Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती धोकादायक, बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे का?

corona JN.1
, मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (09:12 IST)
केरळ राज्य पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
कोरोनाच्या या ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’साठी 2019 प्रमाणे हे राज्य पुन्हा एकदा भारतासाठी प्रयोगशाळा म्हणून काम करतंय.
 
केरळची यंदाची लढाई कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसोबत आहे, ज्याचं जेएन.1 (JN.1) असं नामकरण करण्यात आलंय.
 
आधीच्या दोन वर्षात जेव्हा या साथीच्या आजाराचा सर्वाधिक धोका होता, त्यावेळचा लढण्याचा आणि त्यावर मात करण्याचा निर्धार यावेळीसुद्धा पाहायला मिळतोय.
 
लोक किती सतर्क आहेत?
केरळच्या लोकांची मनःस्थिती काय आहे, याचा अंदाज कोव्हिड तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. अनिश टीएस यांच्या विधानावरून लावता येऊ शकतो.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, “100 पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी 50 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. ज्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आढळले होते असे लोकही आपल्या चाचण्या करून घेत आहेत. लोक घाबरले आहेत. ते खाजगी किंवा सरकारी आरोग्य केंद्रात जातायत.”
 
डॉ. अनिश हे तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
 
खाजगी क्षेत्रातही चाचण्यांच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगली जातेय. शस्त्रक्रियेपूर्वी चाचणी आवश्यक असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केल्या जाणार्‍या चाचण्या लक्षात घेता खाजगी क्षेत्रात 82 टक्के चाचण्या केल्या जात आहेत.
 
यापैकी सुमारे 50 टक्के प्रकरणांमध्ये नव्या व्हेरिएंटची लक्षणं दिसून आली आहेत. हा व्हेरिएंट 'अत्यंत संसर्गजन्य' असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
नवीन व्हेरिएंट किती संसर्गजन्य आहे?
प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. टी जेकब जॉन यांनी बीबीसीला सांगितलं की, “हा व्हायरस फारसा प्राणघातक नाही. पण त्याचा वेगाने प्रसार होतोय. 40 हून अधिक देशांमध्ये तो पसरलाय. आम्हाला ‘ओमिक्रॉन’बद्दल माहिती आहे आणि म्हणून त्याबद्दल जास्त काळजी वाटत नाहीय.
 
“शिंकेतून बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे तो हवेत पसरतो. ओमिक्रॉनच्या इतर उप-व्हेरिएंटच्या तुलनेत नाक आणि घशातून बाहेर पडणाऱ्या द्रवामध्ये मोठया संख्येने विषाणू असतात.”
 
वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या डॉक्टर गगनदीप कांग यांनी बीबीसीला सांगितलं की, “हा इन्फ्लूएन्झापेक्षा जास्त धोकादायक आहे. वयोवृद्ध आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी यापासून काळजी केली पाहिजे.
 
जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा संसर्ग लवकर होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. तुम्ही मास्कचा वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि स्वतःला सुरक्षि ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा."
 
चार जण मृत्यूमुखी, तिघांचं वय 65 पेक्षा जास्त
डॉ. कांग यांच्या म्हणण्याला डॉ अनीश दुजोरा देतात, “मंगळवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 1749 होती. परंतु यापैकी केवळ 30 किंवा 35 प्रकरणांमध्येच लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि त्यापैकी फक्त अडीच टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज लागली."
 
"चार जणांचा मृत्यू झालाय, त्यापैकी फक्त एकाचं वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे. इतरांचं वय थोडं जास्त होतं आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार होता.
 
“एकाने कर्करोगावर उपचार घेतले होते. किडनीचा एक रूग्ण डायलिसिसवर होता आणि एकाला बऱ्याच दिवसांपासून मधुमेहाची लागण झाली होती,” असंही ते म्हणाले.
 
आजारी पडलेल्यांमध्ये 30 टक्के लस न घेणारे
डॉ. अनीश म्हणाले, “केरळमधील 70 टक्के लोकसंख्येचं एकदा लसीकरण झालं आहे. ज्यांनी लस घेतली नाही ते एकूण लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के आहेत. पण सध्या संसर्ग झालेले 30 टक्के लोक या तीन टक्के लोकांपैकी आहेत.”
 
“यावरून हे स्पष्ट होतंय की, लोकांनी यापूर्वी घेतलेल्या लशीचा प्रभाव अजूनही कायम आहे. ‘ICMR’च्या अभ्यासानुसार, मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावीपणे काम करतीये आणि जर आणखी दोन डोस घेतले असतील तर संरक्षण कवच तयार होऊ शकतं. परंतु आमच्याकडे याचे पुरावे नाहीएत की पुढील डोसचा उपयोग जीव वाचवण्यासाठी होईल की नाही," असंही ते म्हणाले.
विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये तयार होणारे अँटीबॉडीज शाबूत राहतील का या प्रश्नावर ते म्हणाले, “हे असंच आहे की,तुमच्याकडे घराच्या मुख्य दरवाजाची चावी आहे, परंतु इतर दारांची चावी नाही. बहुतेक रोगांमध्येही असंच घडतं. कोव्हिड हा एक साथीचा आजार आहे, तुम्ही लस जरी घेतली असेल, तरी व्हेरिएंट त्यातून सुखरूपणे बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतात.
 
जेएन-1 मध्येही असं होऊ शकतं. आमच्या माहितीनुसार, कोव्हिड विषाणू व्यक्तीचं वय आणि रोगानुसार वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतो.”
 
बूस्टर डोस घेणं किती महत्त्वाचं?
बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे का या प्रश्नावर डॉ. जॉन म्हणतात, "त्याची आवश्यक नाही."
 
ते म्हणतात, “तरीही यापूर्वी झालेल्या संसर्गामुळे किंवा लसीकरणामुळे जितकी जास्त प्रतिकारशक्ती विकसित झाली असेल, बचावाची शक्यताही तितकीच जास्त असेल. पूर्णपणे सुरक्षित असलेल्या कोणत्याही लशीचा बूस्टर डोस, हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे.”
 
बाकी जगाच्या तुलनेत इथेही जेएन.1 व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल अशी लस अद्याप विकसित झालेली नाही.
 
अमेरिकेतील वृद्ध आणि इतर आजारांशी लढा देणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या मोनोव्हॅलेंट लशीचा डॉ. कांग यांनी उल्लेख केला.
त्या म्हणतात, “जुन्या आणि नवीन स्ट्रेनचा सामना करण्यासाठी ते बायव्हॅलेंट लस बनवत असत. आता अमेरिकेला जुन्या स्ट्रेनची चिंता नाहीए कारण जुना स्ट्रेन अस्तित्वात नाहीये.”
 
“सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बनवत असलेली नोवोवॅक्स लस ही मोनोव्हॅलेंट स्ट्रेनसाठी अद्ययावत अशी लस आहे. याद्वारे काही प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार केली जाण्याची शक्यता आहे,” असंही त्या म्हणाल्या.
 
डॉ. गगनदीप कांग म्हणतात,“साधारणपणे, जर तुम्ही निरोगी असाल आणि लस घेतली असेल, त्यानंतरही तुम्हाला संसर्ग झाला असेल तर दुसरी लस फायदेशीर ठरणार नाही. लशीचा फायदा त्यांनाच होऊ शकतो ज्यांना जास्त धोका आहे. अशा लोकांमध्ये वृद्धांचा समावेश होतो. बूस्टर डोस फक्त काही महिन्यांसाठीच संरक्षण करू शकतात.”
 
योग्य धोरणाची आवश्यकता
डॉ. जॉन यांचं या विषयावरील मत थोडं वेगळं आहे.
 
ते म्हणतात,“नवीन लसीची गरज नाही पण बूस्टर डोस देणं ही चांगली कल्पना आहे. परंतु फायदे आणि जोखीम यांचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे. गंभीर दुष्परिणाम नसलेली अशी कोणतीही लस कोव्हिडचा गंभीर धोका असलेल्या लोकांसाठी राखीव ठेवायला हवी. लस देण्याच्या जोखमीपेक्षा आजाराचा धोका जास्त असतो.”
 
डॉ. जॉन म्हणतात, “उदाहरणार्थ- अॅडेनो वेक्टर्ड लस किंवा एमआरएनए लस. भारतातील कोवॅक्सिन 100% सुरक्षित आहे, परंतु त्यांची उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी अशा व्यवस्थेची आवश्यक आहे जिथे चांगली धोरणं आखली जातील.”
 
दरम्यान, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आपल्या सरकारचं कौतुक करत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली.
 
“सिंगापूरला 15 लोकांमध्ये जेएन.1 सापडला आहे. हे लोक गेल्या महिन्यात भारतातून सिंगापूरला गेले होते. याचा अर्थ कोव्हिडचा हा व्हेरिएंट भारतातील इतर राज्यांमध्येही आहे. पण विशेष बाब म्हणजे केरळमध्ये झालेल्या चाचणीत तो आढळून आला होता,” असं त्या म्हणाल्या.

Published By- Priya Dixit
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण 'नाताळ'