16 एप्रिल रोजी पालघर येथे जे काही घडले त्याने संपूर्ण देशातील समाजमन सुन्न झाले आहे. लॉकडाऊन असतानाही शेदीडशे लोकांचा जमाव येतो काय आणि रस्त्याने जाणार्या तीन वाटसरुंचा सरळसरळ जीव घेऊन मोकळा होतो हा प्रकारच अनाकलनीय ठरला आहे.
ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीचा धक्का ओसरताच या घटनेवर राजकारणही सुरु झाले. ते राजकारण अजूनही सुरुच आहे. यात नेमका मूळ विषय बाजूला तर पडणार नाही ना अशी भीती आता जाणवू लागली आहे.
घटना अशी घडली की, नाशिकचे सुशीलगिरी महाराज कल्पवृक्ष गिरी महाराज हे एका खासगी वाहनाने नाशिकहून गुजराथेत जायला निघाले होते. गुजराथेत गुरु महंतराम गिरी महाराज यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अन्त्यदर्शनासाठी ते दोघे निघाले होते. पालघर जिल्ह्यातून हे महाराष्ट्र आणि दादरानगर हवेलीच्या सीमा रेषेवर पोहचले असता तेथून त्यांना परत पाठवण्यात आले. त्यामुळे आड रस्त्याने ते गडचिंचली या गावातून जात होते. तेथून अगदी थोड्या अंतरावर वनविभागाची चौकीही होती.
गडचिंचलीत आले असता तिथेच त्यांची गाडी अडवली गेली त्याठिकाणी जमावाने त्यांना मारहाण केली. यावेळी गडचिंचलीच्या सरपंच तिथे पोहोचल्या. दरम्यानच्या काळात पोलिसांनाही ही खबर मिळाल्यामुळे पोलिसही पोहचले होते. सरपंचांनी या तिघांनाही (दोन प्रवासी आणि वाहनचालक निलेश तेलगडे) पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस चौकशी सुरु असतानाच आजूबाजूच्या गावातून सुमारे 150-200 लोकांचा जमाव तेथे पोहचला आणि त्यांनी पोलिसांशीही झटापट करत या तिघांनाही आपल्या ताब्यात घेतले. हा जमाव सशस्त्र होता अशी माहिती आहे. या जमावाने केलेल्या मारहाणीत हे तिघेही घटनास्थळीच ठार झाले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगेचच पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक करून गावात शांतता प्रस्थापित केली. मात्र ही माहिती जनसामान्यांपर्यंत पुढले दोन दिवस दडवून ठेवली होती. 19 एप्रिलला या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आणि मग हालचाली सुरु झाल्या. सध्या 110 आरोपींना अटक झाली असून त्यांची पोलिस कोठडी घेतली असल्याची गृहविभागाची माहिती आहे. इतर फरार आरोपींना शोधणे सुरु आहे.
सरकारी सूत्रानुसार डहाणू तालुक्यातील या परिसरात सध्या रात्री चोर आणि दरोडेखोर येत असून त्यांना शोधण्यासाठी नागरिक गस्त घालत होते आणि या तिघांनाच दरोडेखोर समजून मारहाण केली आणि त्यातून ही हत्या झाली. मात्र राज्यातील विरोधी पक्षांनी या संदर्भात वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. या उत्तरात राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने हा भाजपचाच डाव असल्याची टीका केली आहे. विश्व हिंदू परिषदेने या घटनेमागे कम्युनिस्ट आणि पालघर जिल्ह्यातील ख्रिश्चन मिशनरी यांचा हात असल्याचा दावा केला आहे. भाजप नेत्या उमाभारती यांनी तर या स्वामींच्या हत्येच्या पापात महाराष्ट्र सरकार भस्मसात होईल अशी शापवाणी उच्चारून टाकली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. एकूणच या घटनेवर सुरु झालेले राजकारण आता तापताना दिसते आहे.
मुख्यमंत्री म्हणतात त्या प्रमाणे या हत्या गैरसमजूतीतून घडल्या असे गृहित धरले तर अनेक प्रश्न निर्माण होतात. याला कारण असे की पालघर पोलिसांच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रेसनोटमध्ये सुमारे 400 ते 500 समांनी कट रचून आणि गैरकायद्याची मंडळी जमवून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. ही प्रेसनोट पोलिसांनी 18 एप्रिल रोजी प्रकाशित केली तर मुख्यमंत्र्यांनी 20 एप्रिलला माध्यमांवरून ही माहिती दिली आहे. इथे मुख्यमंत्री आणि गृहविभाग यांच्यातच विरोधाभास निर्माण झाला आहे.
विश्व हिंदू परिषदेने या घटनेमागे मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि ख्रिश्चन मिशनरी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपातील तथ्य तपासणे गरजेचे वाटते. आजचा पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग होता. ठाणे जिल्ह्यातील हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी वारली या जमातीचे आदिवासी मोठ्या संख्येत वास्तव्याला आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या परिसरात या आदिवासींच्या उत्थानासाठी तत्कालिन मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्या गोदुताई परुळेकर यांनी आयुष्य खर्ची घातले होते. त्यामुळे या वारली आदिवासींचा विकास निश्चितच झाला. मात्र त्याचबरोबर गोदूताईंच्या नेतृत्वात कम्युनिस्ट चळवळही या क्षेत्रात रुजली. आजही या क्षेत्रात या चळवळीची पाळेमुळे रुजलेली आहेत. याचे प्रत्यंतर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत आले. संपूर्ण महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निवडून आलेला एकमेव आमदार याच डहाणू मतदार संघातून निवडून आला आहे.
देशात ख्रिस्ती बांधवांनी आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी सुरुवातीपासून आदिवासी आणि दलित वस्त्यांना आपले लक्ष्य केले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील हा आदिवासी पट्टा साहजिकच गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे कार्यक्षेत्र राहिलेला आहे. या क्षेत्रात आजही ख्रिस्ती मिशनेरींचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे देखील या पालघर जिल्ह्यातील वसईचेच आहेत. ख्रिस्ती धर्म बांधव आपल्या धर्माचा विस्तार करण्यासाठी अतिशय आक्रमक असतात. या परिसरातही त्यांचा असाच आक्रमक विस्तार आजही सुरु आहे. विशेष म्हणजे आपला विस्तार करताना इतर धर्मियांप्रती आकस निर्माण करणे ही देखील त्यांची कार्यपद्धती आहे. या परिसरातही त्यांनी लोकांना आपल्या धर्माबद्दल समजवून देताना भारतीय देव हे एक वानराचा अवतार तर दुसरा हत्तीचा अवतार असल्याने ते काय तुमचे भले करणार असा प्रश्न उपस्थित करत म्हणूनच तुम्ही येशू ख्रिस्तीला शरण या असे आवाहन करीत असल्याची बातमी एका पोर्टलवर वाचण्यात आली होती. या आक्रमकतेतूनच मग संघर्ष निर्माण होतात असे संघर्ष या परिसरात अनेकदा झाल्याचे बोलले जात आहे. ही घटना घडण्याआधी दोन दिवसांपूर्वीच अशा प्रकाराने एका डॉक्टरवर हल्ला झाल्याची माहिती चर्चेच्या माध्यमातून कानावर आली.
गेल्या काही वर्षात या परिसरात हिंदुत्ववादी गतीविधींना आळा घालण्यासाठी डाव्या विचारसणीचे कार्यकर्ते आणि ख्रिस्ती मिशनरी एकत्र आले असल्याची माहिती आहे. मधली काही वर्षे या परिसरात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विधानसभेत निवडून जात होता. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले निवडून येण्यामागेही हेच कारण असल्याचे बोलले जाते. हे दोन्ही गट एकत्र येऊन अशा हिंदुत्ववादी कार्यक्रमांना कायम विरोध करत असल्याची चर्चा त्या परिसरातील नागरिकांशी बोलल्यावर कानावर आली.
ही बाब जर खरी असेल तर विश्व हिंदू परिषदेच्या आरोपात तथ्य असू शकते. इथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. ज्यावेळी हे दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक एकत्र निघाले त्यावेळी सर्वप्रथम गावातील नागरिकांनी त्यांना अडवले. यावेळी गावातील सरपंचांनी मध्यस्थी करून या तिघांना पोलिसांच्या हवाली केले. यानंतर काही वेळाने आजूबाजूच्या गावातून मोठा जमाव या गावात येतो, सोबत शस्त्र देखील घेऊन येतो. आणि पोलिसांना न जुमानता या तिन्ही पीडितांना पोलिसांकडून हिसकावून घेत जिवे मारतो. या घटनाक्रमात पहिल्यांदा या पीडितांना पोलिसांच्या हवाली केल्यानंतर काही वेळातच बाहेरच्या गावातून सशस्त्र जमाव पोहोचतो आणि तोही लॉकडाऊन असताना ही बाबच काहीशी संशयास्पद वाटते.
दुसरा मुद्दा असा की, या घटनेनंतर पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली त्यात या परिसरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने दिसतात. त्यातही जे फरार आहेत तेही कम्युनिस्ट पक्षाचेच असल्याचे बोलले जाते. यात एक जिल्हा परिषद सदस्य तर आणि काही प्रमुख मंडळीही आहेत. यांनीच या प्रकरणात पुढाकार घेतला असल्याचीही चर्चा आहे. अटक झालेल्यांमध्ये ख्रिस्ती बांधव ही मोठ्या संख्येत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर स्थानिकांकडून असेही कळले की अटक झालेल्यांचा जामिन घेण्यासाठी या परिसरातील ख्रिस्ती मिशनरी पुढाकार घेत असून हा लेख प्रसारित होईपर्यंत कदाचित त्यांचा जामिन झालेलाही असू शकतो. हे मुद्दे लक्षात घेता या पूर्ण घटनाक्रमाच्या मागे विश्व हिंदू परिषद म्हणते त्यानुसार डावे कम्युनिस्ट आणि ख्रिस्ती मिशनरी यांचा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या अडाम मास्तर यांनी एका पत्रकाद्वारे या प्रकरणात पक्षाचा हात असल्याचा आरोप नाकारला आहे.
अर्थात सध्या या प्रकरणात उभ्यपक्षी आरोप-प्रत्यारोपच सुरु आहे. या आरोप-प्रत्यारोपातून काही फारसे निष्पन्न होण्याची चिन्ह नाहीत. अशावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणे गरजेचे वाटते.
अर्थात सीबीआय चौकशीवरही थांबू नये. माझ्या मते राज्य आणि केेंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधींशांमार्फत करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. आपल्या देशात घटनेने प्रत्येकाला आपापल्या धर्मात राहून आपल्या आचारविचारांचे पालन करण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र असे करत असताना इतर धर्मियांवर अशा प्रकारे अत्याचार करण्याचा किंवा कोणाचा जिव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. या प्रकरणात जर उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे गैरसमजूतीतून हा घडलेला प्रकार असेल तर आरोपींना पकडून शिक्षा होईलच. मात्र विश्व हिंदू परिषद म्हणते त्याप्रमाणे डावे कम्युनिस्ट आणि ख्रिस्ती मिशनरी यांनी रचलेले षडयंत्र असेल तर त्याचा पर्दाफाश व्हायलाच हवा आणि त्यातील दोषींना शिक्षा व्हायलाच हवी. तरच आपल्या देशाची सर्वधर्मसमभाव जपणारी धर्मनिरपेक्ष प्रतिमा फक्त कायमच राहणार नाही तर उजळून निघेल.
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही तर समजून घ्या राजे हो.....
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेखमालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.