Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इतकेच मला जाताना

bhakti
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
 
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !
 
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?
 
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !
 
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
 
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली-
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते !
 
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !
 
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो-
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
 
- सुरेश भट

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IB Recruitment 2023 Notification: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती होणार आहे