गर्भावस्थेदरम्यान कॉफीचे जास्त सेवन करणार्या महिलांनी सावध होण्याची गरज आहे. कॉफीसेवनाची ही सवय त्यांच्या होणार्या बाळाच्या आरोग्याला भारी ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्या महिलांच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गर्भावस्थेदरम्यान दररोज एक वा दोन कप कॉफीसुद्धा होणार्या मुलाच्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकते. अशा महिलांची मुले शाळेत जाण्याच्या वयातच लठ्ठपणाची शिकार ठरू शकतात. स्वीडनमधील गोटेनवर्ग विद्यापीठातील सहायक प्राध्यापक वेरेना सेंगपील यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, दररोज तीन कप कॉफी पिण्याच्या सल्ल्यावर प्रतिबंध लावण्याचे हे उत्तम कारण ठरू शकते. अर्थात कॅफीन आणि लठ्ठपणा यांच्यादरम्यान थेट संबंध असल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेली नाही. या अध्ययनात 250 गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आला होता. गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्या या महिलांची मुले आठ वर्षांची होईपर्यंत त्यांचे अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.