Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चैत्रगौरी सोहळा

चैत्रगौरी सोहळा
, बुधवार, 14 एप्रिल 2021 (09:22 IST)
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. या दिवसापासून देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर पूजा केली जाते. चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत देवीची पूजा केली जाते. गौरी म्हणजे शिवपत्नी पार्वतीची या रुपात पूजली जाते. 
 
चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा हा एक धार्मिक पारंपरिक सोहळा आहे. या महिन्यात स्त्रिया आपापल्या घरी समारंभ साजरा करतात. एका पाळण्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते. आपल्या सोयीप्रमाणे महिन्यातील एक दिवशी सवाष्ण जेवू घालण्याची प्रथा आहे तसंच व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी इतर स्त्रियांना हळदी-कुंकवाला बोलावतात. हळदी-कुंकवासाठी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ आणि करंजी देतात. या सोहळ्यात चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.
 
महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय. चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात. यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.
 
माहेरवाशिण देवीला नैवेद्यात कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड यासारखी फळे, भिजवलेले हरभरे असे पदार्थ अर्पण केले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध