Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधवा नाही तर स्त्री म्हणून स्वत:ची ओळख

bangles
webdunia

रूपाली बर्वे

, शुक्रवार, 20 मे 2022 (17:11 IST)
भारत हा एक प्राचीन देश आहे. येथे अनेक धर्माचे लोक राहतात आणि येथील समाजरचना अशी केली गेली आहे की पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. अर्थात पुरुष प्रधान देश जिथे स्त्रियांच्या वैयक्तिक ओळखीपेक्षा तिला वडील किंवा पतीच्या नावाने ओळखले जाते. स्वतंत्र व्यक्तिमत्व हा शब्द जणू स्त्रियांसाठी नाहीच.
 
एकेकाळी आपल्या देशात बालविवाह होत असत. मुलगा असो वा मुलगी लहान वयात त्यांचे लग्न लावले जात होते. त्यावेळी अनेक रोग असाध्य होते त्यामुळे अशा परिस्थितीत मुलाचा लहान वयात मृत्यू झाल्यावर मुलीला पुन्हा लग्न करण्याचे स्वातंत्र्य देखील नव्हते. विचार इतके कुजलेले होते की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या डोक्यावरचे सर्व केस सुद्धा कापले जात होते. तिला नवर्‍याची विधवा म्हणून संपूर्ण आयुष्य घालवावे लागायचे. सर्व रंगांचा त्याग करुन पांढरे किंवा लाल वस्त्र धारण करावे लागत होते. तिला कोणत्याही प्रकाराचे दागिने घालण्यास किंवा श्रृंगार करण्यास मनाई होती.

शिवाय तिच्यावर विविध अत्याचार केले जात असे. कोणत्याही धार्मिक किंवा मां‍गलिक कार्यात तिची सावली देखील मान्य नसायची. समाजात विधवेकडे हीन म्हणून पाहिले जायचे. घरातील शुभकार्यात तिचा समावेश केला जात नव्हता कारण ती विधवा असल्यामुळे शुभ कार्यासाठी अशुभ असल्याचा युक्तिवाद केला जात होता. इतकच नव्हे तर तिला शेजारी आणि नातेवाइकांकडे जाण्यावर देखील बंदी असायची.

पण अलीकडेच पुरोगामी राज्य म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात विधवा प्रथा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला विधवा झाल्यावर मंगळसूत्र काढणे, पांढऱ्या साड्या नेसणे, बांगड्या फोडणे ही प्रथा बंद करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात परिपत्रक जारी करून ही सनातनी प्रथा बंद करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना दिले आहेत. विधवेची बांगडी फोडण्याची, सिंदूर पुसण्याची, मंगळसूत्र काढण्याची प्रथा आता राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा पुढाकार
परंपरेनुसार पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केला होता. या प्रथेविरोधात त्यांनी पुढाकार घेत 4 मे रोजी ग्रामसभेत हा ठराव मांडला तो एकमताने मंजूर करण्यात आला. सरकारने 17 मे 2022 रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व ग्रामपंचायतींना विधवात्वाच्या जुन्या प्रथेपासून मुक्त होण्याचे आवाहन केले.

कोल्हापुरात आलेला महापूर आणि नंतरच्या कोरोना काळात अनेकांच्या घरातील कर्ती माणसे मरण पावली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विधवांचा मानसन्मान कायम राहावा तसेच सामाजिक बहिष्कारासारख्या वाईट गोष्टी संपुष्टात याव्यात म्हणून ग्रामसभेने याबाबतचा ठराव मंजूर केला होता.

कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा म्हणून ओळखला जातो तसेच यंदाचे वर्ष हे राजर्षींच्या स्मृतिशताब्दीचे आहे. शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून या क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले तसेच ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. प्रथा बंद करण्यासाठी महिलांच्या या धाकड प्रयत्नाचे कौतुक होत आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने आता हेरवाड ग्रामपंचायत ‘पॅटर्न’ सर्व राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.

नाशिकच्या महिलेचा पुढाकार! विधवा सुगंधाबाईंनी घातले जोडवे, लाल टिकली लावून मंगळसूत्रही घातले
पतीच्या निधनामुळे विधवा झालेल्या सुगंधाबाईंनी पायाच्या बोटात जोडवे घातले, लाल टिकली लावली आणि मंगळसूत्रही घातले. जुनाट परंपरांना छेद देत सुगंधाबाईंनी समाजासमोर एक नाव आदर्श ठेवलं आहे. याबाबत सुगंधाबाई म्हणाल्या की, “समाजातील कुप्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. आमच्या घरात आम्ही अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहे. आपल्या घरातून त्याची सुरुवात करावी म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. या कुप्रथांमुळे त्रास होत होता. दुय्यम दर्जाची वागणुक मिळत होती. त्यामुळे आज आनंद होत आहे”

समाजाच्या परंपरांना झुगारून विधवा महिलांसाठी हळदीकुंकू 
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आवळाई गावातील विधवा असलेल्या लता बोराडे यांनी विधवा आणि सवाष्ण महिलांसाठी हा हळदीकुंकू कार्यक्रम ठेवून समाजाला दाखवून दिले की विधवा होणे काही पाप नाही. समाजात मिळणारे त्रासदायक चटके सहन केल्यावर त्यांनी ठरवलं विधवांना ताठ मानेने जगता आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवे. विपरित परिस्थितीला तोंड देत शिक्षण पूर्ण करुन लता ताईंनी विधवा महिला प्रतिष्ठान सुरू केलं ज्या माध्यमातून विधवांना मदत केली जाते.

पूर्वीपासून समाजासाठी झटणार्‍यांनी अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांचे उच्चाटन होण्याची मागणीच केली नव्हे तर त्यासाठी अपमान सहन करुनही आतोनात प्रयत्न देखील केले आहे. प्रबोधनकार ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक समाजधुरिणांनी महिलांवरील अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा क्रांतिकारी लिखाण आणि विचार समाजासमोर मांडले. सावित्रीबाई फुले यांनी तर विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि 1854 मध्ये विधवांसाठी आश्रम बांधला. नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला. तसेच सती प्रथा रोखण्यासाठी, पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

शहरात परिस्थिती कितीतरी पट सुधारलेली असली तरी अजून देशातील अनेक गावांमध्ये आणि लहान-सहान वस्तींमध्ये विधवा प्रथा पाळली जाते. नवरा गेल्यावर सार्वजनिकरीत्या स्त्रीचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे, जोडवी काढणे अर्थातच तिला विधवा असण्याची जाणीव करुन देणे चुकीचे आहे. आज देश विज्ञानवादी तसेच प्रगतीशील म्हणून वाटचाल करत असताना या प्रथा पालन करणे कितपत योग्य आहे. स्त्रीचे स्वत:चे असत्तिव अशाने पुसले जाते. तिच्या आत्मसन्मानाला ठेस लागते आणि आत्मविश्वास धुळीत मिळतो. समाजाचा बहिष्कार सहन होत नसल्याने पुढील जीवन दुर्भाग्यपूर्ण वाटू लागतं. म्हणून आता इतर समाज आणि राज्यात देखील वेळ आली आहे महाराष्ट्राप्रमाणेच क्रांतिकारी निर्णय घेण्याची.

ज्या स्त्रीमुळे सृष्टीची निर्मिती होते..कुटुंब वाढतं... घराला घरपण येतं.. तिचा अशा प्रकारे सन्मान हिसकावून घेणे तिच्या आत्म्याला ठेस पोहचवण्यासारखे आहे. साथीदाराचा मृत्यचा झाला म्हणून महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही हे इतर कोणी नाही तर पुरुष प्रधान समजाने बांधलेले नियम असावे. पूर्वीपासूनच स्त्रियांना चौकटीबाहेर पडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि देश प्रगतीच्या मार्गाला जात असताना ही हा संघर्ष सुरुच आहे. अशात भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी मिळाली म्हणून याचे अनुकरण करुन आदर्श ठेवून पुढे वाढावं आणि खासकरून स्त्रियांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार करावा. या त्रासातून निघत असलेल्या महिलांनी नव्या पीढीला बंधनात अडकवण्यापेक्षा या लढाईत त्यांच्या बाजूने उभे राहून स्वत:ची ओळख निर्माण करत सन्मानाने स्वतंत्र जीवन जगण्यासाठी मदत करावी.

समाजात तोंड उचलून असे बोलणारे देखील सापडतात की हे सौभाग्याची निशाणी आगांवर राहू दिल्याने काय पतीचं सुख मिळणार आहे का... पण त्या लोकांना हे समजून घेणं कदाचित अवघड असेल की शरीरसुखापेक्षा मानसिक सुख अधिक महत्त्वाचं असतं. विधवा महिलांना समाजाने सन्मानाने स्वीकारणं अधिक गरजेचं आहे. वैधव्य किंवा सवाष्ण ही मानसिकता बदलली पाहिजे.

समाजात अनेक स्तरावर अनेकदा पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर केशवपन करणे, दागिने काढून घेणे, गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू पुसण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर येतो आणि मुख्य म्हणजे या परंपरा पाळण्यासाठी महिलाच त्यांना भाग पाडतात. सौभाग्याची सगळी निशाणी पुसून टाकण्यासाठी सगळ्यांचे हात सरसावतात. पतीच्या मृत्यूनंतर महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे कृत्य थांबवावे यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तर स्त्रियांनो स्वतः साठी एवढं नक्कीच करा... स्वतःचा आत्मसन्मान जपा...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद चकमक बनावट होती, पोलिसांवर खुनाचा गुन्हा