Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यायाम केल्यावर शरीरातल्या चरबीचं काय होतं?

व्यायाम केल्यावर शरीरातल्या चरबीचं काय होतं?
व्यायाम केल्यावर शरीरातली चरबी कमी होते. पण ती जाते कुठे? या विषयी जवळजवळ 150 डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांना विचारलं असता त्यांनी चुकीची उत्तरं दिली. मग चरबीचं नक्की होतं तरी काय?
 
पुढीलपैकी तुम्हाला कोणता योग्य पर्याय वाटतो?
 
अ) चरबीचं उर्जा किंवा उष्णतेत रुपांतर होतं.
 
ब) चरबीचं रुपांतर स्नायूत होतं.
 
क) शरीरातली चरबी ही कार्बन डाइऑक्साइड आणि पाण्याद्वारे शरीराबाहेर पडते.
 
तुमचं उत्तर 'अ' आणि 'ब' आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. पण चिंता करू नका. कारण, ऑस्ट्रेलियातल्या स्कूल ऑफ बायोमोलेक्यूलर सायन्समधील संशोधक रूबेन मिरमन यांनी घेतलेल्या सर्व्हेत 147 तज्ज्ञांनीही अशी चुकीचीच उत्तरं दिली आहेत.
 
उत्तर माहीतच नाही...
चरबीचं उर्जेत रुपांतर होत असं बहुतांश लोकांना वाटतं. दुसऱ्या उत्तराबाबत मिरमन म्हणतात की, चरबीचं स्नायूत रुपांतर होणं अशक्य आहे.
 
2014मध्ये ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये मिरमन यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानुसार, चरबीचं योग्य उत्तर हे 'क' आहे.
 
यामध्ये फुफ्फुसाची महत्त्वाची भूमिका असते. कारण ते श्वसनात महत्त्वाचं जबाबदारी बजावतं.
 
चरबीचं पाणी झाल्यावर ती लघवी आणि घामाद्वारे बाहेर पडते.
 
मिरमन यांनी theconversation.com वर दिलेल्या माहितीनुसार, "तुम्ही 10 किलो चरबी कमी केली तर त्यापैकी 8 किलो कार्बन डायऑक्साईड आणि 1.6 किलो पाण्याच्या रुपाने शरीराबाहेर पडते."
 
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कमी केलेलं वजन हे श्वसनाद्वारे शरीराबाहेर पडते.
 
मिरमन यांनी घेतलेल्या सर्वेक्षणात 150 तज्ज्ञांपैकी केवळ 3 तज्ज्ञांनी बरोबर उत्तरं दिली.
 
यामध्ये ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. मिरमन बीबीसीला सांगतात, "युरोप आणि अमेरिकेतील तज्ज्ञांमध्येही चुकीची समजूत आहे."
 
या शोधनिबंधानुसार, वजनवाढ किंवा चरबीत वाढ होण्यात जेवणाबरोबर तुम्ही घेत असलेल्या ऑक्सिजनचाही समावेश असतो.
 
वजन कमी करायला काय कराल?
वजन कमी करण्यासाठी शरिरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणं गरजेचं आहे.
 
आपण श्वास सोडल्यावर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. मग जलद गतीनं श्वासोच्छ्वास करून अधिक कार्बन डायऑक्साइड बाहेर काढता येईल का? याचं उत्तर ते नाही असं देतात. असं केल्यास तुम्हाला चक्कर येऊन बेशुद्ध पडू शकता.
 
"स्नायूंच्या नियमित हालचाली करा म्हणजेच व्यायाम करा," असं मिरमन सांगतात.
 
सगळ्यात प्रभावी उपाय काय आहे?
व्यायामाशिवाय वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत.
 
उदाहरणार्थ, 75 किलोची व्यक्ती दिवसाला किमान 590 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्पन्न करते.
 
एखादं औषध घेऊन ही प्रक्रिया वाढवता येत नाही. रात्री झोपल्यावर व्यक्ती सर्वसामान्यपणे 200 ग्रॅम कार्बन डायऑक्सइड बाहेर सोडते.
 
या व्यतिरिक्त केवळ उभं राहून काम केलं तर आपल्या चयापचय क्रियेत दुपटीनं वाढ होते. फिरताना, स्वयंपाक आणि घरात झाडू मारताना ही क्रिया तिपटीनं वाढते.
 
मिरमन यांच्यानुसार, वजन कमी करायचं असेल तर कमी खा आणि जास्त काम करा. कमी कॅलरीचं जेवण खाल्ल्यानं वजन कमी होण्यास अधिकची मदत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरीरातील प्रत्येक भाग छान दिसण्यासाठी काही टिप्स..