नातेसंबंधांवरील चित्रपट म्हणजे नाट्याच्या संभावनांना बहार येतो. तीच नाती पण पदर किती! कधी आयुष्यभर सोबत असूनही परकेपणाचा अनुभव असतो, तर कधी दोन तासांत जन्भराच्या नात्यांची पूर्तता करतो! त्यात मायलेकीचे नाते तर त्याहून गहिरे, जितके जवळचे तितकेच खटकणारे. तीच आई तीच लेक पण किती शक्यता आणि किती कहाण्या. त्यापैकी एक 'बोगदा' या चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटांच्या विविध प्रकारात कलात्मक चित्रपट नावाचा एक प्रकार काही लोक मानतात. कलेसाठी कला या तत्त्वाने ते कलेसाठी चित्रपट काढतात. काही वेळा मनोरंजनाची व्याख्या ताणताना बुद्धीला चालना देण्याचेही हेतू असतात. असे चित्रपट काही धाडसी चित्रपटकार बनवतात, ज्यांना त्यांचा आशय विषय महत्त्वाचा असतो आणि त्याच्या आड येणार्या कोणत्याही गोष्टींशी तडजोड करत नाहीत. त्या चित्रपटातील कलामूल्यांना न्याय देणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. असे अनेक चित्रपट आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. बोगदा हा असाच पाहणार्याला कलात्मकऐवजी क्लान्त करून सोडणारा अनुभव देतो. प्रत्येक कथेचा एक नैसर्गिक वेग असतो. तो आशयाला धरून जसा असतो, तसा तो प्रेक्षकांना आवश्यक आशय पोचविण्याच्या हेतूनेही आखलेला असतो. तांत्रिकदृष्ट्या उत्तम कलामूल्ये असलेला आणि उत्तम अभिनयाची जोड मिळालेला हा चित्रपट आहे. आयुष्याच्या शेवटी इच्छामरणाचा हट्ट धरणार्या आईची (सुहास जोशी) आणि नृत्यांगना होण्यासाठी धडपडणार्या लेकीची (मृण्मयी देशपांडे) ही कथा आहे. या इच्छारमणाच्या वाटेवर दोघांच्या नात्यांत पूर्तता आणणारी ही प्रत्यक्षात एक रोड मूव्ही आहे. पात्रांची रचना, कथेची प्रारंभिक मांडणी यात नीट रचली गेली आहे. मात्र घाटाची रचना आणि अपेक्षित सखोलपणाचा अभाव यामुळे कथाविषय आकर्षक असूनही तो रेंगाळत. अभिनयाची बाजू चांगली आहे. संगीतही योग्य वाटते.