Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ब्रा'वर बसवलेल्या 'या' छोट्या उपकरणामुळे समजेल स्तनाचा कर्करोग

brest cancer
, बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (19:22 IST)
आयलिन यजान
BBC
 समजा तुमच्या ब्रा वर अल्ट्रासाऊंड उपकरण लावलं आणि त्या उपकरणाद्वारे तुम्ही चहा पिता पिता तुमच्या स्तनातील ट्यूमर शोधून काढला तर...
 
तुर्की (तुर्किये) च्या शास्त्रज्ञ डॉ. जनान दादेविरेन यांनी त्यांच्या टीमसोबत मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या मीडिया लॅबमध्ये अगदी असंच तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
 
स्तनाच्या कर्करोगाने मरण पावलेल्या आपल्या मावशीच्या सन्मानार्थ त्यांनी हे उपकरण तयार केलं आहे.
 
स्तनाचा कर्करोग असण्याच्या शक्यतेमुळे अनेक महिलांना वारंवार मॅमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो. अशा महिलांसाठी हे उपकरण उपयुक्त ठरू शकतं. महिला या उपकरणाद्वारे दोन मॅमोग्राम दरम्यानही स्तनाच्या कर्करोगावर लक्ष ठेवू शकतात.
 
कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये बहुतेक रुग्ण हे स्तन कर्करोगाचे असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये 23 लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि 6 लाख 85 हजार महिलांनी या आजारामुळे आपला जीव गमावला.
 
स्तनाचा कर्करोग हे महिलांच्या मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण आहे.
 
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, जर स्तनाचा कर्करोग लवकर आढळून आला आणि तो एका भागातच केंद्रित असेल तर पाच वर्ष जिवंत राहण्याची शक्यता 99 टक्के आहे.
 
डॉ. दादेविरेन सांगतात की, त्यांच्या उपकरणामुळेत जगण्याची शक्यता वाढते. कारण उशीरा निदान झालेल्या महिलांचा जिवंत राहण्याचा दर केवळ 22 टक्के आहे.
 
हे उपकरण कसं काम करतं?
आपल्या मावशीला रुग्णालयात बसलेलं बघून डॉ. जनान दादेविरेन यांना हे उपकरण तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्या एमआयटी मध्ये मटेरियल सायंटिस्ट आणि इंजिनिअर आहेत.
 
त्यांच्या मावशीला नियमित तपासणीसाठी जावं लागत असे. एक दिवस त्यांना समजलं की, तिचा कर्करोग वेगाने वाढत आहे. पुढच्या सहा महिन्यात मावशीचा मृत्यू झाला.
 
या उपकरणात मधमाश्यांच्या पोळ्याच्या आकाराचे सहा विभाग आहेत. यातल्या एका विभागात लहान अल्ट्रासाऊंड कॅमेरा जोडला जाऊ शकतो. 
 
 हा कॅमेरा वेगवेगळ्या खाचांमध्ये ठेवून स्तनाची सर्व बाजूंनी तपासणी करता येते. त्याच्या वापरासाठी अल्ट्रासाऊंड जेल वापरण्याची गरज नाही.
 
डॉ. दादेविरेन सांगतात की, हे उपकरण अगदी 0.3 सें.मी.च्या लहान गुठळ्या शोधू शकतं. सुरुवातीला तयार झालेल्या गुठळ्यांचा आकार एवढाच असतो.
 
त्या म्हणतात की, "याचा अर्थ कोणत्याही प्रकारची असामान्यता शोधण्यात हे उपकरण अगदी अचूक आहे."
 
मॅमोग्राम म्हणजे काय?
स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी मॅमोग्राम ही सर्वात सामान्य पद्धत आहे. यामध्ये स्तनाच्या एक्स-रेद्वारे गाठी शोधल्या जातात.
 
रेडिओग्राफर मशीनवर दोन सपाट प्लेट्समध्ये एक एक करून स्तन ठेवले जातात.
 
या प्लेट्स स्तनांना दाबतात. यामुळे महिलांना थोडासा दबाव जाणवतो आणि त्यांना अस्वस्थताही वाटते.
 
काही महिलांना ही प्रक्रिया वेदनादायक वाटू शकते परंतु ही प्रक्रिया खूप लवकर पूर्ण होते.
 
पण मेमोग्राम करणं महागडी प्रक्रिया आहे. बऱ्याच देशांमध्ये ही तपासणी सरकारी आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट नाही.
 
तपासणी करताना स्त्रियांना वेदना का होतात?
हेलन यूल एक सल्लागार रेडियोग्राफर आणि ब्रिटन मधील कन्सल्टेटिव्ह सोसायटी ऑफ रेडियोग्राफर्सच्या अध्यक्षा आहेत. त्या सांगतात, "प्रत्येक महिलेचे स्तन वेगळे असतात आणि त्यातील ग्रंथी आणि चरबीचे प्रमाण देखील स्तनानुसार बदलते."
 
ज्या महिलेच्या स्तनात अधिक ग्रंथीयुक्त उती असतात त्यांना मेमोग्राम दरम्यान अस्वस्थता जाणवू शकते. त्या तुलनेत चरबीयुक्त स्तन असलेल्या स्त्रियांना जास्त त्रास जाणवत नाही.
 
तसेच, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) मुळे स्तन संवेदनशील होऊ शकतात.
 
युल सांगतात की मॅमोग्राम करवून घेण्याबद्दल महिला काय विचार करतात याने देखील मोठा फरक पडतो.
 
मॅमोग्राम दरम्यान अस्वस्थता टाळण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, मासिक पाळी येण्यास एक आठवडा शिल्लक असल्यास, मॅमोग्राम करून घेणं टाळलं पाहिजे. किंवा मॅमोग्राम करण्यापूर्वी पॅरासिटामॉल घ्यावी.
 
हे उपकरण कोणासाठी आहे?
संशोधन सांगतं की, एक मॅमोग्राम केल्यानंतर दुसरा मॅमोग्राम करण्याच्या मधल्या कालावधीत स्तनाचा कर्करोग विकसित होऊ शकतो. याला इंटरव्हल कॅन्सर म्हणतात. या प्रकारचा कर्करोग स्तनाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी 20 ते 30 टक्के आहे.
 
एमआयटी टीमचं म्हणणं आहे की या काळात विकसित होणारे ट्यूमर हे नेहमीच्या तपासणीदरम्यान आढळणाऱ्या गाठींपेक्षा जास्त धोकादायक असतात. 
 
अशा परिस्थितीत, हे उपकरण अशा महिलांना दिले जाऊ शकते ज्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
 
यामुळे त्यांना दोन मॅमोग्राम किंवा सेल्फ एग्जामिनेशन दरम्यान तयार होणाऱ्या गाठी शोधण्यात मदत करू शकते.
 
संशोधकांच्या मते, या उपकरणाद्वारे कोणतीही असामान्यता आढळली तरीही मॅमोग्राम करणं आवश्यक आहे.
 
हे उपकरण कुठे तयार करण्यात आलं?
हे उपकरण तयार करण्यासाठी एमआयटी टीमला जवळपास साडेसहा वर्ष लागली.
 
या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेत या उपकरणाला पेटंट मिळाले आणि सध्या त्याची मानवांवर चाचणी सुरू आहे.
 
एका उपकरणाची किंमत 1000 डॉलर (सुमारे 83 हजार रुपये) असू शकते. पण संशोधकांच्या मते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यानंतर त्याची किंमत कमी होईल. मात्र यासाठी चार ते पाच वर्षे लागू शकतात. 
 
संशोधकांच्या टीमचा अंदाज आहे की 'दररोज उपकरणाच्या मदतीने स्कॅन करण्याची किंमत एक कप कॉफीपेक्षा कमी असेल.'
 
आशेचा किरण
संशोधनातून असं दिसून आलंय की, विकसनशील देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर जास्त आहे. कारण कर्करोगाचं उशीरा झालेलं निदान आणि चांगल्या आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे हा दर जास्त आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पाच वर्षांचा जगण्याचा दर 90 टक्क्यांहून अधिक आहे. हाच दर भारतात 66 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेत केवळ 40 टक्के आहे.
 
शरीराचे इतर भाग स्कॅन करण्यासाठी देखील हे उपकरण वापरले जाऊ शकते. गेल्या वर्षी जेव्हा डॉ. दादेविरेन गरोदर होत्या, तेव्हा त्यांनी आपला गर्भ स्कॅन करण्यासाठी या उपकरणाचा वापर केला होता.
 
त्या सांगतात, "माझी मावशी अवघ्या 49 वयात गेली. आपला अशाप्रकारे मृत्यू होईल याची तिने कल्पनाही केली नसेल. तिने पण अशी ब्रा घातली असती तर?"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकाळी ब्रश न करता आपल्याही खाण्या-पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा