"हिंसा काय असते मला कल्पना आहे. मी हिंसा बघितली आहे, सहनही केली आहे. ज्याने हिंसा पाहिलेली नाही, अनुभवलेली नाही त्याला ही गोष्ट कळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत त्यांनी हिंसा पाहिलेली नाही, ते घाबरतात", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
काश्मीरमध्ये 'भारत जोडो' यात्रा संपल्यानंतर जोरदार बर्फवृष्टीत बोलताना त्यांनी आजी आणि वडिलांना गमावलं त्या क्षणांची आठवण सांगितली.
“आम्ही काश्मीरमध्ये चार दिवस चाललो. मी तुम्हाला सांगतो भाजपचा कोणताही नेता असं चालणार नाही. कारण ते घाबरतात. मी 14 वर्षांचा होतो, शाळेत गेलो होतो. भूगोलाचा तास होता. आमच्या एक शिक्षिका आल्या. वर्गात आल्या आणि त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापक तुला बोलवत आहेत.
मी व्रात्य होतो. अजूनही आहे. मी विचार केला, मुख्याध्यापकांनी बोलावलं आहे म्हणजे मी काहीतरी केलं असणार त्याची शिक्षा द्यायला बोलवत असतील. ज्या शिक्षकांनी मला मुख्याध्यापकांकडे जायला सांगितलं त्यांना पाहून मला विचित्र वाटलं," असं राहुल यांनी म्हटलं.
राहुल यांनी पुढे म्हटलं, "मी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पोहोचलो. मुख्याध्यापक म्हणाले, तुझ्या घरुन फोन आला आहे. जेव्हा मी त्यांचे शब्द ऐकले तेव्हा मला वाटलं काहीतरी वाईट घडलं आहे. माझे पाय कापत होते. मी जसा फोन कानाला लावला, माझ्या आईबरोबरोबर एक महिला काम करतात. त्या ओरडत होत्या. राहुल, आजीला गोळ्या मारल्या असं त्या ओरडत होत्या”
ते पुढे म्हणाले, “14 वर्षांचा होतो. मी जे हे आता सांगतोय ती गोष्ट पंतप्रधानांना समजणार नाही. ही गोष्ट अजित डोभाल यांनाही समजणार नाही. पण ही गोष्ट काश्मीरच्या लोकांना समजेल. ही गोष्ट लष्कराला, सीआरपीएफच्या लोकांना समजेल. आजीला गोळ्या मारल्या हे समजलं. मी शाळेतून निघालो. बहिणीलाही बरोबर घेतलं. मी ती जागा पाहिली जिथे आजीला गोळ्या मारण्यात आल्या होत्या. बाबा आले. आईला धक्का बसला होता."
“आम्ही हिंसा पाहिली आहे. आम्ही त्याकडे दुसऱ्या दृष्टीने बघतो. तुमच्यासाठी हा फोन आहे. त्या घटनेनंतर मी अमेरिकेत होतो. पुन्हा एकदा कॉल आला. जसं पुलवामा इथे जीव गमावलेल्या सैनिकांच्या घरी फोन आला असेल. लष्कराच्या कुटुंबीयांना फोन आला असेल. वडिलांच्या एका मित्राने फोन केला आणि म्हणाले राहुल एक वाईट बातमी आहे. मी म्हटलं मला कळलंय की बाबा गेले आहेत.
जो हिंसा घडवून आणतो, मोदीजी आहेत, अमित शहा आहेत. त्यांना आमच्या वेदना समजू शकत नाहीत. आम्हाला ते माहितेय. पुलवामाचे सैनिक जे गेले त्यांच्या मुलांच्या मनात काय झालं असेल ते मला माहिती आहे. जो फोन येतो, तेव्हा काय वाटतं ते आम्ही समजू शकतो. असा फोन कोणत्याही मुलाला, बायकोला घ्यायला लागू नये. माझं लक्ष्य हेच आहे. असे फोन बंद करणे हेच उद्दिष्ट आहे”, असं राहुल यांनी सांगितलं.
“मी काश्मीरमध्ये आलो. मला स्थानिक संयोजकांनी सांगितलं की शेवटचा टप्पा गाडीने पूर्ण करा. तुम्ही चालत गेलात तर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. मी विचार केला, हा शेवटचा टप्पा आहे. घरच्या लोकांमध्ये चालणार आहे. माझा द्वेष करणाऱ्या लोकांना माझ्या टीशर्टचा पांढरा रंग बदलण्याची संधी देऊया”, असं राहुल म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, “जगायचं असेल तर न घाबरता निर्भयतेने जगा ही शिकवण माझ्या घरच्यांकडून मिळाली आहे. गांधीजींच्या आचरणातूनही ही गोष्ट शिकलो आहे. चार दिवस चालणार आहे, बदलून टाका माझ्या टीशर्टचा रंग. मी त्यांना संधी दिली.
काश्मीरच्या लोकांनी मला हँडग्रेनेड दिलं नाही, भरभरुन प्रेम दिलं. अनेकांनी गळाभेट दिली. मला आपलं मानलं. आबालवृद्धांनी स्वागत केलं. काश्मीरच्या जनतेला, लष्कराला, सीआरपीएफच्या लोकांना मी काही सांगू इच्छितो”.
Published By- Priya Dixit