Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?

भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?
, मंगळवार, 23 मार्च 2021 (15:19 IST)
रेहान फजल
लाहोर सेंट्रल जेलमधील 23 मार्च 1931 ची सुरुवात इतर दिवसांसारखीच होती. सकाळी सकाळी आलेलं वादळ वगळल्यास इतर गोष्टी सारख्याच होत्या.
 
मात्र, तुरुंगातील कैद्यांना थोडसं वेगळं वाटलं, कारण पहाटे चार वाजता वॉर्डन चरत सिंहने येऊन सांगितलं की, सगळ्यांनी आपापल्या कोठड्यांमध्ये जा.
 
मात्र, चरत सिंहने कारण सांगितलं नाही. वरिष्ठांकडून आदेश असल्याचंच त्यांनी सांगितलं.
 
नेमकं काय घडलंय, याचा विचार कैदी करत असतानाच, तुरुंगातील नाभिक बरकत पुटपुटत गेला की, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली जाणार आहे.
 
हे कानावर पडल्यानंतर काहीसे निश्चिंत असलेल्या कैद्यांमध्ये अस्वस्थता पसरली. कैद्यांनी बरकतला विनवण्या केल्या की, भगतसिंग यांच्या काहीही गोष्टी असतील, मग पेन, कंगवा किंवा घड्याळ, ते आम्हाला आणून द्या. जेणेकरून आम्ही आमच्या नातवंडांना सांगू शकू की, आम्ही भगतसिंग यांच्यासोबत तुरुंगात होतो.
बरकत भगतसिंग यांच्या कोठडीत गेला आणि त्यांचं पेन, कंगवा घेऊन आला. सर्व कैद्यांमध्ये एकप्रकारे स्पर्धा सुरु झाली की, त्या वस्तू कुणाला मिळायला हव्यात. अखेर चिठ्ठी उडवण्यात आली.
 
लाहोर कॉन्स्पिरसी केस
आता सर्व कैदी शांत झाले होते. त्यांच्या नजरा कोठडीबाहेरून जाणाऱ्या रस्त्याकडे लागल्या होत्या. भगतसिंग आणि त्यांचे साथीदार शेवटचा प्रवास त्याच मार्गाने करणार होते.
त्यापूर्वी एकदा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना त्याच रस्त्यानं घेऊन जात होते, त्यावेळी पंजाब काँग्रेसचे नेते भीमसेन सच्चर यांनी मोठ्या आवाजात विचारलं होतं की, तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी लाहोर कॉन्स्पिरसी केसमध्ये स्वत:चा बचाव का केला नाही?
 
त्यावेळी भगतसिंग यांनी उत्तर दिलं होतं की, "क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावीच लागते. कारण त्यांचे प्राण गेल्यानेच मोहिमेला आणखी ताकद मिळते. कोर्टात अपिल केल्यानं मोहिमेला ताकद मिळत नाही."
 
वॉर्डन चरत सिंह हे भगतसिंग यांची काळजी घेत असत. त्यांच्याकडून जे शक्य होतं, ते सर्वकाही चरत सिंह हे करत असत. चरत सिंह यांच्यामुळेच लाहोरच्या द्वारकादास लायब्ररीतून भगतसिंग यांच्यापर्यंत तुरुंगात पुस्तकं पोहोचत असत.
 
तुरुंगातील आयुष्य
भगतसिंग यांना पुस्तकं वाचनाचा छंद होता. त्यांनी एकदा त्यांच्या शाळेतील मित्र जयदेव कपूर यांना पत्रात कुलबीर यांच्या माध्यमातून काही पुस्तकं पाठवण्याची विनंती केली होती. त्यात कार्ल लिबनेख्त यांचं 'मिलिट्रिझम', लेनिन यांचं 'लेफ्ट विंग कम्युनिझम' आणि आप्टन सिंक्लेयर यांच्या 'द स्पाय' या पुस्तकांचा समावेश होता.
भगतसिंग यांचं तुरुंगातील आयुष्य फारच खडतर होतं. त्यांच्या कोठडी क्रमांक 14 ची फरशी नीट नव्हती. फरशी इतकी खराब अवस्थेत होती की, गवत उगवलं होत. भगतसिंग यांचं पाच फूट दह इंचाचं शरीर कसंतरी त्या कोठडीत झोपू शकेल, एवढीच ती कोठडी होती.
 
भगतसिंग यांना फाशी देण्याच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. मेहता यांनी नंतर लिहिलंय की, भगतसिंग त्यांच्या छोट्याशा कोठडीत एखाद्या वाघाप्रमाणे फेऱ्या मारत होते.
 
'इंकलाब जिंदाबाद'
भगतसिंग यांनी हसत हसतच मेहतांचं स्वागत केलं आणि विचारलं, तुम्ही माझं 'रिव्हॉल्युशनरी लेनिन' पुस्तक आणलं नाही का?
 
मेहतांनी ते पुस्तक दिल्यानंतर भगतसिंग यांनी तातडीने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यांनी एवढ्या तातडीने पुस्तक वाचायला सुरुवात केली, जसं की त्यांच्याकडे आता वेळच उरला नाही.
मेहतांनी त्यांना विचारलं, तुम्ही देशाला काही संदेश देऊ इच्छित आहात? तेव्हा भगतसिंग यांनी पुस्तक वाचतानाच म्हटलं, "केवळ दोन संदेश... साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इंकलाब जिंदाबाद!"
 
त्यानंतर भगतसिंग यांनी मेहता यांना सांगितलं की, "पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना धन्यवाद सांगा. या दोघांनीही माझ्या खटल्यात गांभिर्यानं लक्ष घातलं."
 
भगतसिंग यांना भेटल्यानंतर मेहता राजगुरूंना भेटायला गेले.
 
राजगुरू यांचे अंतिम शब्द होते की, "आपण लवकरच भेटू."
 
सुखदेव यांनी मेहतांना सांगितलं की, फाशीनंतर जेलरकडून कॅरम बोर्ड घेऊन जा, जो काही महिन्यांपूर्वी दिला होता.
 
तीन क्रांतिकारक
मेहता निघून गेल्यानंतर तुरुंगाधिकाऱ्यांनी तिन्ही क्रांतिकाराकांना सांगितलं की, त्यांना नियोजित वेळेच्या 12 तास आधीच फाशी दिली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फाशी देण्याऐवजी त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता फाशी दिली जाईल.
 
मेहतांनी दिलेल्या पुस्तकाची काही पानंच भगतसिंग वाचू शकले होते. भगतसिंग यांच्या तोंडून शब्द निघाले, "तुम्ही मला या पुस्तकाचं एक प्रकरणही पूर्ण वाचू देणार नाही का?"
भगतसिंग यांनी तुरुंगातील मुस्लीम सफाई कर्मचारी बेबेला सांगितलं की, फाशीच्या आधी तुमच्या घरून जेवण घेऊन या.
 
मात्र, बेबे भगतसिंग यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. कारण भगतसिंग यांना 12 तास आधीच फाशी देण्यासाठी नेण्यात आलं आणि त्यानंतर बेबे यांना गेटच्या आत शिरूच दिलं नाही.
 
स्वातंत्र्याचं गीत
थोड्या वेळाने तिन्ही क्रांतिकारकांना फाशीच्या तयारीसाठी कोठडीतून बाहेर नेण्यात आलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हात जोडले आणि आवडतं स्वातंत्र्यगीत गाण्यास सुरुवात केली :
 
कभी वो दिन भी आएगा
 
कि जब आज़ाद हम होंगें
 
ये अपनी ही ज़मीं होगी
 
ये अपना आसमाँ होगा.
 
त्यानंतर तिघांचंही एक एक करून वजन मोजलं गेलं. तिघांचंही वजन वाढलं होतं. शेवटची अंघोळ करण्यास तिघांनाही सांगण्यात आलं. त्यानंतर काळे कपडे परिधान करण्यास दिले गेले. मात्र, त्यांचे चेहरे उघडेच ठेवण्यात आले.
 
चरत सिंह हे भगतसिंग यांच्या कानाशी पुटपुटले, वाहे गुरुला आठवा.
 
फाशी
भगतसिंग म्हणाले, "संपूर्ण आयुष्यात मी ईश्वराची आठवण काढली नाही. अनेकदा तर गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे ईश्वारावर टीकाही केलीय. जर मी आता त्याची माफी मागितली, तर तो म्हणेल याच्यापेक्षा घाबरट कुणी नाही. याचा शेवट जवळ येतोय. त्यामुळे हा माफी मागायला आलाय."
तुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले. कैद्यांना दुरुनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले. सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है..."
 
सगळ्यांनी 'इंकलाब जिंदाबाद' आणि 'हिंदुस्तान आजाद हो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. फाशीचा दोरखंड जुना होता, मात्र फाशी देणारे तंदुरुस्त होते. फाशी देण्यासाठी लाहोरजवळील शाहदरा येथून जल्लाद बोलावण्यात आला होता.
 
भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या मधे उभे होते. भगतसिंग हे आईला दिलेला शब्द पूर्ण करू इच्छित होते. फाशीवेळी 'इंकलाब जिंदाबाद'ची घोषणा त्यांना द्यायची होती.
 
लाहोर सेंट्रल जेल
लाहोर जिल्हा काँग्रेसचे सचिव पिंडी दास सोंधी यांच्या घराच्या अगजदी जवळच लाहोर सेंट्रल जेल होतं. भगतसिंग यांनी एवढ्या मोठ्या आवाजात 'इंकलाब जिंदाबाद'ची घोषणा दिली होती की, सोंधी यांच्या घरापर्यंत ऐकायला आलं.
 
भगतसिंग यांचा आवाज ऐकताच तुरुंगातील इतर कैदीही घोषणा देऊ लागले. तिन्ही क्रांतिकारकांच्या गळात फाशीचा दोर बांधण्यात आला. त्यांचे हात-पाय बांधण्यात आले. तेव्हा जल्लादाने विचारलं, सर्वांत आधी कोण फासावर जाईल?
सुखदेव यांनी सर्वात आधी फासावर जाण्याबाबत होकार दिला. जल्लादाने एक एक करुन दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखाली आधारासाठी असलेल्या ठोकळ्याला पाय मारून हटवलं. बराच वेळ तिघांचेही मृतदेह लटकलेलेच होते.
 
नंतर तिघांचेही मृतदेह खाली उतरवले गेले. तिथं उपस्थित असलेले लेफ्टनंट कर्नल जेजे नेल्सन आणि लेफ्टनंट कर्नल एनएस सोधी यांनी तिघांनाही मृत घोषित केलं.
 
अंत्यसंस्कार
एका तुरुंगाधिकाऱ्यावर या फाशीचा इतका परिणाम झाला की, त्याला जेव्हा तिघांच्याही मृतदेहांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्याने नकार दिला. त्याला तिथल्या तिथे निलंबित करण्यात आलं. त्यानंतर एका कनिष्ठ अधिकाऱ्याने ओळख पटवली.
 
तुरुंगाच्या आतच या तिघांचेही अंत्यसंस्कार करण्याची आधी योजना होती. मात्र, तुरुंगाधिकाऱ्यांना वाटलं की, तुरुंगातून धूर येताना दिसला, तर बाहेरील गर्दी तुरुंगावर हल्ला करू शकते.
त्यामुळे तुरुंगाची मागची भिंत तोडण्यात आली आणि त्यामार्गे एक ट्रक तुरुंगाच्या आता आणलं गेलं. त्यात अत्यंत अपमानजनक पद्धतीने मृतदेह टाकण्यात आले.
 
रावी नदीच्या किनाऱ्यावर त्यांचं अंत्यसंस्कार केले जातील, असं ठरवलं गेलं होतं. मात्र, रावी नदीत पाणी फारच कमी होतं. त्यामुळे सतलज नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
लाहोरमध्ये नोटीस
तिघांचेही मृतदेह फिरोजपूरजवळ सतलजच्या किनाऱ्यावर आणले गेले. तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. यावेळी पोलीस उपाधीक्षक कसूर सुदर्शन सिंह यांनी कसूर गावातील पुजारी जगदीश अचरज यांना बोलावलं.
 
मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू झाले आणि लोकांनाही कळलं. लोक आपल्या दिशेनं येताना पाहिल्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले. पूर्ण गावानं रात्रभर मृतदेहाला चहूबाजूंनी पहारा दिला.
दुसऱ्या दिवशी दुपारी जवळील मॅजिस्ट्रेटच्या सहीसह लाहोरमधील अनेक भागांमध्ये नोटीस चिकटवण्यात आल्या. या नोटिशीवर लिहिण्यात आलं होतं की, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर सतलज नदीच्या किनारी हिंदू आणि शीख रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
या बातमीनंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. अनेकांचं म्हणणं होतं की, अंत्यसंस्कार करणं तर दूर, त्यांच्या मृतदेहांना नीट जाळलंही गेलं नाही. जिल्हा मॅजिस्ट्रेटनं लोकांच्या या आरोपाचं खंडन केलं. मात्र, मॅजिस्ट्रेटवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं.
 
भगतसिंग यांचं कुटुंब
तिघांच्या सन्मानार्थ नीला गुंबदपासून तीन मैल एवढा मोर्चा काढण्यात आला. पुरुषांनी निषेध नोंदवण्यासाठी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या, तर महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या.
जवळपास सर्व लोकांच्या हातात काळे झेंडे होते. लाहोरच्या मॉलपासून अनारकली बाजारापर्यंत मोर्चा पोहोचला आणि तिथे थांबला.
 
अचानक पूर्ण गर्दीत एकप्रकारची भयाण शांतता पसरली. कारण तेव्हा एक घोषणा करण्यात आली की, तिन्ही शहीदांचे उरलेले उवशेष घेऊन त्यांचे कुटुंबीय इथं आलेत.
 
फुळांनी सजवलेल्या शवपेट्यांमध्य तिघांचेही मृतदेह तिथे आणल्यानंतर, लोक भावूक झाले. उपस्थित लोक आपले अश्रू रोखू शकले नाहीत.
 
ब्रिटीश साम्राज्य
तिथे एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक मौलाना जफर अली यांनी नज्म वाचली.
तिकडे जड पावलांनी वॉर्डन चरत सिंह त्यांच्या खोलीत पोहोचले आणि हमसून हमसून रडू लागले. आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शेकडो जणांना फासावर लटकताना पाहिलं होतं. मात्र, कुणाच्या मृत्यूमुळे त्यांना इतकं दु:खं झालं नव्हतं, जितकं भगतसिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या मृत्यूमुळे झालं होतं.
 
कुणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की, या फाशीच्या 16 वर्षांनंतर भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा अंत होईल आणि भारतीय भूमीवरून ब्रिटीश कायमचे निघून जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात आणखी दोन दिवस पाऊस कायम राहणार