घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात!
“सुखी आहे पोर”- सांग आईच्या कानात
“आई, भाऊसाठी परी मन खंतावत!
विसरली का ग, भादवात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.
फिरून-फिरून सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेच्या नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार!
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय…!”
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!
कवी – कृ. ब. निकुंब