उपलब्ध असेल तर तो आपली तीव्रता कुण्या स्त्रीला बळी पाडण्याऐवजी त्या डॉलवर काढू शकणार नाही का? हा विचार या क्षेत्रातल्या तज्ञांनी करायचा आहे आणि खरोखरच जर यातून चांगला मार्ग निघत असेल तर आपण भारतात सेक्स डॉलबद्दल सकारात्मक विचार करायला हरकत नाही. याने बलात्कार बंद होतील असंही नाही. म्हणजे मेट्रो झाल्याने ट्रॅफिक संपुष्टात येईल असं नाही. पण थोडा दिलासा नक्की मिळणार आहे. तरी काही फेमिनिस्टांचं असं म्हणणं आहे की सेक्स डॉलमुळे पुरुषांच्या मनात स्त्री विषयीची बलात्काराची भावना वाढू शकते. कारण सेक्स डॉल तुम्हाला प्रतिकार करत नाही आणि तुम्हाला हवा सेक्स खरंतर बलात्कार तिच्यासोबत करु शकता म्हणून पुरुष स्त्रीकडे पाहताना सेक्स डॉल म्हणून पाहिल असं त्यांना वाटतं. याचाही तज्ञांनी अभ्यास करायला हवा. पण आपल्या भारतीय स्त्रीयांना सुरक्षित करण्यासाठी आधुनिक उपाय आपल्याला शोधलाच पाहिजे. संस्कार म्हणा किंवा शासन म्हणा, हे तर आहेच. पण बलात्कार होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बलात्कार करणार्याला चाबकाने फोडा, त्याचं लिंग कापा असली स्टेटमेंट्स देऊन आपली जबाबदारी झटकायला आपण मोकळे होतो. पण आपल्याला त्यापुढे जाऊन विचार करता आला पाहिजे. ऍक्सिडेंट्स होतात म्हणून ऍम्ब्युलेन्स सेवा हायवेवर तैनात करणे श्रेयस्कर आहे. पण ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी उपाययोजना नको का करायला? तसंच बलात्काराचं आहे. तर आपण सर्वांनी विचार करुया यातून काही निघतंय का? हा विचार सरकार आणि तज्ञापंर्यत्त पोहोचवूया... कदाचित यातून काहीतरी सापडेल... कदाचित...
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री