राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. त्यांची आई मधुवंती ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. राज यांचे लग्न मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाले आहे. त्यांना एक मुलगा अमित ठाकरे,आणि एक मुलगी उर्वशी ठाकरे आहे.त्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश स्कूल ह्या स्कॉटिश ख्रिश्चन मिशनऱ्यांनी स्थापित केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या एक प्रसिद्ध शाळेत शिकली.
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती आल्यावर राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. २००६ च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. आपल्या समर्थकांच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ची स्थापना केली.
मनसेने परप्रांतियांचा मुद्दा, टोल नाके, मराठीचा मुद्दा कायम उचलुन धरला. मुंबईत येणारे उत्तरप्रदेशी आणि बिहारी लोकांवर त्यांनी कायम टिका केली. ३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी चिकटवलेली भित्तीपत्रे व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली. १३ फेब्रुवारी २००८ रोजी राज ठाकरे व समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली.
ऑक्टोबर २००८ मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना पळवून लावण्यात आले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले. राज ठाकरे यांच्या बोलण्याची पध्दत, आक्रमकता असल्याने नेहमीच जनतेसाठी उमेदचा पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रचारसभेत मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात. प्रभावी व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे म्हणजे मराठी माणासांवर प्रेम करणारे, त्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि महाराष्ट्राला लाभलेले एक दमदार नेते.