खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो. उसाच्या रसावर अग्निसंस्कार करून खडीसाखर बनवली जाते. ती खाल्ल्यावर लगेच पचते, रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते. खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त आहे.
- खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी आहे. - खडीसाखर पाण्यात मिसळून घेतली असता तहान भागते.
- खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्याले असता दाह, मूत्ररोग आदि विकार बरे होतात.
- खडीसाखर १ भाग आणि धने ३ भाग एकत्र करून ते उकळत्या पाण्यात तासभर तसेच ठेवावे त्यानंतर कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे २/२ थेंब सकाळ/संध्याकाळ डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
- सर्दी-पडसे यावरील आयुर्वेदीय औषध सीतोपलादी चूर्ण हे खडीसाखरेपासून बनवतात. खडीसाखरेलाच सीतोपला म्हणतात. त्या चूर्णात खडीसाखर अधिक असल्याने चूर्णाला सीतोपलादी चूर्ण म्हणतात.
- सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासह चाटवल्याने सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप कमी होतो.
- डॉ. सुनील बी. पाटील