Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी गेल्यावर

मी गेल्यावर
, सोमवार, 28 जून 2021 (16:54 IST)
मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तंकं
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय्
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं

माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर ओळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर
 
तुला सांगण्या समज़ावण्यासाठी की
मलाही सोडता येणार नाहीय् मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी
ही काही पुस्तंकं आहेत फक्तं
 
जी तुला दाखवतिल वाट
चालवतिल तुला थांबवतिल
कधी पळवतिल कधी
निस्तब्धं करतिल
बोलतं करतिल कधी
टाकतिल संभ्रमात
 
सोडवतिल गुंते
वाढवतील पायाखालचा चिखल
कधी बुडवतिल तरवतिल कधी
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह
अडवतील तुडवतील सडवतील
बडवतील हरवतिल सापडतील 
तुझ्याशी काहीही करतील
 
ही पुस्तंकं
तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन
 मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तंकं
 
उघडतील मधोमध पसरतील हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतिल हृदयाचे ठोके
यांच्यात रहस्य् आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील
 
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितीक
कधी किचकट कधी सोपं असतं
 
लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहीच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज़ असतं समज़ नसतं
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला ज़ायचं आहे तिथं
 
फक्तं मी असेन
तिथं मात्रं तुला पोहोचता येणार नाही
कारण मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तंकातली
 
माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगाऱ्यातल 
ते एखादं पु्स्तक शोध
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होउन ज़ाईल.
 
– सौमित्र
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत LT ग्रेडच्या 800 पदे भरती होणार