इवलीशी ही सदाफुली आयुष्याचा धडा शिकवते

© ऋचा दीपक कर्पे

इवलीशी ही सदाफुली 
आयुष्याचा 
धडा शिकवते
जगण्यासाठी झगडणे
झगडून उमलणे 
भेदून छाती दगडाची
तोडून गर्व विटांचा
ती दिमाखात डोलते
वार्‍यावर झुलते...
 
कोवळे सोनुकले 
तिचे नाजूक देह
उन्हाळा हिवाळा 
बरसाणारे मेघ
जुमानत नाही कशालाही
ऊन असो वा वारा
बरसत्या जलधारा
बघते उंचावून आकाशाला
रिमझिम पावसात भिजते
फुलपाखरांवर भुलते
वार्‍यावर झुलते
 
रंगीत पाकळ्या पाच
जणू ज्ञानेंद्रिय ताब्यात
असो लहानसे आयुष्य 
सुंदर जगणे आनंदात
हिरव्यागार फांदीच्या 
शिखरावर डोलते
सोनेरी चमचमत्या
किरणांशी खेळते
दवबिंदू झेलते
वार्‍यावर झुलते...
वार्‍यावर झुलते....
 
©ऋचा दीपक कर्पे

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो