Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवालयात, सध्या देव नाही

देवालयात, सध्या देव नाही
, मंगळवार, 6 जुलै 2021 (08:30 IST)
देवालयात, सध्या देव नाही
दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, 
शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, 
बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ,
 मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या 
गतीने बागडत होते
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला
 “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, 
तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे..
दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
 
कुसुमाग्रज
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ISRO Recruitment 2021: इस्रोने पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागविले आहेत