अनेक ऑफिसेस किंवा हॉटेल्स अशी असतात जिथे सतत गोंगाट असतो. किंवा रेल्वे स्टेशन्सवरच्या उद्घोषणेचं उदाहरण घ्या. स्टेशनवरच्या कोलाहलात मोठ्याने सुरू असलेल्या उद्घोषणाही नीट ऐकू येत नाहीत. तुमच्या कदाचित चटकन लक्षात येत नसेल मात्र हा मोठा आवाज तुम्हाला प्रचंड अस्वस्थ करत असतो.
याउलट, वॉशिंग्टन डीसीतल्या नॅशनल आर्ट गॅलरीमधल्या जाड लाकडी फरशीसारख्या ठिकाणावरून फिरताना जाणवणारी शांतता तुमचं मन शांत करू शकते. पण, असं का होतं?
यातल्या प्रत्येक इमारतीचा स्वतःचा असा आवाज असतो.
त्यामुळेच हल्ली इमारती कार्यसुलभ आणि सौंदर्य दृष्टिकोनातून प्रसन्न करणाऱ्या असण्याबरोबरच आवाजाच्या दृष्टीनेही सुसह्य असणाऱ्या हव्या, याकडे लोकांचा कल वाढतोय.
इमारतीतल्या जागेचा वापर आणि इमारत बांधण्यासाठी वापरात येणारं साहित्य, यावर आर्किटेक्ट आणि इंजीनिअर्स आता नव्याने विचार करू लागले आहेत.
आणि शास्त्रीय संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की असं बांधकाम करता येऊ शकतं. याला 'ओरल आर्किटेक्चर' किंवा 'ध्वनीशी निगडित स्थापत्यकला' म्हणतात. एखाद्या वास्तूत येणाऱ्या आवाजाचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. तसंच त्या इमारतीबाबतीत येणाऱ्या अनुभवावरही परिणाम होत असतो.
ओरल आर्किटेक्चर : एखाद्या वास्तुचा (जागेचा) कानाने येणारा अनुभव
"इमारतीला आपण कसं ऐकतो, त्यातले आवाज आणि त्या आवाजांना आपण कसा प्रतिसाद देतो यालाच ओरल आर्किटेक्चर म्हणतात," असं मॅनचेस्टरमधल्या सॅलफोर्ड विद्यापीठातले ऑकोस्टिक (ध्वनीविषयक) इंजीनिअर ट्रेव्हर कॉक्स सांगतात.
आपण जगाचा अनुभव प्रामुख्याने आपल्या डोळ्यांनी घेत असतो. मात्र, आपले कान सतत आपल्या सभोवतालची माहिती घेत असतात आणि यातून नकळत त्या जागेविषयीच्या आपल्या भावनांवर परिणाम होत असतो.
"रिकाम्या खोलीत डोळ्यावर पट्टी बांधून फिरून बघा. तुम्ही ती शांतता 'ऐकू शकता.' खोलीतल्या पृष्ठभागावरून प्रतिध्वनी ऐकू येऊन तुम्हाला खोलीचा आकार, छताची उंची, खोलीत कार्पेट आहे की नाही, याचा अंदाज येतो," असं अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधले माजी इलेक्ट्रिकल इंजिनिअर बेरी ब्लेसर सांगतात.
त्यांनीच 'ओरल आर्किटेक्चर' ही संज्ञा शोधली. ते पुढे म्हणतात, "सर्व प्रकारच्या गोष्टींचे आवाज आपण ऐकू शकतो. फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही."
गोंगाट, मूड, कार्यक्षमता आणि मानसिक आरोग्य
इमारतीच्या संरचनेशी ध्वनी जो संवाद साधतो त्याचा आपला मूड आणि भावनांवर मोठा परिणाम होत असतो.
लंडनमधल्या सेंट पॉल्स कॅथेड्रलमधल्या गोलघुमटात कुजबुजण्याचा आवाज कसा फिरतो किंवा न्यूयॉर्कमधल्या ग्रँड सेंट्रल इमारतीतल्या खालच्या मजल्यावरच्या गोलाकार छतामुळे फिरणारा आवाज, याविषयी तुम्ही ऐकलं असेल.
आणखी एक उदाहरण आहे. तुमच्या बाथरुमचं. बाथरूममध्ये बऱ्याच जणांना गाणं गाण्याची सवय असते. कारण, बाथरूममध्ये आपल्याला खूप रिलॅक्स वाटत असतं.
याउलट, गोंगाटाचा संबंध नैराश्याशी आहे. गोंगाटामुळे कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. वास्तू आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध असल्याचं संशोधनातूनही सिद्ध झालं आहे.
खूप गर्दी आणि गोंगाट असलेल्या इमारतीत राहिल्याने तुमच्या मनात अगतिकतेची भावना दाटू शकते. तर उंच छत असलेली शांत खोली तुमच्या मनात अमूर्त विचारनिर्मिती करतात. तुम्हाला शांततेची अनुभूती देतात.
जेव्हा एखाद्या इमारतीतील ध्वनीचा तुमच्यावर परिणाम होतो
इस्तंबूलमध्ये एक पुरातन इमारत आहे. हॅगिया सोफिया. पूर्वी ख्रिस्ती चर्च आणि मशीद असलेल्या या इमारतीचं रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आलं आहे.
या इमारतीत गेल्यावर आपल्याला वेगळीच अनुभूती होते. पारलौकिक म्हणा हवं तर. म्हणजेच ही वास्तू आपल्यावर भावनिक परिणाम करते.
अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठात मध्ययुगीन कलेचे तज्ज्ञ बिसेरा पेंचेव्हा म्हणतात, "या इमारतीत एक ध्वनीचं सौंदर्य आहे, ते तुम्हाला ईश्वरी अनुभूती देतं."
जवळपास 1500 वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली. घुमटाकार बांधकाम, संगमरवराची फरशी आणि भिंती यामुळे इथे केलेला मंत्रोच्चार अलौकिक ध्वनित रुपांतरित होतो आणि समुद्राच्या उदरातून आवाज येत असल्याचा भास होतो. परिणामी ऐकणाऱ्याला उदात्तपणाची, अत्यानंदाची अनुभूती होते.
पेंचेव्हा म्हणतात, "ही वास्तू माणसाचं बोलणं आणि मंत्रोच्चार यांना मानवी भाषेच्या पलिकडे नेऊन ठेवते."
मुख्य प्रवाहातले आर्किटेक्ट्स आवाजाची गुणवत्ता अत्यंत गरजेची असणाऱ्या कॉन्सर्ट हॉलसारख्या बांधकामावेळीच ध्वनीलहरींचा विचार करतात.
मात्र, ही संकल्पना पुढेही नेता येईल. इमारत स्वतः एखाद्या वाद्याप्रमाणे असते जी लोकांना व्यापून टाकते. त्यांना शांत किंवा उल्हासित करण्याची किंवा त्यांना दुःखी करण्याची क्षमता इमारतींमध्ये असते. हे किती अद्भूत आहे.
ओरल आर्किटेक्चरमागचं शास्त्र
इमारतीतल्या आवाजाचा मानवी मेंदूच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामाविषयी करण्यात आलेल्या एका न्युरोलॉजिकल अभ्यासात असं आढळून आलंय की 110 हर्ट्सचा आवाज ऐकल्याने मेंदूतल्या भाषाकेंद्रातल्या हालचाली कमी झाल्या आणि त्या हालचाली मेंदूच्या भावनिक केंद्राकडे वळल्या.
माल्टामध्ये जमिनीखाली पाच हजार वर्षं जुनं एक प्रागैतिहासिक मंदिर आहे. त्याचं नाव आहे The Hypogeum of Hal Saffieni.
युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. या मंदिरात आवाज हुबेहुब घुमतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आवाज 110 हर्ट्सवर तीव्रतेचा होतो तेव्हा तोच आवाज परत येतो.
खूप आवाज एकत्र आल्यावर वाटतं, तसा हा अनुभव असतो. सर्व दिशांनी आवाज येतो. जोवर त्वचेला तो जाणवत नाही, तोवर हा आवाज येतच राहतो.
केवळ एकच ध्वनी वाढवणारी वास्तू आपल्यावर एवढा मोठा परिणाम करत असेल तर अनेक ध्वनी वाढवणाऱ्या खोलीचा आपल्या आकलन क्षमतेवर किती मोठा परिणाम होत असेल?
अमेरिकेतले आर्किटेक्ट शिआ मिशेल त्राहान सिमॅटिक (व्हायब्रेशन शास्त्राचा भाग) आणि त्रिमितीय (3D) प्रिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
याद्वारे ते अशी 3D इमारत बनविण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या इमारतीत तुम्ही गाणं गायलात तर ती इमारतही गाणं म्हणू शकेल किंवा तुमचा आवाज प्रतिध्वनीत करू शकेल.
व्यावहारिक उपयोग आणि उपचार
त्राहान यांच्याकडे एक योजनाही आहे. ते म्हणतात, "मी अशी जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय जी एक-एक स्वर वेगळा करेल. भारतात पाँडिचेरीतल्या ऑरोविलेमध्ये असलेल्या मातृमंदिराप्रमाणे. हे मातृमंदिर एखाद्या गोलघुमटाप्रमाणे आहे. तिथे ध्यानसाधना करतात. तेही प्रकाशाच्या एका किरणाकडे बघून."
ते पुढे सांगतात, "खरंतर हायपर-रिव्हर्बरंस आर्किटेक्चर्सने दिलेली देणगी आहे. यात ऐकणाऱ्याला उत्तम ऐकू यावं, यासाठी आवाज शक्य तितका वाढवला जातो."
आनंददायी वास्तू तयार करण्यापलिकडेही याचा वापर होऊ शकतो. अशा खोल्या बांधता येऊ शकतात ज्या PTSD, नैराश्य यासारखे मानसिक आजार किंवा पार्किन्सन सारख्या कंपवाताचा आजार असलेल्या रुग्णांवर 'सोनिक थेरपी'ने उपचार करता येतील. अशा रुग्णांसाठी 'Immersive Sonic Therapy Rooms' म्हणजेच त्रिमितीय अनुभव देणाऱ्या ध्वनिक उपचार खोल्या तयार करता येऊ शकतील.
अमेरिकेतल्या बाल्टिमोरमधल्या जॉन्स हापकिन्स विद्यापीठातल्या इंटरनॅशनल आर्ट्स अँड माइंड लॅबच्या कार्यकारी संचालक असलेल्या सुसॅन मॅगसामेन एका बहुआयामी प्रकल्पात सहभागी आहेत. मेंदूच्या दुखापतीतून सावरणाऱ्या मुलांना बरं करण्यात मदत करतील, अशा आगळ्यावेगळ्या खोल्या बनवण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतर्गत सुरू आहे.
केनेडी क्रेगर बाल रुग्णालयातल्या या 'सेंसरी केअर रुम' आवाज कस्टमाईझ्ड करतील. उदाहरणार्थ उपचार घेणाऱ्या मुलाच्या आईचा आवाज किंवा गाणं, आवडता वास, तापमान आणि उजेड हे सर्व अशा प्रकारे कस्टमाईझ्ड करण्यात येईल, जेणेकरून उपाचर घेणाऱ्या बाळाला बरं वाटेल आणि त्याला दुखापतीतून लवकरात लवकर सावरायला मदत करेल.
एकूण काय तर यापुढे तुम्हाला एखादं नवं घर आवडलं तर ते केवळ दिसायला किती छान आहे, यापेक्षा ते तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे का, याचा विचार करा.