अनेक व्यक्ती स्वच्छताप्रेमी असतात. मात्र प्राणीसुद्धा स्वच्छतेमध्ये सहभागी असतात, हे कधी ऐकले आहे का? माकड हा प्राणी आपला पूर्वज असल्याचे म्हटले जाते आणि त्याच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, हे नुकतेच पाहायला मिळाले आहे.
निकोबार बेटांवरील मकॅक माकडे स्वच्छताप्रिय आहेत. त्यांच्यामध्ये स्वच्छतेच्या अनेक चांगल्या सवयी असतात. ही माकडे दातही स्वच्छ करतात. कोईंबतूरच्या ओरिथोलॉजी आणि निसर्ग इतिहासासाठी सालीम अली केंद्राद्वारे एक अध्ययन करण्यात आले. त्यावेळी निकोबार बेटांवरील या माकडांचेही निरीक्षण केले गेले.
ही माकडे अतिशय सामाजिक वृत्तीची असतात. ती आपले भोजन साफ करुन फळे सोलून खातात. त्यांच्या आहारात बहुतांश नारळच असतो, परंतू माणसाप्रमाणेच नीट सोलून ते नारळ खातात. अन्य फळेही ते पानांना, सालीला घासून स्वच्छ करुन खातात. गवताच्या काड्या, नारळाचे धागे, पानातील शिरा किंवा देठ आणि कधी कधी नायलॉनचा दोरा सापडला तर त्याच्या साहाय्यानेही ते दात साफ करत असतात. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं असेल पण हे खरे आहे.