Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Disease X : हा नवीन रोग काय आहे ? जग आणखी एका महामारीसाठी तयार आहे का?

Disease X : हा नवीन रोग काय आहे ? जग आणखी एका महामारीसाठी तयार आहे का?
, गुरूवार, 25 जानेवारी 2024 (11:58 IST)
1720 ला प्लेग, 1820 ला कॉलरा, 1920ला स्पॅनिश फ्लू आणि 2020ला कोरोना गेल्या प्रत्येक शतकात एका मोठ्या साथीच्या आजारामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागलाय.
 
कोरोनातून आपण सावरतो न सावरतो तोवर आणखीन एका साथीच्या रोगाची चर्चा सुरू झालीय.स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक अर्थ परिषदेत डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी भविष्यातल्या महामारीसारख्या परिस्थितीशी लढण्यासाठी लागणाऱ्या तयारीबाबत चर्चा केली. Disease X नावाच्या संभाव्य रोगामुळे ही महामारी येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान पाहता भविष्यात हे घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सांगण्यात आलं.
 
Disease X म्हणजे काय?
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे Disease X हा काही खराखुरा रोग नाही. जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यातल्या एका गंभीर आजाराला दिलेलं हे काल्पनिक नाव आहे. हा आजार कोणत्या इन्फेक्शनमुळे होईल हे सांगता येत नसलं तरी त्याचा प्रसार मात्र जगभर होऊ शकतो असंही डब्ल्यूएचओने सांगितलं आहे. खरंतर कोविड-19च्या आधीच Disease X ही संज्ञा वापरली जात होती. फेब्रुवारी 2018 ला डब्ल्यूएचओने संभाव्य आजारांच्या यादीत Disease X चा उल्लेख केला होता. भविष्यात कोरोनासारखा एखादा रोग आला तर त्याच्या चाचण्या, लसीकरण आणि औषधं लवकर तयार व्हावीत आणि कमीत कमी जीवितहानी व्हावी म्हणून ही तयारी केली जात आहे. यासाठी WHOने जगभरातील तज्ज्ञांची एक टीम बनवली आहे. सार्स, स्वाइन फ्लू, मेर्स, इबोला आणि कोविड-19 सारख्या आजारांमुळे किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज आता आपल्याला आला आहे.
आरोग्यतज्ज्ञांना भविष्यात याहीपेक्षा अधिक भयंकर आणि धोकादायक रोगाची साथ पसरू शकते अशी भीती आहे आणि म्हणूनच या संभाव्य Disease X साठी तयारी केली जात आहे.
 
Disease X मुळे जागतिक महामारी येईल का?
जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येसुद्धा या रोगाची चर्चा करण्यात आली. 'Preparing for Disease X' म्हणजे ‘Disease X साठीची पूर्वतयारी’ या विषयावर एक चर्चासत्र तिथे आयोजित करण्यात आलं होतं. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी या चर्चासत्रात सांगितलं की, "जर भविष्यात यापेक्षा मोठी महामारी आली तर अशा आव्हानांसाठी नवीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. काही लोकांना यामुळे दहशत निर्माण होऊ शकते असंही वाटू शकतं. त्यामुळे एखाद्या रोगाचा अंदाज लावून आधीच त्यादृष्टीने तयारी केली तर ते योग्य ठरेल कारण इतिहासात अनेकदा असं घडलं आहे." कोरोनासुद्धा अचानक आला असं जरी अनेकांना वाटत असलं तरी त्याआधी अनेक तज्ज्ञांनी जगात अशाप्रकारचा आजार येऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. प्राण्यांच्या शरीरात तयार होऊन माणसाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंबाबत अनेक तज्ज्ञांना चिंता वाटते. 75% नवीन रोग हे प्राण्यांच्या शरीरातूनच माणसाच्या शरीरात आल्याचं आकडेवारी सांगते पश्चिम चीनमधल्या बाजारात विकण्यात येणाऱ्या वटवाघुळांच्या शरीरातूनच कोरोनाचा विषाणू आल्याचं बोललं जात होतं. मात्र माणसाच्या कृतीमुळे अशा रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माणसाचा पर्यावरणात वाढत चाललेला हस्तक्षेप, प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर केलेलं अतिक्रमण आणि वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे भविष्यात अशा जीवघेण्या विषाणूंची संख्या वाढू शकते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
वाढलेली लोकसंख्या, शहरीकरण आणि जागतिक व्यापारामुळे साथीच्या रोगांचा प्रसार होण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण झालीय असंही काही तज्ज्ञांना वाटतं.
 
Disease X साठी जगभरात काय तयारी केली जातेय?
डॉ. टेड्रॉस यांनी WHOने भविष्यातील परिस्थितीसाठी तयारी सुरु केल्याची माहिती दावोसमध्ये दिली. ज्यामध्ये एक ‘Pandemic Fund’ म्हणजेच महामारीसाठीचा विशेष निधी तयार केला जाईल. दक्षिण आफ्रिकेत एक Technology Transfer Hub म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र बनवलं जाईल. लशींचं स्थानिक पातळीवरील उप्तादन वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील जेणेकरून काही ठराविक देशांची लशींच्या उत्पादनावर असणारी मक्तेदारी संपू शकेल. 2022 मध्ये European Centre For Disease Controlने नवीन यंत्रणा बनवण्यापेक्षा आधीच्याच आरोग्य यंत्रणेला बळकट करण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच काही नवीन यंत्रणा आणायच्या असतील तर एखाद्या रोगाचा उद्रेक होण्याआधीच तिच्या योग्य तपासण्या करण्याची गरज असल्याचं देखील युरोपियन सेंटरच्या अहवालात सांगितलं गेलंय. जून 2022मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील आरोग्याच्या संदर्भातली माहिती एकत्र करत करून तिच्या प्रभावी विश्लेषणासाठी 10 उपाय सुचवले आहेत. आरोग्य संघटनेच्या प्रस्तावात सांगितलं गेलंय की, "एखाद्या रोगाचा प्रसार सुरू होण्याच्या सुरुवातीच्या काळातच त्या रोगाची निगराणी करून तिचा प्रसार नियंत्रित करणं गरजेचं आहे." ही नवीन महामारी एखाद्या संपूर्णतः नवीन स्रोतापासून तयार होऊ शकते हेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर एकाच वर्षात जगभरात वेगवेगळ्या लशी तयार झाल्या. लशींच्या वेगवान उत्पादन आणि वितरणामुळे कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणता आला.
 
त्यामुळे भविष्यात असा रोग आला तर आधीपासूनच वापरात असलेल्या लशींच्या फॉर्म्युल्याचा वापर करून त्यात काही बदल करून नवीन लस बनवता येईल का यावरही सध्या जागतिक आरोग्य संघटना संशोधन करत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sorry In Relationships रिलेशनशिप मध्ये माफी मागण्याची स्वाभाविकता असणे गरजेचे असते