मधुमेहींनी रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे पदार्थ खाणे गरजेचे असते. बदामाच्या सेवनामुळे मधुमेहींना बरेच लाभ होऊ शकतात. मात्र, उष्मांकाचे अधिक प्रमाण असल्यामुळे बदाम मर्यादित प्रमाणात खाणे योग्य ठरते. मधुमेहींनी बदाम कधी आणि किती प्रमाणात खावेत हे नीट समजून घ्यायला हवे.
बदामातल्या पोषक घटकांमुळे रक्तातली साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहू शकते, असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. सुक्या मेव्यामध्ये बदाम मधुमेहींसाठी सर्वोत्तम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातला मॅग्नेशियम हा घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करायला मदत करतो तर फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहाते. म्हणूनच संध्याकाळच्यावेळी बदाम खाता येतील. शिवाय सकाळच्या वेळेतही बदाम खाणे योग्य ठरते. मधुमेहींनी खारवलेले किंवा तळलेले बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये कॅलरी जास्त असल्यामुळे आहारातून मिळणार्या कॅलरींचे प्रमाण कमी करून बदामाचे सेवन वाढवता येईल.