सध्या महाराष्ट्राचे लाडके दैवत खंडेराया म्हणजेच खंडोबाचे नवरात्र सुरू आहे. तळी भंडारा तर असतो. त्या शिवाय त्यांची पूजा करण्याच्या विविध पद्धती आहेत पूजेची परापूजा श्रेष्ठ, मानसपूजा, मूर्तिपूजा आहेच त्या शिवाय षोडशोपचारी पूजा आणि पंचोपचारी पूजा असे ह्यांच्या पूजेचे काही प्रकार आहेत. चला तर मग थोडक्यात षोडशोपचारी आणि पंचोपचारी पूजेची माहिती-
* षोडशोपचारी पूजा -
षोडशोपचारी पूजा म्हणजे विविध सोळा उपचारांनी केलेली पूजा. या पूजेमध्ये पुढील दिलेले सोळा उपचार देवाला अर्पण करतात.
1 आवाहन - देवांचे ध्यान करून त्यांना बोलवतात.
2 आसन- देवांचे आसन नेहमी उंच असावे.
3 पाद्य -देवांचे पाय धुण्यासाठीचे पाणी.
4 अर्घ्य - पाय धुतल्यावर देवाचे सत्कार करण्यासाठी त्यांना पाणी घालून अर्घ्य देतात. या पाण्यात गंध, अक्षता घालून देवाला ते पाणी अर्पण करतात.
5 आचमन - पिण्यासाठी किंवा चूळ भरण्यासाठीचे पाणी.
6 स्नान - दूध, दही, मध, तूप, साखर अश्या पंचामृताने देवाला स्नान घालणे. ह्याला पंचामृत स्नान असे म्हणतात. या नंतर गंधोदकाने स्नान घालावे.
7 वस्त्र- देवाला वस्त्र अर्पिले जातात.
8 यज्ञोपवीत- देवाला जानवे घालणे.
9 गंध - हळद, कुंकू, इत्यादी सौभाग्यद्रव्ये, अक्षता वाहणे.
10 पुष्प - फुले, पत्री इत्यादी.
11 धूप - धूप बत्ती किंवा उदबत्ती लावणे.
12 दीप - निरांजन ओवाळणे.
13 नैवेद्य - दूध किंवा जेवणाचे ताट किंवा एखाद्या खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवणे. देवाच्या पुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापूर लावून आरती म्हणावी.
14 प्रदक्षिणा घालाव्यात.
15 नमस्कार- देवाला साष्टांग नमस्कार घालावा.
16 मंत्रपुष्प - हातात फुले घेऊन मंत्र म्हणून देवाला अर्पण करावी.
अशा प्रकारे या 16 उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचारी पूजा होय. एखाद्या विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ही मंत्रोच्चारात षोडशोपचारी पुजा पुराणोक्त आणि वेदोक्त केली जाते. या मधील पुराणोक्त पूजा प्रचलित आहे. ही पुराणोक्त आणि वेदोक्त पूजा करताना सर्वप्रथम प्रथम आचमन, देवाचे ध्यान, देशकाळाचे उच्चारण, संकल्प करण्याचा प्रघात आहे. खंडेरायाची पूजा करताना अभिषेक विधी रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकादशनी, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करण्याची प्रथा आहे.
* पंचोपचारी पूजा-
विविध पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा होय, या पूजनात पुढील पाच उपचारांचा समावेश होतो. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असतो.
1 गंध- हळद, कुंकू इत्यादी सौभाग्यद्रव्ये, अक्षता.
2 पुष्प- फुले, पत्री इत्यादी.
3 धूप -धूप जाळणे किंवा उदबत्ती लावणे.
4 दीप - निरांजन ओवाळणे.
5 नैवेद्य - दूध किंवा काही खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवावा. देवापुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापूर लावून आरती म्हणावी.
टीप - ज्या मूर्तीना स्नान घालणे शक्य नसते त्यावेळी ही पद्धत वापरतात.
* सप्तपुजा - मार्तंड विजय ग्रंथात काही पूजेच्या प्रकारांची माहिती सांगितली आहेत.
* बिल्व पुजा- या पूजेत देवाला बिल्वाचे किंवा बेलाचे पान वाहतात. या पूजेला बिल्वपूजा असे ही म्हणतात.
* गंध पुजा- या पूजेत देवाला चंदनाच्या गंधाने पुजा करतात.
* भात पुजा - या पूजेत देवाला भात दिला जातो. ही पुजा भाताने बांधलेली असते त्या मुळे ह्याला भात पुजा असे म्हणतात.
* भंडार पुजा - हळदीच्या चूर्णाने बांधलेली पुजा.
* धान्य पुजा- गहू, तांदूळ, हिरवेमुग, तांबडा म्हसूर, हरभरा डाळ इत्यादी धान्यांनी बांधलेली पुजा धान्यपुजा म्हणवली जाते.
* दवणा पुजा- दवण्याने बांधलेली पुजा.
* पुष्प पुजा- विविध प्रकारच्या फुलांनी बांधलेली पुजा पुष्प पुजा असते.