Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाठीचं दुखणं किती गंभीर आहे हे कसं ओळखायचं?

पाठीचं दुखणं किती गंभीर आहे हे कसं ओळखायचं?
, रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (17:03 IST)
प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पाठदुखी-कंबरदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. जवळपास 80 टक्के लोकांना या समस्येने ग्रासलंय आणि विशेष म्हणजे उच्चभ्रू समाजात ही पाठदुखी एखाद्या साथीच्या रोगप्रमाणे पसरलीय.
 
पाठदुखी समजून घेण्यासाठी यातला फरक कळणं गरजेचं आहे. कारण आपली पाठ नेमकी कशी दुखते, कुठल्या भागात दुखणं सुरू आहे यावरून त्याला वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत.
 
पाठीच्या दुखण्यांची नावं ही शब्दाच्या शेवटी 'अल्जिया' जोडून तयार होतात. उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास मानेचं (सर्व्हीकल एरिया) दुखणं असेल तर त्याला 'सर्व्हेकाल्जिया' म्हटल जातं.
 
जर पाठ किंवा पाठीच्या खालच्या भागात (डोर्सल एरिया) दुखत असेल तर त्याला 'डोर्सल्जिया' म्हणतात.
हे शब्द पाठीच्या दुखण्याशी संबंधित आहेत. अनेक क्लिनिकल रिपोर्टस मध्ये या शब्दांचा संदर्भ आढळतो. नेमकं दुखणं कोणत्या भागात आहे हे जाणून घेण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो.
 
1. काळजी करण्याची गरज कधी असते?
जरी मोठ्या प्रमाणावर लोकांना पाठदुखीची समस्या असेल तरी यातल्या बऱ्याच जणांची ही समस्या गंभीर श्रेणीत मोडत नाही. पाठदुखी सुरू झाल्यावर महिनाभरातचं दुखणं कमी होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे.
 
फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर या दुखण्यांसाठी काही चिन्हांचा वापर करतात. उदाहरणार्थ- मणक्याशी किंवा शरीराच्या इतर भागांतील गंभीर दुखण्यासाठी 'रेड फ्लॅग' हे चिन्ह वापरलं जातं.
संवेदनांमध्ये झालेले बदल, स्नायूंमधील बदल (हातापायांना मुंग्या येणे, शक्ती कमी झाल्याचं जाणवणे, लघवीवरील नियंत्रण गमावणे) अचानक वजन कमी होणे, वक्षस्थळामध्ये वेदना जाणवणे किंवा ताप येणे.
 
अशा प्रकारची कोणतीही लक्षणं किंवा सौम्य लक्षणं जरी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जोपर्यंत तुमच्या रिपोर्टस मध्ये रेड फ्लॅग्स नाहीत तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही.
 
2. दुखण्यामुळे विचार बदलतात का?
दीर्घकाळ असलेलं किंवा सातत्याने उद्भवणाऱ्या दुखण्यासाठी 'यलो फ्लॅग' दिला जातो.
 
त्यातून आपले विचारही बदलू शकतात.
 
उदाहरणार्थ, नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे (आपण हे कायम लक्षात ठेवायला हवं की, अति वेदना म्हणजे गंभीर दुखापत असेलच असं नाही), अस्वस्थ होऊन किंवा भीतीपोटी शारीरिक हालचाल थांबवणं (किनेसिओफोबिया), व्यायामापेक्षा पॅसिव्ह ट्रिटमेंट चांगल्या असतात असा विचार करणं.
 
यातून दुखण्याची तीव्रता कमी होण्यापेक्षा अधिक त्रासच होऊ शकतो.
 
3. पाठ दुखत असेल तर एक्स-रे काढायला हवा का?
जर तुमची पाठ दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि ते सांगत असतील तरच पाठीचा एक्सरे काढावा.
 
वयाच्या पन्नाशीनंतर मणक्यातील डिजनरेटिव्ह प्रक्रिया किंवा इंटरव्हर्टेब्रल डिस्कमध्ये बदल होणं नॉर्मल आहे. म्हणजे ज्या लोकांना पाठीचं दुखणं नाहीये त्यांच्यात सुद्धा हे बदल दिसतात.
पण अशा प्रकारच्या इमेजिंग टेस्टमुळे पेशंट अतिचिकित्सा करतात आणि आजारपणातील दिवस वाढतात.
 
'इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पेन'नुसार, 85 टक्के प्रकरणांमधील दुखणं हे नॉन स्पेसिफिक असतं. त्यामुळे जेव्हा एखाद्या प्रकरणात 'रेड फ्लॅग' दिला जातो तेव्हाच एक्स रे काढण्यास सांगितलं जातं.
 
4. पाठदुखीपासून सुटका करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?
एखादी समस्या जाणून न घेता त्यावर व्यायाम सुचवणं कठीण आहे. फिजिओथेरपिस्ट प्रत्येक रुग्णाच्या गरजा आणि पॅथॉलॉजीच्या आधारावर व्यायाम सुचवतात.
 
पिलाते आणि मॅकेन्झी मेथडसारख्या व्यायामामुळे पाठीचं दुखणं कमी होऊ शकतं असं बऱ्याच संशोधन पत्रिकांमध्ये लिहिलं आहे.
 
आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये, व्यायाम आणि रुग्णांचं समुपदेशन करण्याचे फायदे दिसून आले.
त्यामुळे फिजिओथेरपीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मणक्याची गतिशीलता सुधारण्यासाठी आणि लहान स्नायू (मणक्याचे एक्स्टेंसर मसल्स, हॅमस्ट्रिंग आणि इलिओप्सो) नीट काम करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत. शिवाय स्नायूंच्या बळकटीकरण करण्यासाठी ही व्यायाम प्रकार आहेत.
 
कोणताही सोप्यातला सोपा व्यायाम प्रकारही आरोग्यासाठी फायदेशीर असतो. चालल्यामुळे तुमच्या वेदना कमी होतात तसेच पाठीची जुनाट दुखणीही कमी होतात. त्यामुळे व्यायाम प्रकारातला हा सोपा आणि परवडणारा मार्ग आहे.
 
5. त्रास सुरू असताना खेळू शकता का?
अनेक तासांची बैठक, बैठी कामं, शारीरिक हालचालींचा व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल पाठ-कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे व्यायाम आणि या बैठ्या शैलीतील कामाच्या वेळेत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.
 
नियमित खेळ (स्पर्धात्मक) खेळल्याने देखील पाठदुखीचा त्रास उद्भवल्याचं दिसून आलंय. याउलट खेळाचे तास मॅनेज केले की फिजिओथेरपीचे फायदे मिळतात.
 
त्यामुळे काहीही असो, आपल्याला कोणत्याही गोष्टीची शिस्त असणं आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ- तुम्ही पोहताना बटरफ्लाय स्टाईल पोहत असाल तर ते मार्गदशानाखाली करणं आवश्यक आहे. सायकल चालवताना तुम्ही कसे बसता हेही पाहिलं पाहिजे.
फुटबॉल, बास्केटबॉलसारखे खेळ खेळत असाल तर यात अतिशय तीव्र आणि अचानक मूव्हमेंट होत असतात. टेनिसचं बघायला गेलं तर यात सर्व्हिंग हालचालींमुळे पाठीवर ताण येतो.
 
तुम्ही धावपटू असाल तर तुमच्या टाचांमुळे कमरेच्या मणक्यावर ताण निर्माण होतो. कारण धावताना शरीराच्या वजनाच्या 2.7 ते 5.7 या पटीत कॉम्प्रेशन होत असतं. त्यामुळे वेगात धावणं पाठीसाठी जोखमीचं ठरू शकतं. पण मध्यम गतीने धावल्यामुळे पाठीची स्थिती सुधारते.
 
थोडक्यात पाठ-कंबरदुखीच्या त्रासावर आजन्म नियंत्रण मिळविण्याकरिता रुग्णाला धीर देणं, अनावश्यक विश्रांती टाळण्याचा आग्रह धरणं, अतिऔषधांवर नियंत्रण ठेवणं आणि बैठी जीवनशैली मोडणं फायद्याचं ठरतं.

Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cancer Dayजागतिक कॅन्सर दिन: सर्वाधिक आढळणारे कॅन्सर कोणते, त्यांची लक्षणं काय आहेत