हे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल की उद्धवजी हे मुख्यमंत्री होऊन एक वर्ष तर केव्हाच पूर्ण झालेलं आहे. मग ते मुख्यमंत्री होणार की नाही हा प्रश्न कुठे निर्माण होतो? परवा भाजपा युवा मोर्च्याने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं. त्या आंदोलकांवर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर राडा झाला. अनेक शिवसैनिकांनी म्हटलं की भाजपाला शिवप्रसाद मिळालेला आहे. यावरुन भाजपानेही क्लेम केलं की त्यांनीच शिवसैनिकांना प्रत्यूत्तर दिलेलं आहे. राणेंच्या सुपुत्रांनी तर थेट आव्हान दिलंय आणि आज वैभव नाईकांना दम देऊन रामप्रसाद दिल्याचंही भापजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. हा झाला दोन राजकीय पक्षातील मुद्दा. येणार्या मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हे सोशल मीडिया वॉर किंवा असल्या घटना घडतंच राहतील. निवडणूक जवळ आल्यावर अशा गोष्टींना ऊत येतोच. पण आपला आजच्या लेखाचा मुद्दा तो नाही.
माननीय उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. बाळासाहेबांनी कधीही कोणतंही संवैधानिक पद स्वीकारलं नव्हतं म्हणून त्यांना शिवसेनेसंदर्भात ठाम भूमिक घ्यायला अडचण नव्हती. शिवसेनेची सत्ता असतानाही बाळासाहेब विरोधकांवर हल्ला चढवायचे. राडा करणार्याण शिवसनिकांची स्तुती करायचे. ते पक्ष प्रमुख म्हणून त्यांचं कामंच होतं. पण जेव्हा एखाद्या पक्षातली व्यक्ती मुख्यमंत्री होते. तेव्हा त्या व्यक्तीचं दायित्व राज्यातील प्रत्येक घटकांसाठी समान असलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमोर कुणीही कॉंग्रेसी, भाजपाई, शिवसैनिक वगैरे नसतो. सगळेच त्यांची जनता असते. आता उद्धव ठाकरेंवर सतत आरोप केला जातो की ते अजूनही शिवसेना अध्यक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. शिवसेना चालवावी तसं राज्य चालवत आहेत. हे आरोप त्यांनी स्वतःच सिद्ध करुन दाखवले आहेत.
रीतसर परवानगी घेऊन काढलेल्या मोर्च्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला, काही लोकांनी असं म्हटलंय की त्यांनी माता भगिनींवरही हात उचलला आहे. अश्या शिवसैनिकांना बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. ज्यावेळी ते केवळ शिवसेना अध्यक्ष होते, तेव्हा अशाप्रकारच्या सत्कारावर कुणी हस्तक्षेप घेतला नसता. पण उद्धवजींना कदाचित अजून मुख्यंमंत्र्यांची कर्तव्ये लक्षात आलेली दिसत नाहीत किंवा त्यांना सल्ले देणार्यांचा संविधानाचा अभ्यास अगदीच कच्चा आहे असे दिसून येते. मुख्यंत्र्यांच्या या एका कृतीमुळे मुख्यमंत्री या पदावर डाग निर्माण होतो याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे. लोकशाही राज्यात राडे घालणार्यांचा सरकारी घटकाकडून सत्कार होत नाही तर त्यांच्यावर शासन केलं जातं. हाच सत्कार संजय राऊत वा इतर नेत्यांनी केला असता तर हा लेख लिहिण्याला कारण उरलं नसतं. पण उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. एकवेळ मी मानू शकतो की मनोमन उद्धवजींना शिवसैनिकांच्या कृतीने आनंद झाला आणि त्यांनी खासगीत आनंद व्यक्त केला असता तरी हस्तक्षेप घेण्याचं कारण नव्हतं.
पण उघडपणे राडे करणार्यां ना बोलवून सत्कार करणे म्हणजे ज्या लोकशाही राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, त्या लोकशाहीवर त्यांचा मुळीच विश्वास नाही असा संदेश लोकांपर्यंत जातो आणि महाराष्ट्राची मान खाली जाते. सध्या बंगालमध्ये असे चित्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. ममता बॅनर्जी मुघलांच्या पावलावर पाऊल ठेवत गुंडांना उघडपणे राजकीय संरक्षण देत आहे. पूर्वी डाव्यांचं राज्य होतं, तेव्हा किमान पदाचा तरी मान ठेवला जायचा. उघडपणे राजरोसपणे अशा गोष्टी घडत नव्हत्या. पण ज्या अत्याचाराच्या विरोधात ममता दिदी लढल्या.. आणि जिंकल्यावर त्यांनी अत्याचाराची परिसीमा गाठली. असे चित्र पुरोगामी महाराष्ट्रात बघायला चांगले वाटणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती दिव्य आणि भव्य आहे. शिवाजी महाराज हे माहाराष्ट्राचे आराध्य असून रायगड हे श्रद्धास्थान आहे. शिवसेनाच्या घटकपक्षांपैकी राष्ट्रवादी पक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो आणि कॉंग्रेस पक्ष स्वतःला अहिंसक गांधीवादी म्हणवून घेतो. पण आश्चर्य म्हणजे या कृतीवर दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महत्वाचं म्हणजे लोकांना गरज नसताना फुकट ज्ञान वाटप करणारे पुरोगमी मंडळी व मीडिया ह्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर बोट ठेवलेलं नाही. यावरुन त्यांचं पुरोगामीत्व किती खोटारडं आहे हे लक्षात येतं.
ही अतिशय लहान बाब वाटत असली तरी लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अतिशय घातक बाब आहे. आपण सतत शाहू-फुले-आंबेडकर ह्यांचा महाराष्ट्र आहे असं म्हणत असतो. पण जेव्हा या महापुरुषांची खरोखर गरज असते तेव्हा मात्र ह्या पुरोगाम्यांना त्यांचा व्यवस्थित विसर पडतो. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यंनी या गोष्टीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून आपलं वर्तन आणि कर्तव्ये शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींकडून जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर लोकांमध्ये असा संदेश जाईल की मुख्यमंत्र्यांना जनतेची काळजी नाही. जे जे स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेतात, त्यांचंच भलं आणि त्यांचंच संरक्षण करण्याचा ध्यास आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे का? असा संशय जनतेच्या मनात निर्माण होईल. म्हणून उद्धवजी ठाकरे ह्यांनी आता तरी शिवसेना अध्यक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडून खर्यार अर्थाने मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये बजावली पाहिजेत, मर्यादा ओळखल्या पाहिजेत व त्यानुसार आचरण केलं पाहिजे तरंच महाराष्ट्राची अस्मिता व शांतता आणि पुरोगामीत्व टिकेल.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री