Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

हाक मैत्रीची.........मार्मिक किस्सा

emotional story
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसलो होते. दहा वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला. 
‘हलो, काय करतो आहेस?’
‘काही नाही. बसलो आहे. काय विशेष?’, मी म्हणालो.
‘आत्ता लगेच येऊ शकशील का घरी?’
‘हो, येतो.’ आणि मी फोन बंद केला.
मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघालो. 
मित्र दुसऱ्या गावी रहात होता. जायला दीड दोन तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. 
काही पैसे, कॅश लागणार आहे का, बरोबर कोणाला घेऊन येऊ का, हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला.
‘हलो, अरे मी स्टार्टर मारतोय, काही घेऊन यायला पाहिजे आहे काय?’
यावर तो काही बोलला नाही. पण रडू लागला. 
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, ‘काय झाले?’ पण काही बोलेना. नुसताच रडू लागला. 
मी गोंधळून गेलो. काय करावे कळेना. 
एवढ्यात फोनवर दुसरे कोणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुदा मित्राचा मित्र असावा.
‘अहो साहेब, काही झालेले नाही. काळजीचे कारण नाही. तुमचा मित्र आनंदाने रडत आहे.’ 
मी अधिकच गोंधळून गेलो.
‘थांबा तुम्हाला सगळे सांगतो म्हणजे समजेल,’ मित्राचा मित्र बोलत होता.
‘आम्ही सात आठ जण बसलो आहोत. मैत्रीवर चर्चा चालू होती. बोलता बोलता एक पैज लागली. आत्ता प्रत्येकाने त्याच्या बाहेर गावच्या मित्राला फोन करायचा. आणि लगेच ये म्हणून सांगायचे. तो मित्र येतो म्हणाला पाहिजे. आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मित्राने, काय, कशाला, एवढ्या रात्री काय, सकाळी आलो तर चालेल का, असे काहीही विचारता कामा नये. आम्ही सगळ्यांनी मित्रांना फोन केले. पण प्रत्येकाने काय, कशाला म्हणून विचारले. फक्त तुम्हीच काहीही शंका न घेता येतो म्हणालात. आणि काय आणू का विचारलेत. आम्ही स्पीकर फोनवर ऐकले. तुमच्या मित्राला गहिवरून येऊन तो रडत आहे. तो पैज जिंकला आहे. 
तुम्ही या परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाला आहात. 
तुमच्या मैत्रीला सलाम.
’आता मी रडू लागलो. पहिल्या नंबरने पास झाल्याच्या आनंदात...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅटरीना कॅफमुळे 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधून सरोज खान काढली गेली