Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कापूस कोंड्याची गोष्ट; सावरकर खलनायकच...

कापूस कोंड्याची गोष्ट; सावरकर खलनायकच...
, बुधवार, 29 मे 2019 (16:02 IST)
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर "स्वातंत्र्यवीर सावरकर; नायक की खलनायक" असे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचा मूळ विषय काय होता हे एबीपी माझा, प्रसन्न जोशी आणि नम्रता वागळे ह्यांनाही कळलेला नव्हता असं एकंदर चर्चासत्र पाहून माझे मत झाले आहे. म्हणजे सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली म्हणून ते खलनायक आहेत? की त्यांनी हिंदूराष्ट्राचा सिद्धांत मांडला म्हणून ते खलनायक आहेत? हे स्पष्ट झालं नाही. तरी प्रसन्न जोशी या बडबड्या पत्रकाराचा रोख त्यांनी हिंदूराष्ट्राचा सिद्धांत मांडला म्हणून ते खलनायक आहेत असा होता. पण उपस्थित असलेल्या सावरकर विरोधींनी हा मुद्दा न घेता सावरकर हे अहिंसक होते, त्यांनी माफी मागितली, त्यांनी अंदमानातून सुटल्यावर कोणतेच विशेष काम केले नाही, इंज्रजांच्या विरोधात लढा दिला नाही असाच त्यांचा सूर होता. म्हणून प्रसन्न जोशींना जो हिंदू राष्ट्रवादाचा मुद्दा मांडायचा होता तो समोर येऊ शकला नाही. आता मुद्दा आहे की सावरकरांनी हिंदू राष्ट्राचा मुद्दा मांडल्यामुळे ते खलनायक होते का? मुळात हिंदू राष्ट्राचा सिद्धांत सावरकरांनी मांडला तो सिद्धांत द्वीराष्ट्रवाद सांगणारा होता का? सावरकरांच्या ग्रंथांमध्ये, भाषणांमध्ये कुठेही द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत सापडत नाही. त्यांनी हिंदूराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता हे मात्र खरे आहे. पण हिंदू राष्ट्रात मुस्लिम वा इतर पंथांना थारा नाही असं कुठेही म्हटल्याचं आढळत नाही. मग ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, भारताला संविधान मिळालेले नव्हते त्या काळी हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मांडल्यामुळे ते खलनायक कसे ठरतील? आपण एका गोष्टीची गल्लत करतो ती अशी की कॉंग्रेस ही सेक्युलर आहे, म्हणजे कॉंग्रेसी हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती असा भेद मानत नाही. असं आपल्याला वाटतं. पण कॉंग्रेसची शिकवण ही गांधींची शिकवण असं ढोबळ मनाने मानलं तर गांधीजी तर जातीवाद मानायचे असेच दिसते, चातुर्वणाचा त्यांनी विरोध केला असेही कधी वाचनात वा ऐकीवात आलेले नाही. उलट रामराज्य निर्माण करायचे आहे असे त्यांचे स्वप्न होते. मग रामराज्य म्हणजे काय? तर सुराज्य असंही आपण ढोबळ मनाने मानून चालू. पण त्याकाळी रामराज्य ही संकल्पना मुस्लिमांना मान्य होती का? तर नव्हती. त्यांना पूर्ण स्वराज्यही मान्य नव्हते म्हणून भारताची फाळणी झालेली आहे. ही फाळणी पंथाच्या आधारावर झाली आहे हे विसरुन चालणार नाही. पाकीस्थान हे एकमेव असे जगातले राष्ट्र आहे ज्यासाठी मुस्लिमांना कोणताच संघर्ष करायला लागलेला नाही. 
 
महात्मा गांधींनी अखंड भारत का नाकारले हे सांगताना शेषराव मोरेंचे भक्त असं म्हणतात की जास्त प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या जर भारतात राहिली असती तर भारतावर संकट कोसळले असते म्हणून गांधीजींनी फाळणी करुन भारताला मुस्लिमांपासून वाचवले आहे. हे अगदी तंतोतंत त्यांचे शब्द आहेत असे नव्हे. पण एकंदर त्यांचा बोलण्याचा रोख असा असतो. गांधींनी भारताच्या रक्षणासाठी भारताची फाळणी केली. आता गांधीजी ज्या पक्षाचे होते त्या पक्षाच्या लोकांना हा मुद्दा मान्य आहे का? आणि मुळात गांधी नेहरुंना हा मुद्दा मान्य होता का? महात्मा गांधींनी असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केल्याचं कुठेच ऐकिवात किंवा वाचनात आलेलं नाही. जर कुणाकडे असेल तर त्यांनी नक्कीच दाखवावं. माहात्मा गांधींनी इतकी प्रवचने दिली, लेख लिहिले, भाषणं दिली... पण आपण भारताची फाळणी का करतोय असं जे शेषरावांना वाटतं ते मात्र गांधींनी कुठेच नमूद केलं नाही, त्यांना कुठेच व्यक्त व्हावसं वाटलं नाही. ही आश्चर्याची बाब आहे. गांधींजी पूर्वी फाळणीच्या विरोधात होते, नंतर त्यांनी फाळणी स्वीकारली हे सांगताना पाहा महात्माजी किती लवचिक होते, काळानुसार बदलले. जे हितकारक होतं तेच त्यांनी केलं. हे सांगताना त्यांनी जे सत्याचे प्रयोग चालवले होते, जे हिंदू मुस्लिम ऐक्याचे होते. ते प्रयोग फसले हे मात्र मान्य करायचे ते तयार नसतात. ज्या प्रमाणे महात्माजींना आतला आवाज ऐकू येत होता, त्याप्रमाणे ह्यांना गांधीजींचा आतला आवाज ऐकू येतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
 
आता सावरकरांवर जो माफीनामा किंवा त्यांनी अंदमानमधून सुटल्यावर काय केलं असे प्रश्न विचारले जातात त्यावर अनेक विद्वानांनी लिहून ठेवलेलं आहे, मीही माझ्या बुद्धीप्रमाणे थोडेफार लेख लिहिलेले आहेत. एकदा का तुम्ही एखाद्या विषयाचं खंडण केलं तर तुम्हाला त्या खंडणाचं खंडण करावं लागतं. तुम्ही तेच तेच प्रश्न आणि तोच तोच मुद्दा पुन्हा पुन्हा विचारु शकत नाही. ज्याप्रमाणे राहुल गांधी निवडणूकीच्या काळात राफेलवर उत्तर दिल्यानंतरही राफेल राफेल बोंबलत होते. एकदा का समोरच्याने उत्तर दिल्यावर त्याचं उत्तर चुकीचं आहे हे म्हणणं श्रेयस्कर असतं. पण उत्तर मिळाल्यानंतर पुन्हा त्या उत्तराकडे दुर्लक्ष करुन तेच प्रश्न उपस्थित करणं हे बुद्धिवंतांचं नव्हे तर मुर्खाचं काम आहे. तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? हो सांग ना... तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू... हो सांग ना... हा मुर्खपणा अशाप्रकारे सुरु राहतो. कॉंग्रेस किंवा त्यांच्या जीवावर जगणारे लोक जे आरोप करतात ती कापूस कोंड्याची गोष्ट आहे. त्यापुढे ते जायला तयार नाहीत. मुळात सावरकर हे विवादास्पद व्यक्तीमत्व आहे असं म्हणणंच चुकीचं आहे. कारण त्यांचं चरित्र आणि चारित्र्य अगदी सरळ आहे. पण कॉंग्रेसी नेत्यांचं चरित्र आणि चारित्र्य हे विवादास्पद आहे. ब्रह्मचर्येचे प्रगोय हा महात्मा गांधींच्या आयुष्यातला अत्यंत गलिच्छ अध्याय आहे. त्यावर कुणी चर्चा करायला तयार होईल का? चर्चे दरम्यान कुणी गांधी अभ्यासक म्हणाले की "हे लोक सांगतात की सावरकरांना ५० वर्षांची शिक्षा झाली मग ते दहा वर्षांत कसे काय सुटले?" असा प्रश्न गांधी अभ्यासक विचारतात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की सावरकरांनी ५० वर्षे जेलमध्ये राहायला पाहिजे होतं मग आम्ही त्यांचा आदर केला असता. ते लवकर सुटले म्हणजे ते ब्रिटिशांना मिळालेले होते. 
 
मग त्यांच्या लॉजिकनुसार अस प्रश्न त्यांना स्वतःला पडायला हवा की ब्रिटिंशांनी अंहिसक पद्धतीने कार्य करणार्‍या टिळकांना मंडालेला पाठवलं, लाला लजपतराय हे अहिंसक पद्धतीने प्रतिकार करत असताना देखील त्यांना मारहाण झाली, पण महात्मा गांधी व नेहरुंना ब्रिटिशांकडून जी ट्रिटमेंट मिळाली त्याबद्दल त्यांच्या मनात प्रश्न का उठत नाही? त्यांना कधीच कोणती मारहाण का झाली नाही? वगैरे वगैरे. खरं सांगायचं तर या असल्या वायफळ प्रश्नांना आणि मुद्द्यांना काही थारा नसतो. पण कॉंग्रेसींना जे प्रश्न पडतात ते चुकीचे आहेत व त्यांच्याच लॉहिजकनुसार वरील प्रश्न त्यांना पडायला पाहिजेत. मुख्य म्हणजे सावरकर जर ब्रिटिशांचे एजेंट होते असं आपण मान्य करुन चालून मग ब्रिटिशांनी त्यांच्या एजेंटकडे म्हणजे सावरकरांकडे देश का सोपवला नाही? उलट देश सोडल्यावर त्यांना त्यांच्या एजेंटमुळे भारतावर अप्रत्यक्षरित्या सत्ता गाजवता आली असती. सगळेच क्रांतीकार्यात उतरले असताना केवळ कॉंग्रेसलाच सत्ता स्थापनाचे निमंत्रण ब्रिटिंशांनी का दिले? मग त्यांच्याच लॉजिकनुसार ब्रिटिशांचा एजेंट कोण ठरतं? हे सगळे प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हरकत नाही. पण कदाचित त्यांना त्यांच्या नेत्यांची कमकूवत बाजू लपवायची आहे, ती लपवायची असेल तर सावरकर खलनायक असायलाच हवेत. ही कापूस कोंड्याची गोष्ट ते आपल्याला ऐकवत राहणार आहेत. आता प्रश्न असा आहे की आपल्याल अही कापूस कोंड्याची गोष्ट ऐकायचीय की खरा इतिहास ऐतिहासिक पुस्तके आणि तथ्यांद्वारे जाणून घ्यायचाय? हे आपल्यालाच ठरवायचंय... जर तसं करायचं नसेल तर, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा 'आयटी'वर परिणाम