काही लोकांना थंडीमुळे किंवा अॅलर्जीमुळेही शिंका येत असतात. मात्र, कोलचेस्टरमधील ही अकरा वर्षांची मुलगी मिनिटाला दहा वेळा शिंकते. इरा सक्सेना नावाची ही भारतीय वंशाची मुलगी विचित्र प्रकाराने त्रस्त आहे. केवळ झोपेत असतानाच तिला शिंका येत नाहीत.
गेल्या दोन वर्षांपासून तिला ही समस्या आहे. तिची आई प्रियाने तिला या समस्येतून मुक्त करण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे नेले. तिला कोणत्याही वस्तूची अॅलर्जी नाही, हे तपासणीत स्पष्ट झाले. तसेच तिला कोणता आजारही नाही हेही दिसून आले.
प्रिया यांनी एकदा तिच्यावर सांमोहन उपचारही केले. त्यावेळी तासभर तिला शिंक आली नाही. मात्र, तेथून परतल्यावर पुन्हा शिंका सुरू! त्यानंतर सुरू केलेल्या होमियोपॅथी उपचाराने तिला थोडा आराम मिळालेला आहे.