Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'साध्या सर्दी-पडशाचा विषाणू कोरोनाला पळवून लावू शकतो' - संशोधन

'साध्या सर्दी-पडशाचा विषाणू कोरोनाला पळवून लावू शकतो' - संशोधन
, सोमवार, 26 एप्रिल 2021 (21:54 IST)
-जेम्स गॅलघर
 
साध्या सर्दी-पडशाला जबाबदार असणारा विषाणू शरीरातल्या कोव्हिड-19 च्या व्हायरसला पळवून लावू शकतो, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
 
काही विषाणू शरीराला संसर्ग करण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत असल्याचं समोर आलं आहे. ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांचं म्हणणं आहे की, सर्दी-पडशाचा ऱ्हायनो व्हायरस कोरोना व्हायरसशी स्पर्धा करताना जिंकतो.
 
याचे फायदे फार काळ टिकणारे नसले तरी रायनो व्हायरस इतका जास्त पसरलेला आहे की त्यामुळे कोव्हिडला आळा घालण्यास मदत होऊ शकते. कल्पना करा की तुमचं नाक, घसा आणि फुप्फुसं म्हणजे एका रांगेतली घरं आहेत. एकदा का एखादा व्हायरस आत गेला की एकतर तो व्हायरस इतर व्हायरससाठी दरवाजा उघडू शकतो किंवा कडी कोयंडे लावून, खिळे ठोकून दार घट्ट बंद करू शकतो म्हणजे सगळी घर त्या व्हायरसला मिळतील आणि दुसरं कोणाला आत येता येणार नाही.
 
इन्फ्लुएन्झा हा सगळ्यात स्वार्थी व्हायरस आहे. हा व्हायरस नेहमीच एकटाच शरीर संसर्गित करतो. अडिनो व्हायरससारखे विषाणूंना घरात इतरही व्हायरस आले तर चालतं.
 
कोव्हिडला कारणीभूत असणारा Sars-CoV- 2 हा विषाणू कसं काम करतो याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. खासकरून या विषाणूचे 'इतर विषाणूंबरोबर संबंध' कसे असतील याबद्दल तर्क लढवले जात आहेत.
 
पण संशोधकांना विषाणूंचा असा अभ्यास करण्यात अडचणी येत आहेत.
 
वर्षभराच्या सोशल डिस्टन्सिंगमुळे सगळ्या विषाणूंचा फैलाव बऱ्यापैकी मंदावला आहे आणि त्यांचा अभ्यास करणं खूप अवघड झालं आहे. ग्लासगो विद्यापीठाच्या अभ्यासकांनी आपल्या श्वासनलिकेची त्यातल्या पेशींसह प्रतिकृती बनवली आणि त्या श्वासनलिकेला Sars-CoV-2 आणि ऱ्हायनो व्हायरसचा संसर्ग केला.
 
जर Sars-CoV-2 आणि ऱ्हायनो व्हायरस एकाच वेळेत शरीरात सोडले गेले तर फक्त ऱ्हायनो व्हायरस शरीराला संसर्गित करण्यात यशस्वी होऊ शकतो. जर ऱ्हायनो व्हायरस Sars-CoV-2 च्या 24 तास आधी शरीरात गेला तर Sars-CoV-2 ला शरीरात प्रवेशही करता येत नाही. समजा Sars-CoV-2 ऱ्हायनो व्हायरसच्या 24 तास आधी शरीरात गेला तरीही एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर ऱ्हायनो व्हायरस Sars-CoV-2 ला पळवून लावतो.
 
डॉ पाब्लो मुर्शिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "Sars-CoV-2 ला आपले हातपाय पसरायची संधीच मिळत नाही. ऱ्हायनो व्हायरस त्याला दाबून टाकतो."
 
"हे फारच रंजक आहे कारण जर ऱ्हायनो व्हायरसची मोठी साथ आली असेल तर तो Sars-CoV-2 चे नवे इन्फेक्शन्स थांबवू शकतो," ते पुढे सांगतात.
 
यासारखेच परिणाम याआधीही पाहिले गेले आहेत. 2009 साली आलेल्या ऱ्हायनो व्हायरसच्या मोठ्या साथीमुळेच युरोपात स्वाईन फ्लूची साथ उशिरा आली.
 
आणखी काही प्रयोगांमधून हे लक्षात आलं की ऱ्हायनो व्हायरसमुळे संसर्गित पेशींमध्ये असा इम्युन रिस्पॉन्स तयार होत होता की ज्यामुळे Sars-CoV-2 ची स्वतःसारखेच आणखी विषाणू बनवण्याची क्षमता पूर्णपणे संपली.
 
जेव्हा शास्त्रज्ञांनी हा इम्युन रिस्पॉन्स थांबला तेव्हा मात्र कोव्हिड विषाणूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
 
थंडीचा काळ कठीण
पण एकदा सर्दी-पडशाची साथ संपली आणि ऱ्हायनो व्हायरसमुळे तयार झालेला इम्युन रिस्पॉन्स थंडावला की कोव्हिडची साथ पुन्हा जोरात पसरू शकते.
 
डॉ मुर्शिया म्हणतात, "लसीकरण, स्वच्छतेचे नियम पाळणं आणि इतर विषाणूंबरोबर Sars-CoV-2 चा संबंध येणं यामुळे कोव्हिडची साथ आटोक्यात येऊ शकते. पण सगळ्यात जास्त परिणामकारक फक्त लसीकरणच आहे.
 
वॉरविक मेडिकल स्कूलचे प्रा लॉरेन्स यंग म्हणतात, "मानशी शरीरातला ऱ्हायनो व्हायरस ज्यामुळे सर्दी-पडसं होतं, तो वेगाने पसरणारा व्हायरस आहे."
 
ते पुढे असंही म्हणतात की, "या साध्या संसर्गामुळे कोव्हिड-19 मुळे जो ताण आलाय तो कमी होऊ शकतो. कोरोना व्हायरसचा प्रसारही कमी होऊ शकतो. थंडीच्या काळात सर्दी-पडसं जास्त पसरतं तेव्हा याचा फायदा होऊ शकतो."
 
येत्या थंडीत याचा काय परिणाम होऊ शकतो हे अजूनही स्पष्ट नाही. तोवर कोरोना व्हायरस तर असेलच आणि या साथीमुळे इतर विषाणूंच्या संसर्गाला आळा बसला होता तेही डोकं वर काढण्याची शक्यता आहे. या संसर्गांसाठी शरीरातली रोगप्रतिकारशक्तीही संपली असेल.
 
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या डॉ सुझन हॉपकिन्स म्हणतात की, "येणारा हिवाळा अवघड असेल."
 
"सर्दी-पडशाच्या संसर्गात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. श्वसनसंस्थेला संसर्गित करणाऱ्या विषाणूंमध्ये वाढ होईल," त्या म्हणतात.
 
या अभ्यासाचे निष्कर्ष 'जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीज' मध्ये प्रकाशित झाले आहेत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणी दिला होता हनुमानाला आपल्या शक्ती विसरण्याचा शाप