प्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.
स्वच्छतेबाबतही क्रोकरीची विशेष काळजी घ्यावी लागते. काचेची चमक टिकून राहण्याचे काही वेगळे मार्ग अवलंबावे लागतात. आज यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊ या.
क्रोकरीवर डाग राहू नये, असे वाटत असेल तर ती वेळच्या वेळी स्वच्छ करायला हवी. फार काळ अस्वच्छ अवस्थेत ठेवल्यास डाग टिकून राहतात आणि स्वच्छ करणे कठीण होते.
काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी गार पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याचा वापर केल्याने साबणाचा कमीत कमी वापर करून ही भांडी स्वच्छ करणे शक्य होते. गरम पाण्यामुळे भांडी स्वच्छ होतातच, शिवाय त्यावरील जीवजंतूंचाही नायनाट होतो.
क्रोकरी स्वच्छ केल्यानंतर काही काळ व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात बुडवून ठेवावी. काही वेळाने बाहेर काढून न धुताच भांडी सुकवावी. यामुळे क्रोकरीची चमक टिकून राहते.
काचेची भांडी धुतल्यानंतर त्यावर लिंबू रगडावे. लिंबामुळे न दिसणारे डागही निघून जातात आणि वेगळी चमक येते. लिंबू चोळण्यानंतर भांडी परत एकदा धुवून घेण्यास विसरू नये. क्रोकरीच्या आतल्या कडा स्वच्छ करण्यासाठी जुन्या ब्रशवर टूथपेस्ट घ्यावी आणि त्याने हलक्या हाताने स्वच्छता करावी. त्यानंतर कोमट पाण्याने भांडी धुवून घ्यावी.