स्थानिक पातळीवर उपाययोजना विकसित करण्यासाठी डॉक्टर आणि अभियंते ' मेधा (MEDHA) २०१८'च्या निमित्ताने एका व्यासपीठावर
आयआयटी मुंबईतील बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इन्क्युबेशन सेंटरतर्फे (बीइटीआयसी/BETiC) आयोजित अत्यंत रोमांचक अशी मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन म्हणजेच 'मेधा' ही स्पर्धा उत्साहात सुरू झाली आहे. मुंबईतील के. जे. सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील एमआयडी-एडीटी विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोइंजिनीअरिंग यांच्या सहकार्याने या संस्थांच्या कॅम्पसमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
"मेधा या वीकएंड हॅकेथॉनमध्ये भविष्यातील वैद्यकीय उपकरण संशोधकांची पारख करण्यात येते. आवश्यक वैद्यकीय गरजांची पूर्तता आणि मानवी आरोग्यावर थेट परिणाम करणाऱ्या नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिक आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी व इंडस्ट्रिअल डिझाइन शाखेतील विद्यार्थी या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात.", असे बीइटीआयसीचे (BETiC) प्रमुख प्राध्यापक बी. रवी यांनी सांगितले.
के. जे. सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयात ७-८ जुलै रोजी २०१८ या वर्षातील 'मेधा' या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला. या स्पर्धेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांनी बीइटीआयसीमधील मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय समस्यांवरील नावीन्यपूर्ण उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली आणि काही संकल्पना आखल्या. रविवारी या स्पर्धकांनी परीक्षकांच्या पॅनलसमोर पथदर्शक संकल्पना सादर केल्या.
क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचे (फुफ्फुसाचा विकार) निदान करण्यासाठी फुफ्फुसाच्या क्षमतेचे मापन करायचे असो वा प्रोस्थेटिक लिम्ब्स (कृत्रिम पाय) तयार करण्यासाठीचे माप असो, मेधाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी वाजवी खर्चातील उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यात येते.", असे बीइटीआयसीमधील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी डॉ. रुपेश घ्यार म्हणाले.
या क्षेत्रांमध्ये काम करणारे व्यावसायिक आणि वैद्यकीय, डिझाईन, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील जे विद्यार्थी नागपूरमध्ये २१-२२ जुलै किंवा पुण्यात ४-५ ऑगस्ट रोजी आयोजित होणाऱ्या मेधा या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी http://www.betic.org/ या वेबसाइटवर तपशील पाहावा आणि अर्ज करावा.
बीइटीआयसी (BETiC- म्हणजेच बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इन्क्युबेशन सेंटर हे केंद्र आयआयटी मुंबईत आहे. ४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (नागपूरमधील व्हीएनआयटी, पुण्यातील सीओई, मुंबईतील केजेएससीई, पुण्यातील एमआयटी-एडीटी) आणि ३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (सानपाडा येथील एमजीएमआयएचएस, वर्ध्यातील डीएमआयएमएस, डेरवण येथील बीकेएलडब्ल्यूएच) येथे या केंद्राची उपग्रह केंद्रे (सॅटेलाइट सेंटर्स) आहेत. वाजवी खर्चात स्थानिक पातळीवर उत्पादन आणि वापर करण्यासाठी उपयुक्त अशी वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरजीएसटीसी आणि केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.