Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RIP नको श्रद्धांजली वाहा

RIP नको श्रद्धांजली वाहा
, गुरूवार, 25 जून 2020 (17:10 IST)
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रद्धांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुद्धा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय 'भयानक' लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ? जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुद्धा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हाला गाडतात की जाळतात ? कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रद्धांजली वाहू नका. ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे. 
 
RIP म्हणजे rest in peace.
कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका. "जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे." हे कुणाचे उद्गार आहेत ? ठाऊक आहे ? छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबना करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमिनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत "प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे". 
 
मात्र आपण हे काय करतो आहोत ?
REST IN PEACE म्हणजे 'शांतपणे पडून राहा.' हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमिनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी वर बसलेला तुझा न्याय करेल. तर आता तू जमिनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची... गाडलेल्या जागेतून सुटका नाही असे त्यांचा धर्म सांगतो. 
 
फरक नीट समजून घ्या
हिंदुधर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात, पुनर्जन्मासाठी. हिंदू त्याला RIP कसे म्हणतील? कारण आत्मा सद्गतीस गेला असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. पुढला जन्म प्रवास त्याचा नीट होवो असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत... मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढला जन्म घ्यावा म्हणून. पण इतर धर्म जे 'गाडतात' ते मृतत्म्याला 'जमिनीत शांत पडून राहा' सांगतात. कयामतपर्यंत तुझी सुटका नाही सांगतात.
 
हिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे जे 'मृत्यू' संदर्भात आहे. ते वाचाल तर RIP म्हणायची हिंमत करणार नाही हिंदू. हिंदूने 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणावे. देव मृतात्म्यास सद्गती देवो म्हणावे. म्हणजे .. ही जी व्यक्ती वारली आहे ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो. एवढेच कशाला ? एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म मरणाचा; पुनर्जन्माचा फेरा न देता 'मोक्ष' द्यावा अशीही प्रार्थना करता येते.
 
RIP लिहिणे ही आपल्या स्वधर्मींय मृताची 'विटंबना' आहे हे लक्षात घ्या. सावध व्हा. सावध करा. आणि हिंदू माणसाच्या मरणावर RIP लिहायला 'विरोध' करा. कृपया मेलेल्या हिंदू माणसाला त्याच्या मृत्यूनंतर RIP लिहून, बोलून 'बाटवू' नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द