Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमचे आई बाप म्हातारे होतात...!

आमचे आई बाप म्हातारे होतात...!
, शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (12:24 IST)
कालाय तस्मै नम: 
 
वर्षे अशीच सरतात, आमचे संसार फुलू लागतात  
आणि बघता बघता, आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
हौसमजा, जेवणखाण, त्यांच आतां कमी होत चाललय
पण फोनवर सांगतात, आमच अगदी उत्तम चाललय
अंगाला सैल होणारे कपडे, गुपचूप घट्ट करून घेतात
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
कोणी समवयस्क “गेल्या”च्या बातमीने हताश होतात, 
स्वत:च्या पथ्य पाण्यांत, आणखीन थोडी वाढ करतात 
आमच्या ‘खाण्यापिण्याच्या’ सवयींवर  नाराज होतात, 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात,
इन्कम टॅक्सच्या भीतीने कावरे बावरे होतात 
मॅच्युर झालेली एफडी नातवासाठी रिन्यू करतात 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...! 
 
पाठदुखी, कंबर दुखीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात  
अॅलोपाथीच्या साइड इफेक्टची वर्णने करतात 
आयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...! 
 
कालनिर्णयची पान उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात 
एरवी न होणाऱ्या पारंपारिक पदार्थांची जय्यत तयारी करतात 
आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पहातात  
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
माहित आहे हे सगळ, आता लवकरच संपणार 
जाणून आहोंत, हे दोघेंही आता एका पाठोपाठ जाणार 
कधीतरी तो अटळ प्रसंग येणार,काळ असाच पळत रहाणार
वर्षे अशीच सरत रहाणार, 
 
बघता बघतां आम्ही देखील असेच, आमच्या मुलांचे म्हातारे आई बाप होणार....!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘हे राम.. नथुराम’ हे नाटक आता बंद होणार