जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने एमपॉक्स म्हणजेच मंकी पॉक्सला ग्लोबल हेल्थ एमर्जन्सी जाहीर करताच जगभरातून एकच प्रश्न उपस्थित केला गेला. तो म्हणजे एमपॉक्स कोरोनाचं नवीन रुप आहे का?
पण वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञांचं यावर काय म्हणणं आहे?
तर त्यांच्या मते, यात साम्य नाही. पण लोकांची चिंता रास्त आहे.
युरोपमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रादेशिक संचालक डॉ. हान्स क्लूगे म्हणाले की, “एमपॉक्स नवीन कोरोना नाही. कारण सर्वसामान्यांना त्यापासून तुलनेनं कमी धोका आहे.”
“एमपॉक्सवर नियंत्रण कसं मिळवायंच, हे आम्हाला माहिती आहे. युरोपमध्ये पसरलेल्या संक्रमणाला कसं रोखायंच, हे ही आम्हाला ठाऊक आहे,” असंही ते म्हणाले.
कोरोना आणि एमपॉक्स हे दोन्ही आजार विषाणूमुळं होतात. मात्र, दोघांमधील लक्षणं ही वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या प्रसाराचा मार्गही वेगळा आहे.
केनियाच्या आगा खान युनिव्हर्सिटी रुग्णालयातील प्राचार्य रोडने अॅडम यांच्या मते, “या दोन्हीं रोगांमध्ये समानतेपेक्षा भिन्नता अधिक आहे.”
या रिपोर्टमध्ये आपण एमपॉक्स आणि कोरोना यातील 5 महत्वाचे फरक आणि त्याबाबत काय काळजी घेता येईल, हे जाणून घेणार आहोत.
1. एमपॉक्स हा नवीन विषाणू नाही
एमपॉक्स कोरोनासारखा नवीन विषाणू नाही. एमपॉक्स आधी मंकीपॉक्स नावाने ओळखला जायचा. हा आजार 1958 पासून अस्तित्वात असून सर्वात आधी डेन्मार्कमधील माकडांमध्ये तो आढळून आला होता.
माणसांत एमपॉक्सचा विषाणू पहिल्यांदा 1970 मध्ये डीआर काँगो इथं आढळून आला. तेव्हापासून हा व्हायरस पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत अनेकवेळा पसरला आहे.
आतापर्यंत 70 देशांत हा विषाणू आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2022 साली पहिल्यांदा एमपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी जाहीर केलं होतं.
तर, कोरोनाचं पहिलं प्रकरण 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये आढळून आलं होतं. त्यानंतर लगेचच कोरोना साथीच्या रुपात जगभरात पसरला.
वैज्ञानिकांच्या मते, दोन्ही विषाणूंचा हेल्थ एमर्जन्सी घोषित करण्यात आलं आहे. पण, एमपॉक्सबाबत आमच्याकडं अधिक माहिती आहे.
2. संसर्गजन्य नाही
एमपॉक्स कोरोनासारखा संसर्गजन्य नाही. या दोन्हींची लागण जरी जवळील संपर्कातून होत असली तरी कोरोना अधिक वेगाने पसरतो, कारण तो हवेतून पसरतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कोरोना माणसाला खोकला, सर्दी, शिंकणे, बोलताना, गाताना, एखाद्या व्यक्तीसोबत बसल्याने देखील पसरतो.
तर, एखाद्या संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळ गेल्याने एमपॉक्सची लागण होते. उदाहरणार्थ, संक्रमित व्यक्तीला स्पर्श झाल्याने, संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध, संक्रमित व्यक्तीच्या पलंगावर झोपल्याने किंवा त्याचे कपडे वापरल्याने हा आजार होतो.
संक्रमित व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यानेही एमपॉक्सची लागण होऊ शकते. ताप, सर्दी, घसा खवखवणे ही कोरोनाची लक्षणं आहेत. तर, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घशाला सूज आणि पुरळ येणे, ही एमपॉक्सची लक्षणं आहेत.
डिसेंबर 2019 ते ऑगस्ट 2023 पर्यंत कोरोनाची 76 कोटींहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, मे 2022 पासून आतापर्यंत एमपॉक्सची जगभरात जवळपास 1 लाख प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
आफ्रिका डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या मते, मंकीपॉक्सच्या नोंदवण्यात आलेल्या जवळपास 18910 केसेसपैकी 600 हुन अधिक लोकांचा मृत्य झाला.
3. लशीची उपलब्धता
एमपॉक्सवरील लस आधीपासून उपलब्ध आहे. कोरोनाबाबत सर्वात मोठ आव्हान होतं ते लशीचं.
आधी लस तयार करून तीची चाचणी होणार, त्यानंतर तिला मान्यता मिळेल आणि मग कोरोनासाठी तिचा उपयोग होऊन त्यावर कोरोना आटोक्यात आणला जाईल, असं धोरण होतं. तर, एमपॉक्ससाठीची लस आधीपासून उपलब्ध आहे.
एमपॉक्स हे स्मॉलपॉक्स (कांजण्या) सारखं आहे. 1980 मध्ये लसीच्या माध्यमातून याच्या संक्रमणाला रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते.
स्मॉलपॉक्सवरील लसदेखील एमपॉक्सपासूनच्या संरक्षणासाठी महत्वाच्या ठरल्या, विशेषत: जेव्हा 2022 मध्ये हा रोग पसरला होता तेव्हा.
याबाबत प्राचार्य अॅडम म्हणतात की, “यामुळे 100 टक्के संरक्षण होत नाही. परंतु, 2022 मध्ये जेव्हा हा रोग युरोप आणि उत्तर अमेरिकेत पसरला होता तेव्हा वृद्धांमध्ये याचा धोका कमी होता. या वृद्धांनी आधी स्मॉलपॉक्सची लस घेतली असावी त्यामुळं त्यांच्यावर या रोगाचा प्रभाव कमी जाणवला.”
स्मॉलपॉक्स लशीवर आधारिक एमपॉक्स लस एमव्हीए-बीएन लस म्हणून ओळखली जाते.
2022 साली लशींची निर्मिती करणारी कंपनी बावेरियन नोर्डिकने दीड कोटींहुन अधिक लशींची पुरवठा केला. 76 देशांत ही लस पाठवण्यात आली.
4. कोरोनासारखं वेगाने रुप बदलत नाही
काही विषाणू काळानुसार बदलतात. पण, काही विषाणू त्यांचं स्वरुप फार वेगाने बदलतात उदाहरणार्थ कोरोना. मात्र, एकपॉक्सचं तसं नाही.
एमपॉक्सचा संसर्ग डीएनए विषाणूमुळं होतो. तर, कोरोनाचा संसर्ग आरएनए विषाणूने होतो.
अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या मते, डीएनए विषाणू आरएनए विषाणूसारखा वेगाने स्वरूप बदलत नाही.
एमपॉक्सचे दोन स्ट्रेन किंवा दोन प्रकार आहेत, त्याला क्लेड 1, क्लेड 2. तर, कोरोनाच्या SARS-CoV2 या विषाणूचे 20 हुन अधिक प्रकार आहेत. सध्या एमपॉक्स क्लेड 1 या विषाणूमुळे पसरतो आहे, या विषाणूला क्लेड 1B असेही म्हणतात.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधील ग्लोबल हेल्थ रिसर्चचे प्राचार्य ट्रूडी लेंग यांच्या मते, “क्लेड 1B च्या बहुतांश प्रकरणांमध्ये हा विषाणू शारीरिक संपर्कातून पसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा व्यक्तींच्या संपर्कातूनही याचा प्रसार होऊ शकतो. उदाहरणार्थ आईपासून बाळाला, मुला-मुलांमध्ये किंवा मुलाची काळजी घेताना.”
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वैज्ञानिकांनी 1B स्ट्रेन इतर सट्रेनच्या तुलनेत वेगाने पसरतो आहे का याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
5. लॉकडाऊन किंवा लस घेण्याची सक्ती नाही
एमपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित करण्यात आलं तेव्हा परिस्थिती 2020 सारखी तर होणार नाही, अशी भीती अनेकांच्या मनात होती. तेव्हा जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं आणि सगळ्या सीमांवर निर्बंध लादले गेले. त्यावेळी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि परिस्थिती बीकट झाली होती. मात्र, एमपॉक्सच्या बाबतीत आजवर असं झालं नाही.
गेल्या दोन वर्षांत आफ्रिकेतील 16 देशांमध्ये एमपॉक्स पसरला, परंतु आफ्रिका सीडीसीकडून कोणतीही सीमा बंद करण्याबाबत किंवा लॉकडाउन लावण्याबाबत सांगण्यात आलेलं नाही.
आफ्रीका सीडीसीचे डायरेक्टर जनरल डॉ. जीन कासिया यांच्या मते, सध्या लोकांच्या हालचालींवर मर्यादा घातल्या जातील किंवा वस्तूंची वाहतूक थांबवायची गरज पडेल, अशी परिस्थिती नाही.
डॉ. जीन म्हणतात, आतापर्यंत जसं सुरू होतं, तसंच सुरू राहणार आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन कार्यक्रमांचे कार्यकारी संचालक डॉ. माईक रायन यांचाही पाठिंबा आहे.
डॉ. माईक यांच्या मते, एमपॉक्स हा एक विषाणू आहे जो योग्य वेळी योग्य पावले उचलून नियंत्रित केला जाऊ शकतो.
एमपॉक्स हा तुलनेने सौम्य विषाणू आहे आणि लोक दोन ते चार आठवड्यांत यातून बरे होतात. मात्र, काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागते.
संसर्ग झालेली व्यक्ती किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टींपासून दूर राहून एमपॉक्सचा संसर्ग टाळता येतो.
जखमा किंवा पुरळ, मुरुमांना स्पर्श झाल्यास हात धुवावेत तसंच सॅनिटायझरचा वापर करूनही संसर्गाचं प्रमाण टाळता येतं.
प्रोफेसर रॉडनी यांच्या मते, लस जीव वाचवण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.
आमच्याकडे चांगली साधने आणि कमी पसरणारा विषाणू आहे. अशा परिस्थितीत हा एमपॉक्स विषाणू कोरोनासारखा महामारी बनेल असे वाटत नाही, असं प्रोफेसर रॉडनी म्हणाल्या.