एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्याने स्वतःच्या किमतीएवढेच बक्षीस दिली. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'
तात्पर्य : माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे.