Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेक्स करण्याची इच्छा कमी होण्याची 'ही' आहेत 4 कारणं

bedroom
, मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (14:26 IST)
जिउलिया ग्रॅंची
जोडप्यांमध्ये कामवासना कमी होणं अर्थात सेक्सची इच्छा कमी होणं ही सामान्य समस्या आहे.
 
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, प्रत्येक पाच पुरुषांमागे एकाची कामवासना कमी झालेली असते. याचा महिलांवरही परिणाम होऊ शकतो.
 
या समस्येची अनेक कारणं असू शकतात. आणि ही गंभीर समस्या आहे असं ही काही नाही. तणाव, गर्भधारणा, बाळंतपण, स्तनपान यांसारख्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
 
मात्र, कामवासना होतच नसेल तर ते हानिकारक आहे. आणि म्हणून त्यामागील कारणांचा शोध घेणं आवश्यक आहे.
 
ब्राझिलियन असोसिएशन ऑफ सेक्शुअल मेडिसिनच्या सेक्रेटरी आणि मानसोपचारतज्ज्ञ कॅटरिना डी मोरेस सांगतात, "सर्वप्रथम, कामवासना किती प्रमाणात कमी झाली आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे."
 
त्या पुढे सांगतात की, "कधीकधी, इरेक्टाइल डिसफंक्शन, लैंगिक कार्यप्रदर्शन, समाधान आणि कामवासना कमी होणं यात मोठा गोंधळ उडतो. या सगळ्यात कामवासना खूप वेगळी गोष्ट आहे."
 
एंडोक्रिनोलॉजिस्ट डिएगो फोन्सेको यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची कामवासना कमी झाली आहे याची वैद्यकीयदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागतो.
 
तर, महिला रोगतज्ञ रिबेरो मारिस्का यांच्या मते, "व्यक्तीपरत्वे हा कालावधी बदलू शकतो. तो प्रत्येक रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो."
 
तज्ञांशी बोलून, आम्ही खालील चार कारणं शोधून काढली आहेत ज्यामुळे कामवासना कमी होऊ शकते.
 
1. दिनचर्येत झालेले बदल
कामवासना कमी होण्यासाठी आयुष्यात होणाऱ्या सामान्य घडामोडी देखील जबाबदार असतात.
 
जसं की ताणतणाव, थकवा, रोजच्या आयुष्यात झालेला बदल, सेक्स करण्यासाठीचा वेळ इतरत्र घालवणं, यामुळे कामवासना कमी होऊ शकते. या कारणांमध्ये मुलांची काळजी घेणंही समाविष्ट आहे.
 
कॅटरिना डी मोरेस यांच्या मते, "या कारणांमुळे तुमची कामवासना कमी होत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आजार झालाय. काहीवेळा एकाच जोडीदारासोबत सेक्स केल्याने कालांतराने कामवासना कमी होऊ शकते."
 
त्या पुढे सांगतात, "जर लैंगिक सुखाची इच्छा असेल किंवा तुम्ही लैंगिकदृष्ट्या समाधानी असाल पण तुमची कामवासना कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चाचणीची गरज नाही."
 
2. मानसिक आजार
नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक आजारांमुळे कामवासना किंवा सेक्सच्या इच्छेवर परिणाम होतो.
 
मनोचिकित्सकाच्या मते, "रुग्णांच्या मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या रसायनांमधील असंतुलनामुळे सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. कारण सेक्स ही गोष्ट भावनांशी संबंधित आहेत."
 
"अशा प्रकरणांमध्ये उपचार करून लैंगिक इच्छा, कामवासना सुधारू शकते."
 
दुसरीकडे, काही अँटी-डिप्रेसंट्स आणि अँटी-अँझाईटी औषधांचा देखील कामवासनेवर परिणाम होतो.
 
पण यावर अनेक उपचार आहेत. आणि त्याची एक निश्चित पद्धत आहे. याचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी डॉक्टर औषध बदलून देतात किंवा औषधांच्या डोसमध्येही बदल करतात. अशावेळी रुग्णाच्या वर्तनाशी संबंधित व्यायामांवर भर दिला जातो
 
डॉक्टर सांगतात की, अशी कोणतीही लक्षणं आढळल्यास, त्यांनी उपचार मध्येच थांबवू नयेत. कारण नैराश्यावर उपचार न केल्यास कामवासनेवर परिणाम होऊ शकतो. आणि औषध अर्धवट सोडल्यानेही कामवासनेवर परिणाम होऊ शकतो.
 
डॉक्टर सांगतात की, "रुग्णाने लैंगिक संबंधाशी संबंधित कोणत्याही समस्यांबद्दल डॉक्टरांशी उघडपणे चर्चा केली पाहिजे."
 
3. हार्मोनल बदल
जर रुग्णाला मानसिक आजार नसेल, जीवनशैलीतही कोणते बदल झाले नसतील पण कामवासना मात्र कमी झाली असेल तर त्यांनी एकदा हार्मोनल बदलांच्या चाचणीचा विचार करावा.
 
साओ कॅमिरो हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. कॅरोलिन कॅस्ट्रो सांगतात की, स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेन हा हार्मोन आणि पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन त्यांची कामवासना नियंत्रित करतो.
 
योनीतून स्नेहन येण्यासाठी इस्ट्रोजेनशी संबंधित पेनिल पेशी कारणीभूत असतात.
 
टेस्टोस्टेरॉन शुक्राणूंच्या उत्पादनाशी, लैंगिक इच्छेशी संबंधित असते. ज्याचा थेट मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
 
डिएगो फोन्सेका यांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये समस्येचे निदान करणं खूप गुंतागुंतीचं असतं.
 
"उदाहरणार्थ, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी आहे की नाही यासाठी आम्ही हार्मोन्समध्ये होत असलेले बदल तपासतो. किंवा रुग्णाचा तसा काही वैद्यकीय इतिहास आहे का हे पाहतो."
 
गर्भधारणा, स्तनपान, लठ्ठपणा यासारखी इतर कारणं देखील डॉक्टर तपासतात ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात.
 
एंडोक्रोनोलॉजिस्ट कॅलोरिना कॅस्ट्रो सांगतात, "अशा रुग्णांना औषधाची गरज भासू शकते. पण त्यांना औषधाची गरज आहे की नाही हे रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असते.
 
प्रत्येक रुग्णागणिक गोष्टी बदलतात. काही प्रकरणांमध्ये, शरीरातील बदल मोजले जातात. कारण अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक निदान करणं आवश्यक असतं."
 
4. इतर आजार
यामागचं आणखी एक कारण सांगताना डॉक्टर म्हणतात, जर रुग्णाला इतर काही आजार असतील तर व्यक्तीच्या कामवासनेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकतात.
 
उदाहरण म्हणून बघायचं तर, मेंदूशी संबंधित आजारांमध्ये स्क्लेरोसिस, पाठीच्या कण्याची दुखापत किंवा पेरीफेरल न्यूरोपॅथी यासारखे आजार कामवासना कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा रोगांचा थेट परिणाम शरीराच्या नसा आणि कामवासनेवर होतो.
 
हार्मोन्समधील बदलांमुळे, मधुमेहामुळे कामवासना कमी होऊ शकते. यात न्यूरोपॅथी किंवा थकवा जाणवू शकतो. अशा आजारात मज्जातंतू खराब झालेला असतो. यामुळे संवेदनशीलता कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम अप्रत्यक्षपणे सेक्सच्या इच्छेवर होऊ शकतो.
 
हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांना लैंगिक संबंधातही समस्या येऊ शकतात. शरीरात रक्त पोहोचवण्याची हृदयाची क्षमता कमी झाल्यामुळे रुग्णाला थकवा जाणवू शकतो.
 
आणि त्यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. हृदय रोगाशी संबंधित औषधांमुळे देखील दुष्परिणाम होतात. त्यामुळे कामवासनेवर परिणाम होऊ शकतो.
 
संवाद आणि उपचार
बीबीसी प्रतिनिधीने डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कामवासना कमी होण्यामागे एकच कारण नाही. शिवाय बरं होण्यासाठी कोणताही झटपट उपाय नाही.
 
प्रत्येक रुग्ण वेगळा असू शकतो. त्याचे उपचार त्याच्या वैयक्तिक स्थितीवर आणि त्याच्या दृष्टिकोनावर देखील अवलंबून असतात.
 
प्रत्येक डॉक्टर जोडप्यांना कामवासना कमी होण्यासाठी जबाबदार असलेल्या कारणांबद्दल संवाद साधण्याचा सल्ला देतात.
 
डिएगो फोन्सेका म्हणतात, "याबद्दल उघडपणे बोलणं आवश्यक आहे.
 
कामवासना कमी होण्यास कारणीभूत घटकांची चर्चा केल्याने गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते. यावर दोघांनीही परिस्थिती समजून घेऊन तोडगा काढयला हवा."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Food wrapped in newspaper is dangerous वृत्तपत्रात खाद्यपदार्थ पॅक करणे आरोग्यासाठी घातक