आई असणं सोप्प आहे
अवघड आहे ते मोठी आई बनणं
न घेता जागा आईची
निस्वार्थ वात्सल्याचा वर्षाव करणं...
डोळे माझे पाणवतात
गालात मी हसते खुदकन
आठवणींची शिदोरी
अलगद जेव्हा मी बसते उघडून
जपून आपले अधिकार
तुझं चोखपणे कर्तव्य पार पाडणं
जननी आमची नसूनही
प्रसव वेदना ते सहन करणं
कष्टात बघून आम्हाला
काळीज तुझं ते पिळून जाणं
तुझ्या पोटचे गोळे नसूनही
पोटात गोळा तुझ्या उठणं
भल्याभल्यांना नाही जमत
शिवधनुष्य हे पेलणं
तारेवरची कसरतच ही
असे निरागस नाते जपणं
ऋणानुबंध हे तुझे नी आमचे
अशक्यच याची व्याख्या करणं
गत जन्माची काही पुण्याई ही
मोठीआई तू आम्हास लाभणं
आई असणं सोप्प आहे
अवघडआहे ते मोठीआई बनणं.