Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संविधान म्हणजे आधुनिक भारताचा पाया...

संविधान म्हणजे आधुनिक भारताचा पाया...
, सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (09:00 IST)
राष्ट्रप्रेमी व बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि लोकशाहीच्या मार्गाने चालणारे, समाज कार्यासाठी धावून येणारे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक #PravinVitthalTarde यांच्या एका संविधान व गणपतीच्या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. प्रवीण तरडे ह्यांनी याविषयी माफी मागितली आहे, म्हणून हा विषय इथेच संपलेला आहे. माफी मागणे म्हणजेच चुकून झालेल्या चुकीची कबुली देणे व पुन्हा ती न करणे होय. त्यामुळे माफी मागितल्यानंतर वाद उकरून काढणे अतिशय चुकीचं आहे. जे प्रवीण तरडे ह्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे की भारताच्या लोकशाहीला आणि संविधानाला धक्का लावणारं काम ते करणार नाहीत. उलट लोकशाही आणि संविधानाचे मूल्य बळकट होण्यासाठीच ते झटत असतात.
 
मला या मुद्द्याकडे एका वेगळ्या नजरेने पहावेसे वाटते. सर्व प्रथम मी घोषित करू इच्छितो की माझ्यासाठी संविधान म्हणजे धार्मिक ग्रंथ नाही. धार्मिक ग्रंथाविषयी आपल्याला श्रद्धा असते आणि त्यात बदल करता येत नाही वर ते ईश्वरनिर्मित असतात अशी सगळ्यांचीच भावना असते. पण संविधान हे मानवनिर्मित असते आणि संविधान म्हणजे आपल्या आधुनिक भारताचा पाया आहे. आपल्या देशाची भारत आणि पाकिस्थान अशी दोन शकले उडाल्यानंतर पाकिस्थानात बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे तो एक कट्टर धार्मिक देश झाला, धार्मिक ग्रंथ हाच पाकचा पाया झाला आणि त्यांनी स्वतःची आणि जगाची वाट लावून घेतली. आज जगात पाकीस्थानाला कवडीचीही किंमत नाही. पण सुदैवाने भारतात सुधारणावादी, सारे विश्व हेच माझे घर म्हणणारा, जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा, मन चंगा तो कटोती मे गंगा म्हणणाऱ्या संत रोहिदासांचा, सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आणि संत कबिरांचा हिंदू समाज बहुसंख्य असल्यामुळे भारताने संविधानाची निर्मिती केली आणि जगासमोर एक नवा आदर्श घालून दिला. त्यामुळे संविधान म्हणजे केवळ विशिष्ट समाज हे समीकरण अतिशय चुकीचं आहे. संविधान म्हणजे भारतीय समाज ज्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती सगळेच आले. ज्यांना संविधानापेक्षा आपला धर्म आणि धार्मिक ग्रंथ श्रेष्ठ वाटतो आणि जे संविधानाला आम्ही मानत नाही असं म्हणतात ते भारताचे गुन्हेगार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिवादी माणसाचा मोठा वाटा असणाऱ्या संविधानाकडे धार्मिक ग्रंथ म्हणून पाहणारे सुद्धा भारताचे अपराधी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
 
संविधान हा आधुनिक भारताचा पाया आहे हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला लोकशाहीचे मूल्य कळणार नाही. संविधान आणि लोकशाहीत किती ताकद आहे हे समजणार नाही. मी वर म्हटलं की मला याकडे वेगळ्या नजरेने पाहवेसे वाटते. इथे मला विवेकानंदांची एक कथा आठवते... सर्वधर्म परिषदेत स्वामी गेले होते. असं म्हटलं जातं की तिथे हिंदू धर्माला खाली दाखवण्यासाठी भगवद्गीता सगळ्या धार्मिक ग्रंथाच्या खाली ठेवण्यात आली होती. तेव्हा विवेकानंदाना डिवचण्यासाठी एकाने विचारलं 'बघा आमचा धर्मग्रंथ आणि धर्म सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून सगळ्या ग्रंथांच्या वर ठेवण्यात आलाय, तुमचा धर्म सर्वात कमी दर्जाचा असल्यामुळे तुमचा धर्मग्रंथ सगळ्यात खाली ठेवलाय..." यावर विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते आपण सगळ्या संविधानप्रेमींनी मनामध्ये कोरून ठेवलं पाहिजे आणि आपल्याला या घटनेकडे तसे पाहता येईल का हेही पाहिलं पाहिजे. विवेकानंद म्हणाले "माझा धर्म सगळ्या धर्माचा उद्गाता आहे, सगळ्या धर्माचा पाया आहे. म्हणून माझा धर्मग्रंथ सगळ्यात खाली ठेवलाय... माझ्या धर्मग्रंथाने सगळ्या धर्मग्रंथाला आपल्या डोक्यावर उचलून घेतलंय."
 
प्रवीण तरडे ह्यांच्या त्या फोटोकडे किंवा कृतीकडे या नजरेने पाहता येईल का? संविधामुळे आपला धर्म शाबूत आहे, संविधामुळेच प्रत्येकाला आपल्या धार्मिक कृती करण्याचा अधिकार दिला आहे... भारतात बहुसंख्य हिंदू नसते आणि आपण संविधान स्वीकारले नसते तर भारताचा दळभद्री आणि भिक्कार पाकीस्थान झाला असता. संविधानामुळे आज भारत ताठ मानेने सगळ्या जगासमोर उभा आहे. संविधानात ताकद आहे की ते सगळ्या धर्माला उचलून धरू शकते, सगळ्या धर्माला कुशीत घेऊ शकते आणि धार्मिकतेच्याही पुढे जाऊन आपण माणूस आहोत हे अधोरेखित करू शकते... गणपती ही बुद्धीची देवता आहे... बुद्धीच्या देवतेलाही उचलून धरण्याचे सामर्थ्य संविधानात आहे असा विवेकानंद यांच्याप्रमाणे विचार आपण करू शकतो का? मी केवळ एक विचार तुमच्या समोर ठेवतोय... तो स्वीकारायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. आपण सगळेच संविधानप्रेमी असल्यातामुळे संविधानिक मार्गाने आपण एकमेकांचे विचार खोडून काढू शकतो ही बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिवादी परंपरा आहे.  बाबासाहेबांची बुद्धिवादी परंपरा जोपासणे सोपे नाही.
 
संविधानाचा अपमान म्हणजे काय हे आधी आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. संविधान मिळाल्यानंतर सीएए किंवा इतर गोष्टीचा विरोध करण्यासाठी दंगली करणे हा संविधानाचा अपमान आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संविधान आपल्याला लोकशाही मार्गाने प्रतिकार करायला शिकवतो. बाबासाहेब आंबेडकरांनी रूढीवादी सनातन्यांच्या विरोधात जो लढा दिला तो लोकशाही मार्गाने दिला आहे. पण संविधानाचं आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन भारताचे तुकडे व्हावे अशी मनिषा बाळगणारे, तशी घोषणा करणारे जे लोक आहेत, नक्षलवाद आणि आतंकवादाला समर्थन देणारे जे लोक आहेत ते संविधानाचा अपमान करत असतात, भ्रष्टाचार करणारे मंत्री व नेते संविधानाचा अपमान करत असतात. भ्रष्टाचार हा संविधानाच्या विरोध आहे. बोफोर्स, 3जी, 4जी वा इतर भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनी संविधानाचा अपमान केला आहे आणि हेच लोक किंवा ह्यांना समर्थन देणारे लोक जेव्हा संविधानप्रेमी होण्याचं नाटक करतात तेव्हा ह्यांची कीव करावीशी वाटते. ही गोष्ट आपण मनात पक्की केली पाहिजे की संविधानप्रेमींचा खरा लढा ह्या दंगली, नक्षली, आतंकवादी व भ्रष्टाचार करणाऱ्या व त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. ह्यांच्यामुळेच संविधानाला खरा धोका आहे... लक्षात ठेवा संविधान म्हणजे आधुनिक भारताचा पाया आहे. पाया म्हणजे कनिष्ठ नव्हे तर पाया म्हणजे म्हणजे श्रेष्ठ... बिल्डिंग बांधताना पाया मजबूत नसेल ते बिल्डिंग कोसळेल... बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने संविधान हा भारताचा पाया झाल्यामुळे भारत नावाची बिल्डिंग कधीच कोसळणार नाही...
 
आज बुद्धीच्या देवतेचं, गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे... पुरोगामी न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेली वसंत व्याख्यानमालमुळे महाराष्ट्रात बुद्धिवाद जोपासला गेला. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकरांनी या बुद्धिवादावर कळस चढवला... महाराष्ट्रातील बुद्धिवादी परंपरा नष्ट करण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले आहे... तरी खऱ्या संविधांप्रेमींनी ही परंपरा जोपासत खूप मोठा लढा दिला आहे... बुद्धीच्या देवतेकडे, गणपती बाप्पाकडे एक प्रार्थना की महाराष्ट्रातील संविधानावर उभारलेली बुद्धिवादी परंपरा अशीच शाबूत राहो आणि दुरितांचे तिमिर जावो या प्रार्थनेप्रमाणे बुद्धी नसलेल्याना बुद्धी प्राप्त होवो...
जय महाराष्ट्र
जय हिंद
जय संविधान
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्ण