पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात
दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?
अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वीl पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.