जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर काआर्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. सान्ताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डोमेस्टिक) विमानतळाच्या आवारात (अरायवलमध्ये) देवव्रत मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारणार आहेत.
भारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्ती' चे मार्जरीन शिल्प ८ बाय ७ उंचीचे असणार आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १३०० ते १५०० किलो मार्जरीन वापरले जात आहे. १४ फेब्रुवारीपासून या कामाला सुरुवात करण्यात आली असून येत्या २४ फेब्रुवारीला येणाऱ्या महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ते पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या काआर्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असतील. विमानतळाच्या आवारात जनसमुदायांच्या समोर हे शिल्प साकारले जात असल्यामुळे त्याच्या सभोवताली काचेची चौकोनी भिंत उभारली जाणार आहे. जेणेकरून, हे भव्य शिल्प आकारास येताना प्रवाशांनादेखील त्याचा आस्वाद घेता येऊ शकेल.
या बद्दल आपले मत व्यक्त करताना देवव्रत यांनी सांगितले की, 'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहे, जे निर्मिती, संगोपन आणि विनाश ह्या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील ह्या पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागतं, आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय काआर्व्हिंगची कला मला अंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्ती' रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.' येत्या २४ फेब्रुवारीला 'त्रिमूर्ती' चे तयार झालेले हे मार्जरीन शिल्प लोकांना मोफत पाहता येणार आहे.
फळे आणि भाज्या काआर्व्हिंगमध्ये देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिकमध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. महालासकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्जरीनमध्ये साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे विविध देशातून मोठ्याप्रमाणात भाग घेण्या-या स्पर्धकांच्या यादीत या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणारे देवव्रत हे एकमेव शेफ होते. देवव्रत दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांसमोर येत असून, त्यांनी पुस्तक लिखाण, वृत्तपत्रीय लेखन देखील केले आहे. त्यामुळे त्यांना काआर्व्हिंग मास्टर असे देखील संबोधले जाते.
देवव्रत यांची मार्जरीन काआर्व्हिंगची हि अद्भुत कला मुंबईकरांना 'याची देही याची डोळा' पाहायला मिळणार असून, केवळ स्थानिकांसाठी नव्हे तर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील हि एक मोठी पर्वणी ठरणार आहे.