Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाडांना पाणी केव्हा द्यावे?

 plants
, सोमवार, 18 जुलै 2022 (19:46 IST)
झाडांना पाणी कधी देता? आपल्या इथे दुपारी पाणी न देण्याची पूर्वापारची परंपरा आहे. का देत नाही दुपारी पाणी? कारण अगदी सोपं आहे. दुपारी बाष्पीभवन जास्त होतं त्यामुळे झाडांना पाणी नेहमीच अगदी सकाळी किवा संध्याकाळी द्यावं.
 
हे पाणी तरी किती द्यावं? बरेचदा असा गैरसमज आढळतो की झाडांना भरपूर पाणी द्यावं. परंतु एक मिनिट थांबा. थोडा विचार करा. आपल्याला पोटाला तडस लागेल इतकं पाणी आपण पितो का? नाही नां! मग झाडं सजीव आहेत. आपल्या सारखीच! त्यामुळे त्यांना पण पाणी गरजेनुसारच द्या. नाहीतर जमिनीतील पोषक तत्त्वं वाहून जातात. जमिनीची प्रत कमी होते. झाडांना झुळुझुळु पाटाचं पाणी का आवडतं? कारण आपण जसं 'घटघट' पाणी पिऊ शकत नाही तसंच झाडं देखील हळूहळू, छान तब्येतीने पाणी पितात! जमिनीत पाणी मुरेल एवढ्याच वेगाने पाणी द्यायला हवं. तुम्ही तसं देताच! हो नं! मग आता अधिक सजगपणे असं मस्त तब्येतीने पाणी झाडांना घालू या!
 
समजा तुम्हाला तहान लागलेली नाही आणि तुम्हाला जबरदस्तीने 'पाणी प्या' चा आग्रह केला तर कसं वाटेल? आपला 'टाईम पास' होतो म्हणून झाडांना गरज नसताना पाणी देणं हे त्यांच्यासाठीही हानीकारक आहे आणि आपल्यासाठीही! कारण पाण्याचं दुर्भिक्ष असताना अशी पाण्याची नासाडी केव्हाही वाईटच!
 
बगिच्याला कीटकनाशकांची फवारणी खरंच गरजेची आहे का? नैसर्गिकरीत्याच कीटकनाशक बगिच्यात वावरत असतात. त्यांना जपू या आणि कीटकनाशकं वापरायची असतील तर 'नीम' म्हणजे अर्थात कडुलिबाची कीटकनाशकं बाजारात मिळतात. त्यांची फवारणी करू या. फुलपाखरं, पतंग, मधमाशा, भुंगे हे सगळे परागीभवनाचे कार्य करणारे दूत आहेत. त्यांची जपणूक केली की खूप मोठ्या प्रमाणात आपण पर्यावरणचं रक्षण करत असतो. उडणाऱ्या फुलपाखरांना दाखविणे आणि त्यांचा नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेणे हेच मुलांना देखील शिकवायला लागलो की झालात की तुम्ही इको फ्रेण्ड!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cashew Benefits: काजू खाल्ल्याने वजन होते का कमी ? जाणून घ्या सत्य