निद्रानाश किंवा झोपेत मध्येच व्यत्यय येणे ही आजकाल खूपच सामान्य समस्या झाली आहे. निद्रानाश म्हणजे, झोप येतच नाही किंवा आली तरी शांत झोप लागत नाही. निद्रानाश ही समस्या प्रौढ, वृद्ध किंवा लहान मुले कुणामध्येही आढळून येते. वाढत्या वयानुसार, झोपेच्या चुकीच्या सवयी, दुखणी-वेदना, वैद्यकीय परिस्थिती, औषधे किंवा ताण यामुळे निद्रानाशाचे प्रमाण वाढत जाते. कौटुंबिक वैद्यकीय इतिहासाचाही प्रभाव यावर मोठया प्रमाणात पडतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार बळावण्याच्या शक्य ता अधिक असून, मासिक पाळी, गर्भारपण, रजोनिवृत्तीचा काळ या सगळ्यात होणाऱ्या संप्रेरक बदलामुळे महिलांना हा त्रास अधिक होतो.
झोपेच्या गोळ्या घेतल्याने आपल्याला झोप लवकर लागू शकते किंवा दीर्घकाळ झोप शांत लागू शकते. पण, या गोळ्यांचे धोके आणि फायदे व्यक्तीपरत्वे बदलू शकतात.
झोपेच्या गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम :
नैराश्या, थकवा, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणे, लक्ष केंद्रित करताना त्रास होणे, मूड नसणे, प्रचंड डोकेदुखी
पोटाचे आजार (अतिसार किंवा अन्नावरील वासना उडणे)
दीर्घकालीन गुंगी (झोपेतच राहण्यासाठी मदत करणारी औषधे घेतल्याने असे होते.)
काही ठरावीक पदार्थाची ऍलर्जी येणे
झोपेतील वागणुकीत बदल होणे (आपण पूर्ण जागे नसताना वाहन चालवणे किंवा खाणे)
दिवसा स्मृतिभ्रंश होणे किंवा काम करताना अडचणी येणे.
झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्ट री सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे, बऱ्याचदा तपासण्यांतीच डॉक्ट रांना आपल्या निद्रानाशाचे कारण समजू शकते.
झोपण्यापूर्वी फार काळ झोपेच्या गोळ्या घेऊ नका
दिवसभराची सर्व कामे पूर्ण करून, अंथरुणात झोपण्यासाठी जाईपर्यंत झोपेच्या गोळ्या घेऊ नका.
तुम्हाला योग्य तितका वेळ झोप मिळू शकेल, अशाच वेळी झोपेच्या गोळ्या घ्या.
तुम्हाला किमान 6 ते 8 तास झोप मिळू शकेल, याची खात्री असेल, तेव्हाच झोपेच्या गोळ्या घ्या. लहानशी डुलकी हवी असल्यास, झोपेच्या गोळ्या घेऊ नका.